02/07/2025
आई मुळे डॉक्टर झालो, गुरूंमुळे आयुर्वेदिक डॉक्टर व पेशंट्स मुळे 'द आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर'....
इदं न मम्❗🙏🏻
1 जुलै 'डॉक्टर डे' निमित्त मिळालेल्या शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यांचेच❗🙏🏻
डॉक्टर होणं हे अनेकांचं लहानपणापासूनच स्वप्न असतं... व जे हे स्वप्न जिद्दीने पूर्ण करतात... त्यांच्या जिद्दीला खरंच सलाम !
खरं सांगायचं तर डॉक्टर होणं हे माझं वैयक्तिक स्वप्न कधीच नव्हतं, मी लहानपणी कधीच असा विचार केला नव्हता की मोठा होऊन मी डॉक्टर होईन... चार भिंतीत बसून काम करणं मला कधीच आवडत नव्हतं... फिल्ड वर्क आवडीचं, इंजिनिअर किंवा पोलीस होऊन ऍक्शन वर्क करण्याची इच्छा होती लहानपणापासूनच... (पोलीस होण्यासारखी अंगकाठी मात्र बिलकुल नव्हती ☹️)
लहानपणी खूप काही आजारी पडत नव्हतो, त्यामुळे डॉक्टरकडे जाणे व त्या प्रोफेशन विषयी आवड कधीच निर्माण झाली नाही. उलट हे डॉक्टर लोक दिवस दिवसभर कसे एकेठिकाणी बसून काम करतात याच विशेष वाटायचं... त्यामुळे 12 वी झाल्यावर डॉक्टर होईन अस ठरवलं नव्हतं... मार्क्स बरे होते त्यामुळे इंजिनिअरींगला ऍडमिशन देखील घेतलं... पण आवडीचा असा ट्रेड मिळाला नव्हता व कॉलेज देखील कोकणात लांब मिळालेलं, त्यामुळे तसा नाराज च होतो... आणि त्याच वेळी इकडे मेडिकलच्या राऊंडला पुण्याच्या टिळक आयुर्वेद कॉलेजला फ्री सीट मिळाली. त्यावेळी अलोपॅथी आयुर्वेद असा काही फरक माहीत नव्हता, MBBS म्हणजे BAMS पेक्षा जास्त चांगलं एवढंच वाटायचं... एकूण 2500 सीट्स होत्या त्या वेळी MBBS च्या आणि माझा स्टेट रँक होता 2489. त्यामुळे कुठेतरी MBBS ला ऍडमिशन मिळेल अस वाटत होतं... रिझर्व्हेशन बद्दल माहिती नव्हती, ती वयाच्या 18 व्या वर्षी मिळाली❗ असो... जो होता है, अच्छे के लिये ही...❗😃
आईला संधीवात (आमवात Rheumatoid Arthritis) चा त्रास अनेक दिवस होत होता, त्यामुळे तिला वाटायचं मुलाने डॉक्टर व्हावं व तिचा आजार बरा करावा... आईची इच्छा व इतर सारासार विचार करून इंजिनिअरींगची ऍडमिशन कॅन्सल करून BAMS ला ऍडमिशन घेण्याच ठरवलं❗
MBBS ला नाही पण BAMS च कोणतंही कॉलेज मिळत होत... त्यामुळे पुण्याच्या नामांकीत टिळक आयुर्वेद कॉलेजला ऍडमिशन घेतल.
ऍडमिशन घेऊन कॉलेज ला जॉईन झालो आणि संस्कृत या विषयाशी पहिली नजरानजर झाली आणि काळजाचा ठोका चुकला... बापरे 😱 हे कधीच शिकलो नव्हतो मी❗ शाळेत संस्कृत विषय असूनही सोप्पा हिंदी विषय घेतलेला होता आणि वयाच्या 18 व्या वर्षी संस्कृत सारखी क्लिष्ट भाषा शिकायची आणि आयुर्वेद शास्त्र हे सगळं संस्कृत भाषेतच लिहलेलं असतं... अस समजल्यावर बॅग भरून घर गाठलं मी... पण घरी आलो की आई पप्पा समजावून सांगायचे एवढं वर्ष जमेल अस काढ, पुढच्या वर्षी इंजिनिअरींगला पुन्हा घेऊ ऍडमिशन... असं किमान 4 - 5 वेळा तरी मी BAMS सोडून घरी आलो होतो आणि परत 2 दिवसात कॉलेज ला परत जात होतो❗😅
आणि या सगळ्या पळापळीत BAMS पहिल्या सहामाही परीक्षेत संस्कृत आणि अजून 1 विषयात नापास देखील झालो होतो. पण दीड वर्षाच्या कालखंडात हळूहळू रमलो, आणि पहिल्या वर्षात संस्कृत सह सगळ्याच विषयात पास देखील झालो❗🥳
संस्कृत सोबत सर्व आयुर्वेद विषय मराठीत वाचायला मिळत होते, समजत होते आणि आयुर्वेद च्या जोडीने अलोपॅथी देखील पूर्ण शिकवली जात होतीच कॉलेज मध्ये. इतर BAMS डॉक्टर्सप्रमाणे डिग्री मिळवायची आणि जनरल प्रॅक्टिस चालू करायची अशी आमच्यापैकी बऱ्याच जणांनी ठरवून पुढची वर्षे व इंटर्नशिप पूर्ण केली.
