24/07/2020
*Covid-19 आणि वर्षाऋतू*
*भाग 1*
🤧😷 🌧️☂️☘️
गेल्या काही वर्षापासून *नेमेचि येतो मग पावसाळा*
या नियमाला सोडून 'जून' महिन्यात हमखास हजेरी लावणारा पाऊस , खूप उशिराने ,म्हणजे साधारण जुलैच्या मध्यावर सुरू होताना दिसतो आहे .
तोही मधेच काही वेळ इतका जोरदार पडतो , की सगळे जलमय होते आणि नंतर एकदम गायब होतो ,मग प्रचंड उन्ह पडते, जणू काही ग्रीष्म ऋतू सुरू झाला असे वाटावे !
हल्ली सगळयाच ऋतूंचे संतुलन काहीसे ढळल्यासारखे दिसत आहे , त्यामुळे नेमकी ऋतुचर्या काय सांगावी ,हाही एक प्रश्नच आहे .😇
त्यात कोरोनानेही आपला मुक्काम अपेक्षेपेक्षा खूपच जास्त लांबवलेला आहे ,अजूनही तो दीर्घकाळपर्यत आपल्याबरोबर राहणार अशी दाट शक्यता दिसत आहे.
खरतरं जरा नीट विचार केला , तर यासारखे अगणित जिवाणू -विषाणू या सृष्टीमध्ये पूर्वीपासून होते आणि पुढेही राहणार आहेत .
गेली 100 -150 वर्षे मानव जातीने विकासाच्या नावाखाली, निसर्गाविरुद्ध वागण्याचा जो चंग बांधलेला आहे, त्यामुळे निसर्गाचा समतोल मोठ्या प्रमाणावर ढळू लागला आहे. हा समतोल पुन्हा स्थापित करण्यासाठी कोरोना, वादळे ,पूर यासारखे वेगवेगळे इशारे देऊन , निसर्ग मानवजातीला स्वतःच्या वर्तनाचा पुनर्विचार करायला सुचवत आहे.पण तरीही आपण जागे न झाल्यास, मानव जातीचा विनाश अटळ आहे .
*निसर्ग ही शक्ती माणसापेक्षा विशाल-विराट आहे, तिच्याशी जुळवून घेणेच मानवजातीसाठी श्रेयस्कर आहे* हे आयुर्वेदाच्या थोर ऋषी महर्षींनी जाणलेले होते.
*निसर्गात प्रत्येक ऋतूनुसार बाह्य वातावरणात जे बदल होतात,त्यानुसार आहार -विहारात योग्य बदल करून, आपल्या शरीराचे संतुलन कसे राखावे, आरोग्य कसे उत्तम ठेवावे, हेच आयुर्वेदातील ऋतुचर्येत सांगितलेले आहे* .
कोरोनाच्या लढाईत निर्णायक ठरणारी
रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी , सध्या प्रत्येकजण धडपडत आहे .
*पण रोगप्रतिकार क्षमता ही काही फक्त औषधे घेऊन वाढत नाही, तर बाह्य वातावरणाशी संतुलन राखणारा आहार-विहार करणे*
(जो पचवणे शरीराला सहज, सोपे होते) ,
*हे रोगप्रतिकारक्षमता उत्तम ठेवण्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचे आहे* .
नदीच्या प्रवाहाच्या दिशेने पोहायचे असेल तर फारशी शक्ती वापरावी लागत नाही ,पण नदीच्या नैसर्गिक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहायचं असल्यास मात्र बरीच शक्ती खर्च करावी लागते , खूप ताण पडतो . *(निसर्ग नियमांच्या विरुद्ध वागत रहिल्यामुळे, जे सध्या आपणा बहुतेक लोकांचा बाबतीत घडत आहे )*
याचे ऋतूचर्येतील उदाहरण द्यायचं झाल्यास
पावसाळ्याच्या काळात हवेतील गारवा व दमटपणा वाढल्यामुळे पचनशक्ती मंद झालेली असते अशा वेळी चमचमीत भजी -वडे यासारखे पदार्थ वारंवार खाल्ले , तर ते पचवण्यासाठी पचनशक्तीवर खूप ताण पडतो ,असे जड अन्न नीट पचत नाही ,रोग निर्माण करणारा आमदोष तयार होतो ,शरीराचे पोषण नीट होत नाही, परिणामी शरीराची प्रतिकारक्षमता खालावते ,शरीर रोगांना चटकन बळी पडते.
त्याउलट पावसाळ्यात मंद झालेला अग्नी लक्षात घेऊन , पचायला हलके पदार्थ खाणे, आवश्यकतेनुसार उपास करणे असा ऋतुसुसंगत आहार विहार ठेवल्यास पचनशक्तीवर ताण पडत नाही ,अन्नाचे पचन उत्तम होते, शरीराचे नीट पोषण होते व परिणामी आपली प्रतिकार क्षमता उत्तम राहते ,शरीर निरोगी राहते.
आयुर्वेदात सांगितलेल्या *दिनचर्या व ऋतुचर्या* यांचे महत्व कालातीत आहेच , परंतु सध्या असलेल्या कोरोनामय वातावरणात हे सर्व समजून घेण्याची व आचरणात आणण्याची नितांत आवश्यकता जाणवत आहे ,म्हणूनच एवढ्या विस्ताराने लिहिले.
सध्या रोगप्रतिकार क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या औषधांचा मारा करण्याची जणू चढाओढच लागलेली आहे . *आपण कसेही वागायचे व केवळ औषधे खात राहायची ही स्वतःच स्वतःची केलेली शुद्ध फसवणूकचं आहे* .
*त्यामुळे निरोगी राहण्यासाठी केवळ औषधावर अवलंबून न राहता , त्याआधी आयुर्वेदात सांगितलेली योग्य जीवनशैली समजून घेऊन , ती आचरणात आणण्याचा प्रयत्न केल्यास , आपण नक्कीच अधिक निरोगी राहू ,हे सर्वांनी नीट लक्षात घेतले पाहिजे* .
तेव्हा आता पुढील काही भागांमधून जाणून घेऊया सध्या चालू असणाऱ्या *वर्षा ऋतूतील आहार विहाराबद्दल*
त्यामुळे सध्या रोगराईसाठी प्रसिद्ध असणाऱ्या वर्षा ऋतुतही आपण आपले आरोग्य उत्तम राखू शकणार आहोत .
धन्यवाद 🙏
*वैद्य उर्मिला पिटकर*,मुंबई
एम् डी (आयुर्वेद )
पी.एच.डी.
*आयुर्वेद व्यासपीठ*
कोकण विभाग अध्यक्ष