24/03/2025
#शुद्धvsअशुद्ध चिकित्सा #पथ्यपालन
आयुर्वेद शास्त्रात पथ्यपालन करण्यावर खूप जोर असतो. त्यामुळे अनेकवेळा अनेक रुग्ण आयुर्वेदशास्त्राकडे वळत नाही. काहीही खा, गोळ्या घ्या आणि लक्षणे कमी करा, ही चिकित्सा रुग्णास आणि त्यांच्या नातेवाईकास सहज आणि सोपी वाटते.
परंतु, अनेकवेळा असे दिसते, की अशाप्रकारे पथ्यपालन न करता केली गेलेली चिकित्सा ही लक्षणे जरी कमी करत असली तरी त्या चिकित्सेचा परिणाम हा काही काळच टिकतो आणि नंतर थोडे दिवसातच दोष पुन्हा लक्षणे वाढू लागतात अथवा त्याच शरीरात राहिलेल्या दोषांमुळे इतर रोग निर्माण होतात आणि त्यामुळे चिकित्सेचा कालावधीही वाढतो. मग ती आयुर्वेदचिकित्सा असो अथवा आधुनिक चिकित्सा, दोन्हीमध्ये हे होऊ शकते.
आयुर्वेदातील काही औषधे आता सामान्य जनतेला माहित झालेली असल्याने अनेकवेळा रुग्ण आम्हाला फोन करून सांगतात “अहो, ताप आला होता तेव्हा एक वेळेस आम्ही महासुदर्शनच घेतले, ताप नाही उतरला म्हणून paracetamol घेतले. मग आमचे प्रश्न असतात त्यात आम्ही जाणून घेत असतो कशाने ताप आला, पथ्यपालन केले का? त्यावर अनेकवेळा रुग्णास उत्तर देणे शक्य होत नाही कारण अनेकवेळा झटपट चिकित्सा करण्याच्या नादात रुग्ण जी महत्त्वाची गोष्ट आहे “पथ्यपालन” हे सोडून सर्व करत असतो.
चिकित्सा आयुर्वेद असो अथवा आधुनिक, ज्या कारणामुळे रोग लक्षणे निर्माण झाली आहेत, ते कारण जर बंद केले गेले नाही तर रोग निर्माण होण्याची प्रक्रिया ही चालूच राहते आणि त्यामुळे चिकित्सेला यश मिळत नाही. मग, आयुष्यभर औषधे घेणे हे अपरिहार्य असते. जे सध्या अनेक रोगात डायबेटिस, रक्तदाब, थायरॉईड, PCOD, इ मध्ये केले जाते. यालाच आयुर्वेदशास्त्र “अशुद्ध चिकित्सा” असे म्हणतो.
त्याचप्रमाणे एका रोगाची चिकित्सा सुरू केल्यावर जर तो रोग/लक्षणे बरी झाल्यावर दुसऱ्या रोगाची लक्षणे उत्पन्न झाली तर ती ही “अशुद्ध चिकित्सा” आहे. हे सुद्धा आयुर्वेद आणि आधुनिक दोन्ही शास्त्रातील चिकित्सेने घडू शकते..जसे painkiller/antibiotic घेतल्यावर शरीरातील उष्णता वाढणे. कफासाठी उष्ण औषधे घेतल्याने पित्त वाढणे इ. मग अशावेळी औषधामुळे त्रास न होण्यासाठी अजून काही औषधे घ्यावी लागतात. जसे painkiller/antibiotic बरोबर antacid इ. त्यामुळे चिकित्सा अशी असावी की त्याने झालेला रोग बरा होईल आणि पुन्हा दोष उत्पन्न होणार नाहीत. यालाच “शुद्ध चिकित्सा” म्हणतात. योग्य पथ्यपालन करणाऱ्या रुग्णांमध्ये, अशा शुद्ध चिकित्सेमुळे चांगले परिणाम दिसतात.
आयुर्वेदानुसार पथ्यपालन करत असताना वैद्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
रोगानुसार/रुग्णानुसार कोणते पदार्थ टाळावेत. कोणते घ्यावेत. पथ्यकर पदार्थ कोणते.
कोणत्या वेळी कोणते पदार्थ घ्यावेत ….जसे कफ वाढवणारे पदार्थ फळे, अधिक गोड असणारे पदार्थ हे कफाचा रोग असणाऱ्यांनी घेऊ नये.
किती दिवस पथ्यपालन करायला हवे. काही प्रकृतीमध्ये लंघनही काही काळच करावे लागते. अधिक काळ लंघन म्हणजेच लघु आहार घेऊनही अग्नि बिघडू शकतो.
कोणत्या पदार्थांचे नियमाने पथ्य आवश्यक आहे हे रुग्णांनी समजून घ्यायला हवे.
असे केल्यास आहारानेच/पथ्यानेच रोगावर मात करणे शक्य होते आणि औषधी चिकित्सा कमी घ्यावी लागते.
वैद्य मेघना बाक्रे
©VdMeghanaBakre
゚