16/03/2022
हार्टच्या कोणत्या टेस्ट कशासाठी???
ओपीडी मध्ये पेशंट पाहताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या की जेंव्हा तुम्ही एखादया पेशंट ला एखादी टेस्ट करायला सांगता तेंव्हा त्या पेशंट च्या डोक्यात येणारे विचार काय असतात???
१.डॉक्टरांनी सांगितलेली टेस्ट खरच आवश्यक आहे का?
२.या टेस्ट च्या बदल्यामध्ये काही स्वस्त पर्याय आहे का?
३.या टेस्ट खरंच आपल्या फायद्याच्या आहेत का?
४.तात्काळ कराव्या लागतील की नंतर केल्या तरी चालतील?
आता या सर्व प्रश्नांची उत्तरे सर्वांना भेटावीत यासाठी या टेस्ट काय असतात आणि त्यातुन काय कळते याबद्दल सर्वांना समजावी अशी माहिती देतो आहे...
१.ECG
ECG म्हणजे काय?
तर ECG हा एक ग्राफ असतो जो तुमच्या हार्ट मध्ये काही ब्लॉक असेल,हार्ट मध्ये प्रेशर खुप वाढलं असेल,एखादं छिद्र असेल ,एखादि झडप खराब असेल तर या ग्राफ मध्ये बदल होतात...
परंतु यातील प्रत्येक आजारामुळे होणारे बदल हे आजाराच्या बऱ्यापैकी आजार खुप वाढतो तेंव्हाच दिसतात... त्यामुळे ecg काढला की तुमच्या आजाराचे निदान होईलच असे नसते...
फक्त हार्ट अटॅक असेल तर ecg मध्ये त्याचे तात्काळ निदान होते...(या प्रकाराला आमच्या भाषेत ST elevation MI अस संभोधतात)म्हणजे ecg वर स्पष्ट दिसणारा हार्ट अटॅक...
त्यातही कधी कधी जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये खुप लवकर पोहोचला असाल तर सुरुवातीला ecg अगदी नॉर्मल येऊ शकतो...
अशावेळी डॉक्टरांना तुमची लक्षणे हार्ट अटॅक सारखी वाटत असतील तर ecg 20-30 मिनिटानंतर परत काढून बघावा लागतो...
कारण जर हार्ट अटॅक असेल तर त्या ecg मध्ये वेळेनुसार बदल होत जातात आणि ते बदल पाहूनच डॉक्टर सांगू शकतात की तुम्हाला हार्ट अटॅक आहे किंवा नाही...
आता कधी कधी तुम्हाला हार्ट अटॅक आहे तरीही ecg अगदी नॉर्मल येऊ शकतो..(त्याला आमच्या भाषेत non ST elevation MI असे संभोधतात...)म्हणजेच ecg नॉर्मल असणारा हार्ट अटॅक...
मग त्यासाठी काही रक्ताच्या तपासण्या,2d ECHO अशा तपासण्या तुमचा हार्ट अटॅक ओळखण्यासाठी मदत करतात...
आता कधी कधी असं होतं की तुम्हाला छातीमध्ये त्रास होतो परंतु हॉस्पिटलमध्ये ecg काढला की तो प्रत्येक वेळेस नॉर्मल येतो(यामध्ये अनेक लोकांना या गोष्टींचा खूप अभिमान असतो...) मग याचा अर्थ तुम्हाला हार्ट चा काही आजार नाही असं बिलकुल नसतं... हा निव्वळ मनाच्या समाधानासाठी केलेला मूर्खपणा असतो...
कारण हे असं होऊ शकत.. ते का तर तुम्हाला एखाद्या रक्तवाहिनीमध्ये 90% ब्लॉक असेल आणि तुम्हाला त्रास झाला जसे तुम्ही थोडे तणावात असाल, काही काम केले असेल, भावनिक झाला असेल तेंव्हा तुमच्या हृदयाला जास्तीच्या रक्ताची म्हणजे ऑक्सिजन ची गरज असते... आणि तेंव्हा मग ecg मध्ये बदल झालेला असतो परंतु जेंव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता तुम्ही थोडे शांत झालेले असता आणि तेंव्हा हृदयाची रक्ताची गरज कमी झालेली असते आणि मग त्यावेळी ECG नॉर्मल येतो आणि आपण परत बिनधास्त होतो...
म्हणून सांगतो मित्रानो ecg इतका सोपा नक्कीच नसतो आणि त्यावरून अचूक निदान(जोपर्यंत ecg वरती दिसणारा हार्ट अटॅक तुम्हाला येत नाही...)अशक्य असते.... एक करडीओलॉजिस्ट बनण्यासाठी १४ वर्ष लागतात...त्याला देखील अचूक निदानासाठी बाकीच्या टेस्टचा आधार घ्यावा लागतो... म्हणून ecg पाहून डॉक्टरांनी किती ब्लॉक आहेत हे देखील सांगावे ही जी लोकांची अपेक्षा असते ती खुप अवास्तव आहे...
तर आता ecg कोणी करावा??
