
29/07/2025
*कभिन्न काळोख्या रात्री*
©वृषाली आठले
श्रावण महिन्यात दर वर्षी न चुकता आमची कोकणात एक फेरी असतेच.. हिरवं गार झालेलं आमचं कोकण म्हणजे निसर्गाचा आशिर्वाद आहे! डोंगर दऱ्या धबधबे ओढे नद्या सगळं अनुभवताना भान हरपणं म्हणजे काय ते कळतं. पंचमहाभौतिक असं हे बाह्य विश्व पंचज्ञानेंद्रियांनी समजून घेणं हा श्रावण महिन्यातला कोकणातला एक खास अनुभव असतो! गंध रस रूप स्पर्श आणि नाद ह्या पाच ही गोष्टी अनुभवायला नक्की श्रावण महिन्यात कोकणात यावं. पानफुलांचा गंध, विहिरीच्या पाण्याची चव, दिवसा चहूबाजूंनी दिसणारा हिरवा कंच रंग, भात शेतातून झाडाझुडपांतून येणाऱ्या थंडगार वाऱ्याचा स्पर्श आणि पशु पक्षांच्या किलबिलाटाचा, कोसळणाऱ्या पावसाचा, वाहणाऱ्या ओढ्याचा नाद..आयुष्य सार्थकी लागल्या सारखं वाटतं!
महालक्ष्मी चं दर्शन घेऊन तिथे पूजा करून कोल्हापूर वरून आंबा घाटातून कोकणात जाणं हा ठरलेला कार्यक्रम. आंबा घाट उतरताना जे काही धुकं होतं त्याचं वर्णन करणं अशक्य आहे. धुक्याचा धूसर रंग खरा की धुकं दूर झाल्या नंतर दिसणारा हिरवा कंच रंग खरा..हिरवा कंच रंग म्हणजे ही मायावी दुनिया आणि धूसर रंग म्हणजे सत्य का? असा विचार मनात येऊन गेला.. गेला ते बरं झालं..ही मायावी दुनिया इतकी सुंदर असताना कशाला असे विचार! नेहेमीच्या ठिकाणी उतरून मस्त गवती चहाचा आनंद घेतला, आणि धुक्यात गाडी काढत घाट उतरलो..पुढे रस्त्याचे काम चालू असल्याने साखरपा मार्गे न जाता देवरुख संगमेश्वर मार्गे व पुढे भातगाव मार्गे लांबलचक न संपणाऱ्या रस्त्याने गावाला पोहोचलो. पोहोचे पर्यंत संध्याकाळ झाली. पावसाळ्यात गाडी वरती डोंगरात ठेऊन पायी च खाली जावं लागतं. गाडी वरती रस्त्याजवळ ठेऊन समान घेऊन खाली उतरणं म्हणजे दिव्य होतं. मुसळधार पाऊस, निसरडी वाट..पाय जपून टाकत कसेबसे खाली घरी पोहोचलो. काळोख झालेला, घर उघडून आत येत नाही तर light गेले, ते जे गेले ते पुढे ३ दिवस आलेच नाहीत. कुठेतरी मेणबत्ती शोधून आम्ही दोघं आणि आमचे दिवाकर दादा, तिघांनी घर झाडून काढलं. ते जर आले नसते तर अख्खी रात्र आम्हाला कार मधेच बसावं लागलं असतं किंवा तशीच गाडी फिरवून कुठे दुसरी कडे हॉटेल वर रहावं लागलं असतं..म्हणजे कित्येक किलोमीटर दूर. सगळी साफसफाई करून
चहा केला आणि जे बसलो तेव्हा सगळं लहानपण आठवलं. आई बाबा किती वर्ष हे असं करत आले आहेत. दर वेळी मुंबई मधून आलं की हातात केरसुणी खराटा घेऊन सगळं घर स्वच्छ करा, मग पुढच्या अंगणापासून मागच्या पडवी पर्यंत सगळं घर पुसून काढा. मग चहा साखर हळद तिखट हिंग मोहोरी पासून संसार थाटा...तेव्हा कुठे आमटी भात जेवता येणार. पण दोघं भयंकर उत्साहाने सगळं करत आले. आम्ही मुलं काय जेमतेम २ ते ३ दिवस राहणार पण त्यांना तयारी करणं किती कठीण होतं हे आठवतं.
