13/12/2023
आयुर्वेदिक फिजीशियन पी. जी. करतांनाचे अनुभव
आयुर्वेदीक फिजिशियन या शब्दाचा अर्थ PG ला आल्यावर खऱ्या अर्थाने कळला कारण UG करत असताना डोळ्यासमोर एकच गोष्ट होती ती म्हणजे डिग्री घेणे आणि allopathy प्रॅक्टिस करणे पण जेंव्हा मी PG ला लागले तेंव्हापासून शुद्ध आयुर्वेदिक प्रॅक्टिस करावी याची ओढ लागली आणि ती खऱ्या अर्थाने सफल झाली .आज मी अमरावती शहरामध्ये शुद्ध आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहे याचे श्रेय हे सर्वस्वी आदरणीय खापर्डे सर व आदरणीय वैद्य. राजेश पवार सर यांना जाते कारण PG करत असताना वेळोवेळी खापर्डे सरांनी बहुमोल मार्गदर्शन केले. रस कल्प कसे वापरावे ? व्याधिनुसार रस कल्प कसे बनवावे ? आणि ते त्या व्याधीचा संप्राप्ती भंग कसे करतील ? याचे सखोल मार्गदर्शन सर करत गेले आणि मी आयुर्वेद चिकित्सा प्रणाली आपलीशी करत गेले. सरांनी हिंगुल युक्त कल्प आणि कज्जली युक्त कल्प काय असतात ते कसे काम करतात ? कोणत्या रुग्णामध्ये कोणता कल्प वापरावा याचे सखोल ज्ञान सरांनी दिले.तसेच रुग्णाच्या साम निरामतेनुसार कोणता रस कल्प वापरावा आणि कोणता कल्प वापरू नये याचे ज्ञान सरांनी मला दिले. रुग्ण हा साम अवस्थेत असेल तर कज्जली युक्त कल्प वापरू नये तर हिंगुळ युक्त कल्प वापरावा कारण साम अवस्थेत निर्माण झालेल्या आमाचे पचन होणे गरजेचे आहे आणि हींगुल हा असा खनिज आहे त्याचे जमिनीमध्ये पाचन झालेलं असते. त्यामुळे हींगुळ युक्त कल्प हे आमावस्थेत वापरावे आणि काज्जली युक्त कल्प हे निरमावस्थेत च वापरावे याबद्दल सरांनी विस्तृत सांगितले जेंव्हा मला या गोष्टी समजत गेल्या तसे तसे आयुर्वेदिक चिकित्सा करण्याबद्दल माझे आकर्षण वाढत गेले तसेच विष कल्पा बद्दल ची भीती तर सरांनी नाहिशीच केली कारण विष युक्त कल्प बनविणे हा माझा शोध प्रबंध होता जो की त्याची निवड ही सरांनी च केली होती .सरांनी PG करताना जे मार्गदर्शन केले होते आज त्याचा प्रॅक्टिस मध्ये खूप चांगला उपयोग होत आहे .
PG करतानाच बहुमूल्य असे मार्गदर्शन मिळाले ते म्हणजे आदरणीय वैद्य राजेश पवार सर यांचे यांनी मला दोष, धातू ,मल ,अग्नी, धातवाग्नी, नाडी परीक्षण , रुग्ण परीक्षण व्याधी नुसार कसे करावे याबद्दल ज्ञान दिले आणि सरांकडून मिळत गेलेल्या ज्ञानाच्या जोरावर अजून अजून आयुर्वेदिक चिकित्सा प्रणाली आपण आत्मसात करावी असे बळ मिळत गेले, सरांनी माझा आत्मविश्वास कधीच कमी होऊ दिला नाही .अभ्यास कमी पडायचा ,वाचन हवे तेवढे व्हायचे नाही ,क्लिनिक मध्ये कितीतरी चुका केल्या पण सर नेहमीच त्या चुका दाखवून असे म्हणायचे की ,"चुका नाही केल्या तर शिकणार कधी ?" सर नेहमीच प्रोत्साहन रुपी एक मंत्र म्हणायचे की कर्म करत राहायचे फळाची अपेक्षा करायची नाही आणि जे सरांनी सांगितले तशीच वाटचाल सुरू आहे .सध्या समाजामध्ये आयुर्वेदिक चिकित्सेबद्दल इतका गैरसमज आहे की , लोक म्हणतात खूप उशिरा रिझल्ट मिळतो,लवकर बरे वाटत नाही , औषधे खूप महाग होतात परवडत नाही आयुर्वेदिक औषधे घ्यायला .पण सरांनी या सर्वांची भीती पूर्णपणे नाहीशी केली आणि आयुर्वेदिक चिकित्सा प्रणाली आपलीशी वाटत गेली. याच कालावधीमध्ये मोलाचे सहकार्य लाभले ते म्हणजे आदरणीय डोंगरे मॅडम ,मॅडम नेहमी बोलता बोलता मला आणि प्रतिभाला सांगायच्या की तुम्ही पुढे काय करणार आहात आत्ताच ठरवा ? आणि जे कराल ते अगदी ठामपणे करा .योग्य निर्णय कसे घ्यायचे ,मन शांत कसे ठेवावे व आपण मन शांत ठेवून कशी प्रगती करू शकतो हे उदाहरण देऊन देऊन समजावून सांगत असत आणि असे च सर्वांचे ऐकत ऐकत पुढे वाटचाल ठेवली .या काळात सर्वांचे अनमोल गाईडन्स तर मिळत गेलेच सोबत एका खास मैत्रिणीची साथ कायम मला पाठबळ देत गेली अगदी अँडमिशन घेतले तेंव्हा पासून ते आजतागायत खूप मदत झाली . मी आयुर्वेदीक प्रॅक्टिस करावी यामागे हीचा खूप मोठा वाटा आहे .आम्ही रस भेषज्य चे कल्प बनवायचो ,त्वचारोग ची ओपीडी काढायचो आम्ही बनवलेले औषध रुग्णाला द्यायचो,रुग्ण परीक्षण झाल्यावर त्यावर चर्चा करायचो . आज त्या सर्व गोष्टीचा मला प्रॅक्टिस मध्ये खूप उपयोग होत आहे तिने आणि मी ठरवलेच होते की आपण शुद्ध आयुर्वेदीक प्रॅक्टिस करायची आणि आज ती औरंगाबाद येथे आयुर्वेदिक चिकीत्सा प्रणाली अवलंबून वैदकिय सेवा देत आहे. मला हे PG करत असताना वेळोवेळी सर्वांचे अमूल्य असे मार्गदर्शन मिळत गेले आणि माझा पाया मजबूत बनत गेला ,मी सक्षम बनू शकले आयुर्वेदिक फिजिशियन म्हणून ते या सर्वांमुळे त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे !