16/01/2023
मकरसंक्रांतपर्व आणि आरोग्य
मकरसंक्रांतीचा सण हा देशभरात वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. मकरसंक्रांत, मकर संक्रमण, लोहरी, उत्तरायण, मकरविलक्कु, पोंगल, बिहू, पौष सोंगक्रांती, खिचडी पर्व, पेद्दा पंदुया अशा विविध नावांनी हा सण भारतभर ओळखला जातो.
मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि हा काळ सौर महिना म्हणून ओळखला जातो.
आता ह्या सणाचे वैज्ञानिक महत्त्व जाणून घेऊया.
सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्याने हा काळ ऋतुसंधीचा काळ मानला जातो आणि शरीरात बदलांना सुरुवात होते. आणि हाच तो काळ असतो जेव्हा आजारांना निमंत्रण मिळते. सर्दी, ताप खोकल्याचे रुग्ण ठिकठिकाणी पाहायला मिळतात.
जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी पडते आणि शरीराला उबेची, उष्णतेची गरज असते. संक्रांतीला तीळगूळ सेवन करण्यामागे हेच कारण आहे. तीळ हे उष्ण गुणधर्मी, तसेच शरीराला स्निग्धता प्रदान करणारे असतात. बाजरीची भाकरी देखील तीळ लावून आवर्जून केली जाते, कारण बाजरी देखील उष्ण गुणात्मक असते. आहारात या पदार्थांचा अंतर्भाव केल्याने शरीरात उष्णता आणि स्निग्धता निर्माण होऊन रुक्षता आणि थंडीपासून बचाव होण्यासाठी मदत होते.
याशिवाय या काळात मटार, गाजर, हिरव्या पालेभाज्या यांची रेलचेल असते. बाजारात पुष्कळ प्रमाणात हे उपलब्ध असते. त्यांचा सढळ हस्ते स्वयंपाकात वापर केला जायला हवा. यामागील शास्त्रीय कारण म्हणजे हिवाळ्यात आपला जाठराग्नी प्रदीप्त असतो ( थोडक्यात सांगायचं तर, थोड्या थोड्या वेळाने भूक लागते आणि खाल्लेलं सहजरीत्या पचतंदेखील.) अशा वेळी सीझनल फळे, भाज्या, तीळगूळ, तिळाच्या पोळ्या, शेंगाच्या पोळ्या, बाजरीची भाकरी, गाजराचा हलवा, मटारचे विविध पदार्थ, पुष्कळ तूप घालून डाळखिचडी ह्यांचा आहारात समावेश केला की ते सहज पचून जाते.( वाण म्हणून सुगडामध्ये जे भरलं जातं, ते ऊस, बोरं, डहाळा, मटार, घेवडा हे शेतीतले सीझनल प्रॉडक्टच आहेत.)
असं पूर्वीच्या काळी म्हटलं जायचं, की थंडीतला व्यायाम हा शरीरासाठी लाभदायी असतो. आता थंडीत अंथरुणातून बाहेर पडायला नको वाटतं हा भाग निराळा, पण खरंच एकदा का उठून चालणे, पळणे किंवा घरच्या घरी व्यायाम केला, की शरीरात ऊब, उष्णता निर्माण होऊन ती या थंडीच्या दिवसांत दिवसभरासाठी एनर्जी देते.
याशिवाय हाडांची दुखणी, गुडघा, पाठ, कमरेची दुखणी या काळात जोर धरतात. पादाभ्यंग, स्नेहाभ्यंग असे आयुर्वेदाने सांगितलेले उपाय याच काळात केले जातात आणि यासाठी तीळ तेल, मोहरीचे तेल, खोबरेल तेल, महानारायण तेल, काही आयुर्वेदिक medicated oils वापरली जातात, ( आयुर्वेदानुसार शरीरात थंडीच्या काळात वात प्रकोप झालेला असतो. त्याचे शमन ह्या तेलांनी होते.) जेणेकरून शरीर स्निग्ध राहील आणि शरीराला कार्यरत राहण्यासाठी आवश्यक वंगण मिळू शकेल.
संक्रांतीला काळे कपडे परिधान करावेत असं म्हटलं जातं पण केवळ तेव्हाच नव्हे, तर सर्वसाधारणपणे हिवाळ्यात गडद अथवा काळ्या रंगाचे कपडे घातल्याने त्यात उष्णता शोषली जाऊन शरीराचे रक्षण होते, असे विज्ञान सांगते.
तर अशा प्रकारे ह्या संक्रांती पर्वाचा आणि आपल्या आरोग्याचा गहन संबंध आहे.
त्यामुळे हिवाळ्यात आपली आणि आपल्या प्रियजनांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि सगळ्यांना संक्रांतीच्या आरोग्यदायी शुभेच्छा..
डॉ. अनुजा डोके.
9561174891