18/06/2023
*कानगोष्टी* 1
"मला काही सांगायचंय!!"
"अरे पण का? तुला का काही सांगायचे आहे?"
"अरे, युद्धाच्या कथा लोकांना ऐकायला आवडतील, एखादी सुंदर कविता किंवा गोष्ट लोक वाचतात, पण डॉक्टर चे लेख?"
" दुसऱ्यांनी लिहिलेले डॉक्टरी लेख तू तरी स्वतः नीट वाचतोस का? " "डॉक्टरी लेख ते पण कानातला मळ, नाकामधील शेंबूड आणि घशामधील कफ याबद्दल लोकांना किती वाचायला आवडेल? पेशंट म्हणून येणे आणि मुकाट्याने तुझे तेव्हा ओपीडी मधील बोलणे ऐकणे वेगळे आणि काहीही त्रास नसताना तुझे विचार ऐकणे यात फरक आहे. उगाच कशाला लिहीत आहेस?"
असा विचार माझ्या मनात बरेच वेळेला आला आणि इतके वर्षे वैद्यकीय व्यवसाय करत असताना लिहायचा विचार बारगळला. दुसऱ्या बाजूला घरामधील सौ आणि खूप पेशंट तू काही तू काहीतरी लिही, असेच सारखे सांगत होते. लिही किंवा आजच्या काळा नुसार एखादी Reel किंवा व्हिडिओ तरी बनव असे मागे लागले होते. मला ते पटत पण होते, म्हणुन आज श्रीगणेशा करत आहे. हा रंग किती दिवस टिकेल हे माहित नाही पण आज पहिला लेख लिहितो आहे.
एखादा पेशंट ओपीडी मध्ये आला आणि त्याने त्याला काय होतंय? हे सांगण्याच्या आधी तो दवाखान्यात दरवाजा उघडून खुर्चीत कसा बसला आणि मग त्याच्या खुर्चीवरून पेशंट तपासायच्या खुर्चीवर कसा बसतोय, त्याच्याबरोबर कोण आले आहे या गोष्टीवरून त्याने काय त्रास होतोय हे सांगण्याच्या आधी आम्हाला खूप गोष्टी समजल्या असतात. हे खूप लोकांना कदाचित पटणार नाही, पण माझ्या आधीच्या पिढीमध्ये सर्व मोठे डॉक्टर हे पेशंट चालत येतानाच सांगायचे की याला काय झाले आहे. पेशंट डोळे वरती खालती करून पहिले वाक्य बोलला की तपासायच्या आधी त्याचे निम्मे डायग्नोसिस झालेले असते. या पेशंटच्या सायकॉलॉजी वरती खूप वाचायला आवडतील असे खूप विषय आहेत त्याबद्दल वेगळे बोलणारच आहे. पण आज मात्र काना बदल बोलूयात.
कानाचे तसे आजार खूप आहेत म्हणजे सगळ्यात मोठा आजार हा दुसऱ्यांनी कान भरणे हा आहे, कानपिळणे, कान हलका करणे किंवा कान फुंकणे हे पण मोठे प्रॉब्लेम च आहेत. ह्या म्हणी मराठी भाषेत इतक्या मस्त आहेत. मराठी भाषा खूपच समृद्ध आहे. कुठल्याही भाषेपेक्षा जास्त समृद्ध आहे, असो.
सगळ्यात कॉमन आजार आहे तो म्हणजे कानाच्या पडद्याला भोक पडणे. त्यातून सर्दी झाल्यावर पू येणे, कानाचे हाड खराब होणे, ऐकायला कमी येणे, चक्कर येणे, वयाच्या मानाने ऐकायला कमी येणे, सतत वेगळा आवाज येणे असे कानाचे खूप कॉमन आजार आहेत. आपण त्याच्याविषयी एक एक लेखांमध्ये बोलूच.
आपण बाहेरच्या कानापासून सुरुवात करू. कानाचा पडदा जो आहे त्याच्या बाहेरील कान हा बाहेर चा कान.
मधला कान पडद्याच्या आत जो आहे तो. जिथे ऐकायची तीन हाडे असतात.
आतील कान मध्ये ऐकायची नस आणि balancing organ असते.
आजच्या लेखांमध्ये फक्त बाहेरील काना बद्दल लिहितो. म्हणजे लेख खूप मोठा होणार नाही आणि लोक वाचतील.