एखादा विषय हातात घेतला की त्याचा जमेल एवढा चांगला अभ्यास करायचाच व एकदा वाचलं तरी लक्षात राहण्याची देवाच्या व आईवडिलांच्या कृपेने बुद्धी मिळाली होतीच. त्यामुळे प्रॅक्टिस जरी जनरल करायची असली तरी आयुर्वेद शास्त्र देखील थोडथोड लक्षात घेत होतो.
इंटर्नशिप पूर्ण करून साताऱ्यात 2 वर्ष जनरल प्रॅक्टिस चालू केली, तेंव्हा देखील पुढे जाऊन कधी पूर्ण शुद्ध आयुर्वेदिक प्रॅक्टिस करेन अस वाटलं नव्हतं❗😃
या दरम्यान आईचा संधीवाताचा त्रास वाढतच चालला होता व बरेच मोठमोठे स्पेशालिस्टला दाखवूनही उपयोग होत नव्हता, रोज पेनकिलर, स्टिरॉइड्स गोळ्या किंवा इंजेक्शन घ्यावेच लागायचे... माझ्या प्रॅक्टिस मध्ये पण असे दिसायचे की अनेक आजारांना बरे करायची औषधेच मॉडर्न सायन्स मध्ये उपलब्ध नाहीत, फक्त सिम्पटोमॅटिक, लक्षणे कमी करणारी औषधे देऊन आजार पुढे ढकलला जात आहे, त्यात आई वडिलांचे संस्कार असे होते की चुकीच्या मार्गाने काही करायचं नाही, त्यामुळे गरज नसताना हायर अँटीबायोटिक्स, हायर पेनकिलर, उगाचच सलाईन च्या बॉटल्स चढवणे, स्टिरॉइड्स वापरणे जमत नव्हते, त्यामुळे प्रॅक्टिस मध्ये इंटरेस्ट येत नव्हता, डॉक्टर होऊन चूक केली हीच भावना मनात वाढत होती....
आईचे दुखणे सुद्धा वाढत चालले होते...
आणि एक दिवस माझ्या मित्राच्या सल्ल्याने आईला सातारा मधीलच आयुर्वेदिक वैद्य सुयोग दांडेकर सरांकडे घेऊन गेलो... सरांचे बोलणे, आजार समजावून सांगणे व त्यांनी केलेले आयुर्वेदिक निदान हे मनाला एवढं पटलं की वाटलं याला म्हणतात डॉक्टर, याला म्हणतात उपचार, आजार बरे करणारे...
आणि विशेष म्हणजे आईचा सुद्धा इतक्या वर्षाचा क्लिष्ट आजार कमी होऊ लागला, स्टिरॉइड्स बंद झाले, इंजेक्शन ची गरज कमी झाली, पेनकिलर च्या गोळ्या सुद्धा खूप कमी झाल्या. सरांच्याकडे वारंवार जाणे होऊ लागले, आयुर्वेदिक उपचार म्हणजे नेमकं काय❓ काय विचार करायचा असतो व त्याने रिझल्ट्स कसे मिळतात हे समजू लागले... आता वाटू लागलं की मी पण हे करू शकतो... माझ्या प्रॅक्टिस मध्ये आयुर्वेदिक औषधे वापरू लागलो आणि रिझल्ट्स पण मिळू लागले....
