27/06/2016
---आपणही बदलायला हवं !---
परंपरा ! जी एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे विचारांचे फारसे निकष न लावता पाठवली जाते ती ? की ; जी बदलत्या काळाच्या बदलत्या गरजांनुसार प्रत्येक पिढीगणिक आपलं रूप बदलत पुढे जाते ती ?
बांधिलकी ! दोन व्यक्ती एकत्र येऊन एक प्रवास सुरु करतात आणि एकत्रच चाललं पाहिजे, दुसर्याचं वेगळं अस्तित्व रहाताच कामा नये असा अट्टाहास बाळगतात, ती बांधिलकी ? की दोन व्यक्ती एकत्र येऊन एक प्रवास सुरु करतात आणि एकत्रपण जपतानाही परस्परांतल्या स्व-भावाचा आदर आणि जपणूक करतात ती बांधिलकी ?
हे सगळं नुसतं शब्दांत मांडण्याइतकं वरवरचं न राहता याच्या खोलात जाऊन विचार व्हायला हवा. भूमिका बदलत आहेत, अपेक्षा बदलत आहेत, आपणही बदलायला हवं.
एक सशक्त आणि समृद्ध अशा समाजाचा पाया म्हणजे त्या समाजाचं अर्थकारण, शिक्षण आणि कुटुंबव्यवस्था. असं अर्थकारण जे त्यातल्या प्रत्येक घटकाला सक्षम करतं आणि स्वतः सशक्त होत रहातं. शिक्षण या शब्दांत कोर्सेस, अॅडमिशन, ग्रेड, सर्टिफिकेट, डिग्री, डिप्लोमा यापेक्षा अजून फार पुढचा अर्थ अपेक्षित आहे. शिक्षण- शिकणं, मिळत असलेल्या माहितीच्या ओघातून नेमकं ते वेचणं, त्यावर स्वतः विचार करण, स्वतःची तार्किक, भावनिक, सामाजिक बैठक पक्की करणं, त्यानुसार तारतम्याने वागणं, विविध कौशल्य आत्मसात करणं आणि व्यक्ती म्हणून विकसित होत रहाणं म्हणजे शिक्षण. आणि कुटुंबव्यव्स्था म्हणजे जिथे भावनांचं पोषण होतं, आदर, प्रेम काळजी, विश्वास यांची देवाणघेवाण होते, सुरक्षितता पुरविली जाते, आपलेपणाच्या भावनेने व्यक्ती जोडलेल्या असतात ते सशक्त कुटुंब. आणि अशा सशक्त कुटुंबाचा कणा असतो एक सशक्त लग्न !
उत्क्रांतीची पाने उलटी उलगडत गेलं तर असं लक्षात येतं की माणसाला स्थैर्य, सुरक्षितता आणि आपलेपणा हवासा वाटू लागल्यावर समाजव्यवस्थेचा उगम झाला. विविध इच्छा, आकांक्षा, राग, लोभ इत्यादी भावना आणि सत्ता, सत्तेसाठी संघर्ष अशा विविध बाबतीत माणसाचं इतर प्राण्यांपेक्षा वेगळेपण निर्माण होउ लागलं. विचारांच्या जोरावर माणूस गतिशील राहिला आणि पुढे आला. इतरही सजीवांमधे कमी- अधिक प्रमाणात संगती, कुटुंब तयार होणं हे घडत गेलंच. पण माणसाचं विश्व समृद्ध होत गेलं ते या तीन स्तरांवर झालेल्या प्रगतीमुळे - अर्थकारण, शिक्षण आणि कुटुंब-व्यवस्था.
काळ थांबला नाहीये, तो सरकतोय पुढे. माणसाची गती मंदावली नाहीये. तो वेगाने पुढे जातोय. कक्षा रुंदावत आहेत, भावविश्व बदलत आहेत, भूमिका बदलत आहेत, अपेक्षा बदलत आहेत. त्याच्या भावनिक गरजांचं पोषण जिथे होतं त्या कुटुंबाचं रूप बदलतंय. त्या रुपामधे हरवलेला परंपरेचा चेहरा हताशपणे शोधत बसण्यात अर्थ नाही; किंवा अतिपुरोगामी विचारांच्या अधीन होण्यातही अर्थ नाही. व्यक्तिगत आणि सामाजिक स्तरावर प्रत्येक गोष्टीत बदल होतोय. त्यावर विचार व्हायला हवा. प्रश्न पडायला हवेत. ते मांडायला हवेत.
ट्रान्झिशन, ट्रान्स्फॉर्मेशन, ट्रान्सेडन्स वगैरे शब्द फक्त ह्युमॅनिटी सायन्सेसच्या रिसर्च पेपरपुरते मर्यादित न राहता ते आपल्या रोजच्या जगण्यात मिसळायला हवेत. प्रवाह बदलत असेल तर भोवतालच्या परिस्थितीशी त्या प्रवाहाला थोडं झगडावं लागतं. थोडं परिस्थिती नमतं घेते, थोडं प्रवाह नमतं घेतो. मानवी जगणं समृद्ध करत असेल अशा मूल्यांना धरून हे बदल घडत असतील तर ते स्वीकारार्ह आहेत. किमान त्यावर सर्व भूमिकांमधून विचार नक्कीच व्हायला हवा. रुढींचा टणकपणा, कठोरपणा थोडा कमी केला आणि आवळून घेतलेल्या कक्षा डोळसपणे सैलावल्या तर या स्थित्यंतराकडे बघण्याची एक नवी दॄष्टी मिळू शकेल. विनाकारण काहीच नको. अकारण पेटून आंधळं बंडही नको. आणि पांगळी श्रद्धाही नको.
विवाहसंस्थेचं चित्र झूम इन करत करत दिसणार्या प्रत्येक पैलूपाशी थोडं थांबणार आहे. नाती जोपासण्यासाठी लागणारी कौशल्ये, पाश्चात्य गोष्टींचा प्रभाव, बांधिलकी, अनिश्चिततेची भिती, संवाद कौशल्य अशा वेगवेगळ्या विषयांवर डॉ. शिरिषा साठे यांच्याशी चर्चा करून ते मुदद्दे आपल्यासमोर मांडणार आहे व आपल्या मतांची वाट पाहणार आहे. कुटुंबसंस्थेकडे आणि पर्यायाने विवाहसंस्थेकडे नव्या विचाराने पाहण्याच्या प्रयत्नाला या लेखाने सुरुवात.
- कल्याणी काणे