तर तुमचं वय कितीही असो तुमचा एक तरी ecg झालेलाच असला पाहिजे आणि तो तुम्ही सांभाळून ठेवला पाहिजे...(त्याची xerox काढून ठेवावी लागते कारण काही महिन्यानंतर तो मिटून जात असतो किंवा मग तुम्ही तुमच्या मोबाइल मध्ये त्याची pdf बनवुन ठेऊ शकता... सध्याच्या मोबाईल युगामध्ये सोपा पर्याय...)
कारण???
१.तुम्हाला काही जन्मजात आजार असेल तो लक्षात येऊ शकतो...
२.ब्लड प्रेशर चे निदान होऊ शकते
३.आणि एक सुरुवातीचा ecg तुमच्याकडे असेल तर त्यात काही नवीन बदल झाला तर तुमच्या डॉक्टरांना आजाराचे निदान करणे थोडे सोपे होऊन जाते...
म्हणून जसं सर्वांचा जन्माचा दाखला असतो तसा तुमचा एक ecg तुमच्याकडे हवाच...!!!
२.2D ECHO-
तर ही असते हृदयाची सोनोग्राफी...
आता सर्वाना असं वाटत असते की 2d echo नॉर्मल म्हणजे आपल्याला हार्ट चा कसलाही त्रास नाही आणि कुठलेही ब्लॉक नाहीयेत...
तर थांबा...!!! हा खूप मोठा गैरसमज आहे....!!!
त्यासाठी आपण echo मध्ये हृदयाशी निगडीत कोणते आजार पाहू शकतो ते पाहूया..
१.तुम्हाला जन्मजात काही छिद्र आहे का.?
२.तुम्हाला झडपेशी(valve) निगडित आजार आहे का ?
जसे valve लीक आहे किंवा आकुंचन पावला आहे का?
३.तुमच्या हार्टचे पंपिंग कमी झाले आहे का?
४.जन्मजात तुमच्या हृदयाचा आकार मोठा आहे का? या आजारामध्ये अचानक मृत्यू होण्याची शक्यता असते...(याला हायपरट्रॉफिक कॅरडीओमयोपॅथी असं म्हणतात)..
बऱ्याच देशामध्ये मुलांना शाळेत खेळामध्ये भाग घेण्यापूर्वी ही टेस्ट करावीच लागते... इतका त्याचं महत्त्व आहे...
फुटबॉल किंवा क्रिकेट खेळताना जे तरुण लोकांचे मृत्यू होतात त्या लोकांना हा आजार असतो...
आता प्रत्येकाने echo केलाच पाहिजे का???
तर बिलकुल नाही...
पण तो न करता डॉक्टरांनी तुम्हाला हार्ट चा काहीच आजार नाही हे सांगावे अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे...कमीत कमी हृदयरोग तज्ज्ञाकडून तर नक्कीच नाही... कारण आमच्याकडे सगळी साधने असून तुमच्या आजाराचे निदान चुकून झाले नाही तर ते कोणीच मान्य करणार नाही...
आता 2d echo कसा महत्वाचा ठरतो ते पाहू...
22 वर्षाची मुलगी माझ्याकडे opd मध्ये छातीमध्ये दुखत आहे म्हणून आली.. ECG/x-रे अगदी नॉर्मल होता...मी त्यांना छातीत दुखणे हे हृदयाशी निगडित नाही काळजी करू नका असं सांगितलं... परंतु तिचे आई वडील खूप परेशान होते त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती...त्यांनी 2d echo साठी आग्रह धरला... म्हणून मी ठीक आहे म्हणून 2d echo केला तर कळले की तिला 2 सेंटीमीटर चं छिद्र आहे...
तात्पर्य--काही आजार हे सुरुवातीला काहीच त्रास करत नाहीत आणि जेंव्हा त्रास जाणवतो किंवा ecg/xray वर दिसतात तेंव्हा वेळ निघून गेलेली असते... नंतर उपचार खूप अवघड असतो किंवा अशक्य असतो...
जर वरील मुलीचा echo झाला नसता तर काही वर्षांमध्ये तिला जेंव्हा त्रास चालू असता आणि तेंव्हाच echo केला असता तर अशी शक्यता असते की ऑपरेशन चा पर्याय च नसतो ती वेळ निघून गेलेली असते...
त्या मुलीचा echo तिला त्या छिद्रमुळे त्रास नसताना केला गेला म्हणून तिचे वेळेत ऑपरेशन होऊ शकले आणि आता तिच्या पुढच्या आयुष्यात तिला यामुळे कधीही त्रास होणार नाहीये...
आणि त्रास नसताना echo करणे याला आपण स्क्रिनिंग echo असं म्हणतो... ज्यामुळे आजार अगोदर पकडला जातो आणि उपचार योग्य वेळेत भेटतो..
आपल्या जिल्यात अशी अनेक मुलं मुली आहेत ज्यांना छिद्र आहेत परंतु त्यांची वेळेत निदान न झाल्यामुळे त्यांची ऑपरेशनस होऊ शकत नाहीत आणि आता ते 10-20 वर्षापेक्षा जास्त जगू शकत नाहीत...4 पावले चाललं तरी त्यांना दम लागतो अशी त्यांची परिस्थिती असते...