बाहेरील कान कधीतरी जन्मतः नीट तयार होत नाही. त्याला Anotia म्हणतात, जे ऑपरेशन करून नीट करता येते. किंवा पैलवान मध्ये सतत मार लागून cauliflower Ear होतो. Bat एअर deformity मध्ये बाहेरील कान पुढे येतो. जे ऑपरेशन करून बरे करता येते आणि बाहेरील कान नॉर्मल दिसायला लागतो.
कानामधील दागिने खूप जड घातले की नंतर कान ओघळतात, म्हणजे कानाची पाळी ओघळते भोक मोठे होते. दागिना नीट बसत नाही आणि नंतर त्याला टाके घालावे लागतात. यामध्ये पण बाहेर खूप ठिकाणी कुठल्यातरी प्रकारचे स्टिकिंग मिळते की ज्यांनी चिकटवून कानाची भोक बुजवता येतात. पण अशा गोष्टी मुळे बाहेरची स्किन आत राहून तिथे keloid नावाची गाठ तयार होते ज्याचे पुढे जाऊन ऑपरेशन करावे लागते. कान ओघळले असल्यास सर्जन कडे जाऊन नीट शिवून घ्यावेत. असे काहीही चिकटवण्याचे प्रयोग करू नका. कानामध्ये घालताना पण किंवा कान लहानपणी टोचताना पण सराफांकडे जाऊन आधी disinfect निर्जंतूकरण करूनच मगच कान टोचून घ्यावेत. शक्यतो पहिल्यांदा कान टोचताना शुद्ध सोन्याचे किंवा असे चांगलेच कानात घालावे. कमी दर्जाचे काही घातलेत, तर कॉपर किंवा त्याच्या केमिकल reaction मुळे कानाच्या पाळीची इन्फेक्शन होऊ शकतात. ती टाळण्याजोगी आहेत. तसेच खूप जण खूप ठिकाणी कान टोचतात विशेषता कार्टीलेज मध्ये जर कानात टोचले तर पुढे जाऊन तिथे इन्फेक्शन, keloid असे रोग होऊ शकतात.
पुढचं आहे ते म्हणजे कानामध्ये मळ तयार होणे. कानामध्ये मळ म्हणजे काय तर आलेला घाम आणि मेलेल्या पेशी यांचे ते मिक्चर असते. मळ हा कोरडा कोंड्यासारखा पांढरा कोरडा असू शकतो किंवा चॉकलेटी रंगाचा ऑईली पण असू शकतो. 99% टक्के लोकांना कधीही आयुष्यात कान नाक घसा डॉक्टर कडे जाऊन कान साफ करावा लागत नाही. किंवा घरच्या घरी पण साफ करावा लागत नाही. कारण हा आपला self cleaning organ आहे. तो आपणहून साफ होतो आपणच काही तरी कानात काड्या घालून, चावी, पिना घालून हा मळ आत ढकलतो आणि त्रास करून घेतो. अशा कानामध्ये पिना चाव्या इयर बर्ड्स घालू नये, त्यांनी इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात. विशेषतः डायबिटीस लोकांनी तर कानामध्ये काहीही घालू नये. कारण ते इन्फेक्शन कधीतरी मेंदूपर्यंत ही जाण्याची शक्यता असते. विशेषता psudomonous नावाचा बॅक्टेरिया आणि वाढलेली साखर हे जर का एकत्र आले तर तो धोका खूप हानिकारक असू शकतो.
अजून एक आहे की कानात तेल घालावे की नाही घालावे? सगळे आयुर्वेदिक डॉक्टर मित्र सांगतात की कानामध्ये तेल घालावे. पण माझं वैयक्तिक मत असे आहे की तेल घालू नये. कानामध्ये तेल घालून कानात बुरशी होणे किंवा कानाच्या पडद्याला भोक असेल आणि ते तेल कानात गेले तर मोठे इन्फेक्शन होते. विशेषता पावसाळ्यात कानात तेल टाकले की कानात बुरशी होते. तेला बरोबर लसूण मोहरी असे फोडणीचे पण पदार्थ टाकण्याची पद्धत आहे. माझा सल्ला असा राहील की असे तेल हे फोडणीत टाकून जेवण तयार करायला वापरा, कढईमध्ये टाका, पण कानात टाकू नका.
या पुढील भागात कानाचा पडदा, त्याची ऑपरेशन, कानातील आवाज, Tinnitus आणि चक्कर याविषयी बोलू.
लेख कसा वाटला ते नक्की सांगा..😊
डॉ विरेंद्र घैसास
कान नाक घसा तज्ञ
पुणे
18 जून 2023