आणि एक दिवस विचार केला की जर पूर्णवेळ शुद्ध आयुर्वेदिक प्रॅक्टिस करायची असेल तर रस्ता बदलला पाहिजे... 2 वर्षाची माझी जनरल प्रॅक्टिस सोडून मी सरांच्या क्लिनिक ला जॉईन झालो... सुरुवातीला सरांच्या क्लिनिक मध्येच ओपीडी व पंचकर्म विभागात काम करू लागलो, मध्ये मध्ये प्रकृती रिसॉर्ट मध्ये केल्या जाणाऱ्या पंचकर्म उपचारांचा अनुभव मिळू लागला. दांडेकर सरांनी माझी आर्थिक बाजू सांभाळून घेतली, आईला तर त्यांच्याकडून सुरुवातीपासूनच मोफत उपचार चालू होते.
स्पेशालिटीच्या जमान्यात सरांनी मला एखादा स्पेशल विषय घेऊन अभ्यास करायला सांगितला. सरांकडे येणाऱ्या डायबेटीसच्या पेशंट्स ना आजार व्यवस्थित समजावून सांगण्याचे काम मी आवडीने करत होतो, त्यामुळे डायबेटीस वरील आयुर्वेदिक उपचार यावरच अभ्यास करायचा ठरवले.
डायबेटीस व इतर आजारांचे पुण्या-मुंबईचे, महाराष्ट्राच्या अनेक भागातून सरांकडे येणाऱ्या पेशंट्स चे अनुभव मिळू लागले.
सरांनी पुणे, मुंबई व महाराष्ट्राच्या अनेक भागात फ्रँचाईझीं सेंटर्स चालू केले तेंव्हा मला या ठिकाणी जायची संधी मिळाली.
2020 कोविड पर्यंत जवळपास 8 ते 9 वर्ष दर रविवारी पुण्याच्या कोथरूड भागात व 4 वर्ष दर शनिवारी मुंबईतील ठाणे, भांडुप, घाटकोपर, पनवेल भागात जात होतो. अधूनमधून नगर, जळगाव, कोल्हापूर, सांगली, इ. ठिकाणी सुद्धा तपासणी भेटी चालू होत्या. या सर्व ठिकाणी पेशंट्स चा अनुभव खूपच चांगला व उत्साहवर्धक होता. विशेष उल्लेख करावा वाटतो ते पुण्यातील पेशंट्सचा. खरंच पुणे शहर हे सुशिक्षित, सुजाण नागरिकांच शहर आहे... असा माझाच काय माझ्यासारख्या अनेक आयुर्वेदिक डॉक्टरांचा अनुभव आहे. आयुर्वेद शास्त्राला खरा लोकाश्रय दिला आहे तो पुणे शहरातील लोकांनीच❗
पुण्याच्या पेशंट्सची आयुर्वेद शास्त्रावर खूप श्रद्धा व विश्वास असतो, ते माझ्याकडून व्यवस्थित समजून घ्यायचे, सांगितलेल्या गोष्टी फॉलो करायचे, अगदी पहिल्या 2 - 3 व्हिजिट मध्ये लक्षणे कमी झाली नाहीत तरी पूर्ण बरे होण्यासाठी फॉलोअप ठेवायचे. मला आयुर्वेदिक प्रॅक्टिस मध्ये कॉन्फिडन्स देण्याचे काम, सर्वात जास्त प्रोत्साहन पुणेकर पेशंट्स कडून मिळाले, याबद्दल मी त्यांचा खूप मोठा ऋणी आहे. 🙏🏻
पुणे व महाराष्ट्राच्या अनेक भागातून अनेक जुने पेशंट्स आजही संपर्कात आहेत, फोनवरून ऑनलाइन कन्सल्टेशन चालू आहेत. अनेकांच्या कुटुंबातील सदस्य मला फॅमिली डॉक्टर प्रमाणे सल्ला विचारतात, उपचार घेतात.
आज देखील डॉक्टर्स डे निमित्त अनेकांनी फोन मेसेज मधून शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्व लोकांचे स्नेह असेच पुढे देखील मिळत राहो ही परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻
कोविड काळात बाहेरगावचा प्रवास पूर्ण बंद झाला व शेवटी मी देखील एका ठिकाणी स्थिर होण्याचा विचार केला... कोविड काळात सरकारी नोकरी जॉईन केली, व कोरेगाव या ग्रामीण भागात शुद्ध आयुर्वेदिक प्रॅक्टिस चालू केली आहे. विचार होता की गावाकडील लोकांना देखील आयुर्वेदिक उपचारांची जास्त गरज आहे, त्यामानाने शुद्ध आयुर्वेदिक प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स कमी.
सुरुवातीला सकाळी जॉब व संध्याकाळी प्रॅक्टिस असे पार्टटाइम काम चालू होते. पण आता सरकारी नोकरीचा बॉण्ड संपल्यानंतर राजीनामा देऊन पूर्णवेळ फक्त आयुर्वेदिक प्रॅक्टिस च करत आहे.