म्हणून वैद्यकीय क्षेत्र हे गणितासारखा नसतं...
इथे छातीत दुखतं म्हणून आलेला पेशंट नॉर्मल असू शकतो परंतु पोट दुखतंय म्हणून आलेला पेशंट हार्ट अटॅक असू शकतो...
म्हणून एखादा रिपोर्ट नॉर्मल आला म्हणून वाईट वाटून घेऊ नका...ते तुमच्यासाठी उत्तमच आहे... रिपोर्ट च्या पैशात आजार भेटावा अशी प्रार्थना करू नका🙏🏻
Stress test(स्ट्रेस टेस्ट)-
तर स्ट्रेस टेस्ट म्हणजे काय तर सरळ सरळ तुमच्या हृदयाची ऑक्सिजन ची गरज जाणीवपूर्वक वाढवून काढलेला ecg होय...!!!
या टेस्ट मध्ये आपण तुम्हाला एका पट्ट्यावर(हे सर्व जिम मध्ये असते)आपण चालवतो आणि तुमच्या हृदयाची ठराविक गती वाढवतो आणि ecg मधील बदल आपण पाहत राहतो... ज्यांना ब्लॉक आहेत त्यांच्या ecg मध्ये बदल दिसायला लागतात... त्यांनाही दम लागणे छातीत दुखणे अशी लक्षणे दिसून येतात... डायबेटीस च्या रुग्णांना खूपदा छातीत दुखत नाही..
मग स्ट्रेस टेस्ट कोणाची केली जाते...???
१.वय कमी आहे पण त्रास खूप आहे...डायबेटीस, बिपी, चरबीचा आजार नाहीये आणि लक्षणे हृदयाशी निगडित कमी वाटतात तेंव्हा स्ट्रेस टेस्ट केली जाते...
२.ज्यांना दरवर्षी काळजी म्हणून हेल्थ चेक अप करावयाचे असते...(मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या नोकरदार लोकांना आता हे दरवर्षी बंधनकारक आहे इतके ते महत्वाचे असते...कारण त्रास नसतो तेंव्हा देखील तुमचा आजार सुरुवातीच्या काळात पकडला जाऊ शकतो... आणि तात्काळ उपचार भेटले की तुम्ही तुमचे नॉर्मल आयुष्य जगू शकता)..
आपल्याकडे जेंव्हा त्रास होतो तेंव्हाच हॉस्पिटल ची पायरी चढायची असा जणू अलिखित नियम आहे... परंतु त्यामुळे हार्ट अटॅक मध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे कारण जेवढे हृदयामध्ये ब्लॉकेज जास्त असतात तेवढा मृत्यूचा धोका कित्येक पटीने वाढतो...
म्हणून कॅन्सर असो की हृदयविकार लवकर निदान म्हणजे लवकर उपचार आणि जास्त आयुष्य आणि तेही तुमच्या वयाच्या एखाद्या निरोगी व्यक्तीसारखेच हे विशेष...!!!
जसं कॅन्सर एकदा पूर्ण शरीरामध्ये पसरल्यानंतर उपचार खूप अवघड असतो त्याचप्रमाणे हृदयविकाराचे निदान खूप उशीरा झाल्यास मृत्यूचे प्रमाण खूप जास्त असते तेही योग्य उपचार भेटून सुध्दा...!!!
अंजिओग्राफी-
सर्वात महत्त्वाचे की ही एक टेस्ट असून कुठलेही मोठे ऑपरेशन नसते...
हृदयामध्ये महत्वाच्या तीन रक्तवाहिन्या असतात...अंजिओग्राफी मध्ये आपण या रक्तवाहिन्या मध्ये एक विशिष्ट प्रकारचे औषध देतो जे क्स रे मध्ये दिसते... जिथे ब्लॉक असेल तिथे हे औषध पोहोचू शकत नाही त्यावरून रक्तवाहिन्या मधील ब्लॉक ओळखले जातात...
आता अंजिओग्राफी कोणी करावी???
१.ज्यांना हार्ट अटॅक चालू आहे त्यांनी तर जितक्या तातडीने करता येईल तितक्या तातडीने करावी..
२.ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेला आहे..
३.ज्यांना डॉक्टरांनी सुचवले आहे
४.चालताना धाप लागणे, छातीत दुखणे, खांदा, हात दुखणे, थोडं जरी काम केले तरी खूप थकवा येणे,खूप घाम येणे, सरसर चालताना थांबावं लागणे,चालताना जेवण केल्यानंतर पाठ, जबडा, गळा दुखणे...
अपने दिल का खयाल रखना, क्यूकीं दिल एक ही होता है...!!!
डॉ अरुण शिवाजीराव बडे
MD DM interventional cardiologist
शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर, बीड
के एस के हॉस्पिटल अँड शिवाजीराव हार्ट केअर युनिट(कॅथलब डिव्हिजिन) बीड