रात्री अक्षरशः पोहे करून खाल्ले आणि झोपायचं ठरवलं. Light येतील म्हणून वाट पाहून अख्खी रात्र गेली. मिट्ट अंधार, डोळे कितीही विस्फारून पाहिलं तरी जवळ असलेलं आपलं माणूस सुद्धा दिसत नव्हतं. नवऱ्याच्या भाषेत म्हणजे डोळे उघडले तरी स्वतःचेच डोळे उघडे आहेत की बंद ते ही कळत नव्हतं असा अंधार! पावसाने जोर धरला होता. वेड्या सारखा कोसळत होता. रात्री चित्रविचित्र आवाज येत होते. भीती वाटण्याच्याही पलीकडे गेलो होतो आम्ही दोघं. अख्ख्या गावात बाजूच्या एका घरात २ माणसं आहेत एवढी जाणीव सोडली तर सगळं भयानक च होतं. डोळ्यांना काहीच दिसत नसल्यामुळे मन अजूनच अंतर्मुख झालं. एकदम जाणवलं की आपण निसर्गापासून किती लांब गेलोय. हा गडद अंधार हे ही निसर्गाच च रूप ना..मग आपल्याला त्या अंधाराबरोबर समरस का नाही होता येत..आपण शहरात सतत उजेडात असतो, अगदी रात्री सुद्धा उजेड असतो आपल्या सोबतीला. सतत चकचकाट, सतत झगझगाट असतो आपल्या भोवती. गावाला आलं की सूर्यास्तानंतर चा संधिप्रकाश मग हळू हळू होणारा अंधार तीव्रपणे जाणवतो. इथे पहाटे पासून तिन्हीसांजे पर्यंत चुलीपाशी, गुरढोरांपाशी, शेतात राबणारे जीव ह्या अंधारात सहज मिसळतात, शांत होतात. घरातल्या देवघरात दिवे लागतात, तुळशीपाशी अंगणात दिवा लागतो, तसंच बाजूला गणपती च्या देवळात ठरलेल्या वेळी घंटा वाजते, आणि पूजा करणारा आमचा कांत्या दादा किंवा त्याची पत्नी गाभाऱ्यात दिवा लावतात. आत्ता श्रावणात घरी फुलणारं ब्रह्मकमळ दादा श्रद्धेनी देवाला वाहतो..त्या दोघांचा तो नेम पाहून छान वाटलं! कितीही पाऊस कोसळो, कुठलाही ऋतू असो ठरलेल्या वेळी देवळाच्या गाभाऱ्यात दिवा लागतो..आणि अंधारात गाभारा उजळून निघतो!
दिव्याने उजळून निघालेला गाभारा पाहिला आणि गणपती पुढे हात जोडताना सहज विचार मनांत आला की आता मी कधी अंधाराला नाही घाबरणार. अंधार म्हटलं की भय असं आपल्या मनात ठसलं आहे..त्यानंतर रात्री झोपताना आम्ही कंदील लावण्या ऐवजी घरातला मोठा तेल वातीचा दिवा घरांत एका कोपऱ्यात लाऊन च झोपलो. दोन्ही मधला फरक अनुभवला. फार शांत वाटलं! अंधारात प्रत्याहार सहज शक्य असतो असं जाणवलं! बहिरंग योगा कडून अंतरंग योगा कडे जाण्याचा मार्ग म्हणजे प्रत्याहार.. बाह्य विश्वाकडून हळू हळू स्वतःच्या आत डोकावणं.. दिवसभराची स्वतःची कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर बाहेर धावणाऱ्या चित्त वृत्ती शांत करणं, अंतर्मुख होणं हा अंधार आपल्याला शिकवतो असं वाटलं. एखादी गोष्ट मनाने समजून घेणं आणि मनाला समजून सांगणं अंतर्मुख झाल्यावर जमू लागतं.
"तत:परमा वश्यतेन्द्रियाणाम् "
© वृषाली आठले
Counseling Psychologist Psychotherapist
२९/७/२०२५