06/05/2026
*शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि अल्फा बाईट कॉम्प्यूटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता १२ वीच्या गुणवंतांचा भव्य सत्कार!*
आज दिनांक ६ मे २०२६ रोजी 'शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट' आणि अल्फा बाईट कॉम्प्यूटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता १२ वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव.डॉ.गिरीश देसाई, खजिनदार श्री.तुषार रंजनकर व विश्वस्त श्री.अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली 'अल्फा-बाईट' येथील हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या आतापर्यंतच्या कष्टाचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या भविष्यातील उच्च शिक्षणाच्या वाटचालीसाठी नवसंजीवनी देण्यासाठी संस्थेमार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या विशेष सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून 'इग्नाइट ॲकॅडमी'चे मुख्य समन्वयक श्री. संतोष पाटील, वरिष्ठ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक श्री. परशुराम शिंदे तसेच श्री. हरीश हुकुमानी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. तसेच, बदलत्या काळात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सातत्य आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व समजावून सांगितले. यानंतर, ट्रस्टचे खजिनदार श्री. तुषार रंजनकर, विश्वस्त श्री. अरविंद गारटकर आणि मंचावर उपस्थित असलेल्या इतर सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते १२ वीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते आपल्या पाल्यांचा सन्मान होताना पाहून उपस्थित पालकांच्या चेहऱ्यावरही कमालीचा अभिमान आणि आनंद होता. खजिनदार श्री. तुषार रंजनकर यावेळी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासोबतच या कार्यक्रमात समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सौ. सायरा अत्तार यांना नुकताच मानाचा 'राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे. या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल त्यांचा आणि श्री. हमीदभाई अत्तार यांचा या सोहळ्याचे औचित्य साधून विशेष सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या दांपत्याला पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आणि त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी इन्चार्ज श्री.दीपक जगताप, सागर कांबळे, केदार गोसावी, राहुल धायगुडे उपस्थित होते.