खेडेगावातील लोकांना आयुर्वेदिक उपचार करताना मात्र अगदी वेगळा अनुभव येतोय... एकतर खेड्यातील अनेक लोक अशिक्षित किंवा कमी शिकलेले असतात, आयुर्वेदिक उपचार म्हणजे नेमकं वेगळं काय हे त्यांना नीटस माहीत नसतं... अनेकांना तर आयुर्वेदिक डॉक्टर म्हणजे झाडपाल्याचे औषध देणारा गावठी वैदूच वाटतो. इथले लोक मोठे हॉस्पिटल, स्पेशालिस्ट डिग्री व गर्दी असणाऱ्या डॉक्टरांकडे लाईन लावून लोक उपचार घेतात. गर्दी जमवण्यासाठी ते डॉक्टर हायर अँटीबायोटिक्स, पेनकिलर, स्टिरॉइड्स इ. कोणते हातखंडे वापरताहेत हे बऱ्याच लोकांना समजत नाही, rather त्यांना याच्याशी काही घेणंदेणं च नाही. फक्त पटकन रिझल्ट आला पाहिजे❗ डायबेटीस, बीपी, संधीवात यासारख्या आजारांवर आयुष्यभर औषधे खात राहणे यात लोकांना काहीच गैर वाटत नाही. या ग्रामीण भागात डिग्री नसणाऱ्या भोंदू डॉक्टरांची संख्या देखील बरीच आहे. सध्या तर सोशल मीडिया वरून जाहिरात करून MLM प्रॉडक्टस आयुर्वेदाच्या नावाखाली खपवणाऱ्या एजंट्सचे तर खूप प्रमाण वाढले आहे. एकंदर इथल्या सर्वसामान्य लोकांची आरोग्य परिस्थिती अगदी बिकट आहे. कोरोना च्या काळात सरकारी नोकरीत असताना सर्वसामान्य लोकांचे झालेले हाल फार जवळून पाहायला मिळाले होते मला❗
अशा वातावरणात गेली 5 वर्षे मी प्रॅक्टिस करत आहे. अनेक पेशंट्स ना आजार व उपचार समजावून सांगत आहे. यातून हळूहळू लोक चांगल्या आयुर्वेदिक उपचारांसाठी येऊ लागले आहेत, इतरांना आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रोत्साहित करत आहेत. दिवसेंदिवस आपली ।। श्री श्रद्धा आयुर्वेद ।। फॅमिली वाढत आहे याचा खूप मोठा आनंद आहे मला.
आज 1 जुलै डॉक्टर्स डे निमित्त या सर्व जुन्या-नव्या पेशंट्सनी, नातेवाईकांनी सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल सर्वांचे खूप खूप आभार 🙏🏻
मला घडवण्यासाठी, डॉक्टर बनवण्यासाठी माझ्या आईवडिलांनी घेतलेल्या कष्टाबद्दल तर मी त्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही.
पांचभौतिक चिकित्सा पद्धतीचे प्रणेते परमगुरु वैद्य दातारशास्त्री, मला आयुर्वेद शास्त्राची ओळख करून देणारे माझे गुरू वैद्य सुयोग दांडेकर सर, वैद्य दामले सर, वैद्य आव्हाड सर, वैद्य म्हेत्रे सर व इतरही सर्व गुरुवर्य यांना शतशः नमन 🙏🏻
व सर्वात महत्वाचे तुम्ही माझे पेशंट्स, ज्यांच्या अनुभवातून एक फॅमिली डॉक्टर म्हणून मी घडत आहे.
"क्वचित् धर्मः क्वचित् अर्थः क्वचित् मैत्री क्वचित् यशः। कर्माभ्यासः क्वचिच्चेति चिकित्सा नास्ति निष्फलाः।।"
डॉक्टर म्हणून काम करताना मला देखील तुमच्याकडून कधी धर्मपालन, कधी पैसा, कधी मैत्री, कधी यश, कधी कर्माभ्यास मिळाला, चिकीत्सा कधीच निष्फळ होत नाही हे सिद्ध झाले.
पुनश्च सर्वांचे खूप खूप धन्यवाद 🙏🏻
आपलाच 'द आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर' 👨🏻⚕️
डॉ.उदय पाटील
।। श्री श्रद्धा आयुर्वेद ।।
फॅमिली हेल्थ क्लिनिक व पंचकर्म सेंटर,
कोरेगाव & सातारा.
फोन - 082087 13119
।। Shree Shraddha Ayurved ।।