20/06/2025
रुग्णालयात दाखल (admit) होताना....
१) रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी किती डिपॉझिट द्यावे लागते ?
बहुतांश मोठया खाजगी (कॉर्पोरेट ) रुग्णालयात सामान्य आजाराच्या उपचाराकरिता दाखल होताना किमान १०,०००/- रु डिपॉझिट द्यावे लागते.
रुग्ण गंभीर असल्यास ICCU मध्ये दाखल करण्याकरिता किमान ५०,०००/- रु. डिपॉझिट द्यावे लागते.
विशिष्ट शस्त्रक्रिये करिता रुग्णालयात दाखल होताना शस्त्रक्रियेच्या खर्चाच्या (estimate) ५०% ते ८०% इतकी रक्कम अगोदर द्यावी लागते.
नमूद केलेले डिपॉझिट रुग्णालय प्रकार आणि कोणत्या प्रकारच्या बेडच्या श्रेणी नुसार (जनरल, प्राव्हेट रूम, सूट इ.) बदलते. ही माहिती सर्वसाधारण कल्पना यावी याकरीता दिली आहे. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना योग्य नियोजन करता येईल आणि अनावश्यक तणाव टाळता येईल.
२) धर्मदाय रुग्णालयामध्ये ठराविक बेड मोफत किंवा सवलतीच्या दरात सेवा देण्याकरता उपलब्ध असतात. धर्मदाय रुग्णालयात उपचार घेण्यापूर्वी त्या रुग्णालयात मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचाराकरिता बेड उपलब्ध आहेत का ?, याची चौकशी करावी.
३) राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना किंवा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत सेवा देण्याऱ्या रुग्णलयांची माहिती करून घ्या.
४) हार्ट अटॅक ची शक्यता असणाऱ्या रुग्णांना, जवळील ज्या ठिकाणी कॅथलॅब आहे अशा रुग्णालयातच दाखल करावे.
५) स्ट्रोक / पक्षाघात या आजाराच्या उपचाराकरता ज्या ठिकाणी सिटीस्कॅन किंवा एमआरआय उपलब्ध आहे अश्या रुग्णालयात (stroke-ready hospital) उपचार घ्यावेत.
६) व्हेंटिलेटर ची आवश्यकता असलेल्या रुग्णांनी, रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध आहे की नाही याची माहिती करून घ्यावी.
७) आपल्याकडे मेडिक्लेम असल्यास आपल्या जवळील कोणत्या रुग्णालयात कॅशलेस सेवा उपलब्ध आहे याची माहिती करून घ्या. कॅशलेस सेवा रुग्णलयात उपलब्ध नसल्यास, ऍडमिट झाल्यानंतर इन्शुरन्स कंपनीला २४ तासात कळवा.
८) आपणापैकी अनेक जण मोठ्या प्रमाणात सेविंग अकाउंट मध्ये पैसे ठेवत नाही. आपण अधिकचे पैसे किंवा इमर्जन्सीकरिता लागणारे पैसे फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवतो. अचानक पैसे लागल्यास बँकेच्या वेळेत जाऊनच हे पैसे काढावे लागतात. फिक्स डिपॉझिट सुद्धा इंटरनेट बँकिंग मधूनच काढावे. आपल्याकडे इंटरनेट बँकिंग ही सुविधा उपलब्ध असल्यास कोणत्याही वेळात आपण आपले फिक्स डिपॉझिट काढू शकतो शकतो. मोठी रक्कम द्यायची असल्यास आपल्या जवळच्या व्यक्तींच्या मदतीने त्यांच्या यूपीआय किंवा डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड मधून हे पैसे आपण देऊ शकता. डेबिट कार्ड द्वारे पैसे काढण्याकरिता मर्यादा असते, ती मर्यादा वाढवून घेता येते.
९) बहुतांश मोठ्या रुग्णालयामध्ये समुपदेशक उपलब्ध असतात. यांच्याकडून आपल्या आजारासाठी साधारणपणे किती पैसे लागणार आहेत याचे इस्टिमेट घ्यावे.
१०) रुग्णालयात जाताना आपल्या बरोबर आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी असल्यास त्याची प्रत बरोबर ठेवावी.
११) नेहमीच आपल्या सोबत एक किंवा दोन किमान व्यक्ती असल्यास बरे. अनेकदा फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी आपल्या जवळच्या लोकांची गरज लागते. औषध आणि इतर आवश्यक वस्तू आणण्याकरता सुद्धा आपल्या बरोबर काही व्यक्तींची गरज लागते.
१२) आपले सर्व रिपोर्ट्स, औषधे सोबत ठेवा.
१३) १०८ क्रमांकावर महाराष्ट्र सरकार तर्फे दिली जाणारी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध आहे.
डॉ.अरुण कुऱ्हे
जेष्ठ फॅमिली फिजिशयन