13/01/2023
*वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेतर्फे सन 2022 चे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान*
आयुर्वेद पुनर्स्थापित करण्यासाठी नि:स्पृह कार्याची गरज : वैद्य विनय वेलणकर
*जागतिकस्तरावर आयुर्वेद पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी दादा उर्फ वैद्य परशुराम खडीवाले यांच्या व्यापक कार्याचा आदर्श ठेवून आयुर्वेदींच्या अजून दोन-एक पिढ्यांनी सतत नि:स्पृहपणे रूग्णांची सेवा करण्याची गरज आहे. विविध वैद्यकीय पॅथींमधील प्रत्येकाने समन्वयातून समाजहितासाठी एकत्रितपणे कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन आयुर्वेद व्यासपीठाचे संस्थापक अध्यक्ष वैद्य विनय वेलणकर यांनी येथे केले.*
वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेतर्फे दिल्या जाणा-या 38 व्या वैद्यकीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
एरंडवणे येथील धन्वंतरी सभागृहात रविवारी (ता. ८ जानेवारी 2023 रोजी) झालेल्या या समारंभाच्या व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष वैद्य स. प्र. सरदेशमुख, विश्वस्त वैद्य विनायक खडीवाले, प्रमुख पाहुणे वैद्य विनय वेलणकर, डॉ. यू. एस्. निगम, वैद्य जयंत देवपुजारी आदि उपस्थित होते.
आयुर्वेद आणि वन-औषधींच्या कार्यात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेल्या राज्यातील 12 जणांना वैद्य वेलणकर यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदाच्या महर्षि अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कारासाठी मुंबईतील प्रा. डॉ. यु. एस्. निगम यांना मानपत्र, रोख रक्कम आणि स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.
विविध वैद्यकीय पॅथींमधील समन्वयाची दरी वाढत चालली असून त्यांच्यातील अहंकाराच्या भिंतींना तडा देत प्रत्येकाने समाजहितासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन वैद्य वेलणकर यांनी यावेळी केले. प्रा. डॉ. निगम यांच्यासह पुरस्कारार्थींनी त्यांची मनोगते व्यक्त केली. वैद्य विनायक खडीवाले यांनी प्रास्ताविक केले. वैद्य विवेक साने यांनी पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला.
वैद्य संगीता खडीवाले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. योगेश गोडबोले यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
*पुरस्काराचे नाव आणि पुरस्कारार्थी याप्रमाणे:-*
· वैद्य पुरुषोत्तमशास्त्री नानल चरक पुरस्कार: वैद्या योगिता जमदाडे (पुणे);
· वैद्य द. वा. शेण्ड्ये रसौषधी पुरस्कार: वैद्य पंकज निकम (नाशिक);
· वैद्य वि.म. गोगटे वनौषधी पुरस्कार: वैद्या माधुरी वाघ (नागपूर);
· वैद्य बाळशास्त्री लावगनकर पंचकर्म पुरस्कार: वैद्य श्रीनिवास दातार (कल्याण);
· वैद्य बापूराव पटवर्धन सुश्रुत पुरस्कार: वैद्य संजय गव्हाणे (पुणे);
· वैद्य भा. गो. घाणेकर अध्यापन पुरस्कार: वैद्या अनया पाथरीकर (मुंबई);
· वैद्य मा. वा. कोल्हटकर संशोधन पुरस्कार: वैद्य प्रसाद देशपांडे (नागपूर);
· वैद्या लक्ष्मीबाई बोरवणकर स्त्री वैद्या पुरस्कार: वैद्या अनुपमा देवपुजारी (नागपूर);
· वैद्य शंकर दाजीशास्त्री पदे कार्यकर्ता पुरस्कार: वैद्य राजेंद्र खरात (नाशिक);
· पूज्य पादाचार्य रचनात्मक कार्य पुरस्कारः वैद्य सुकुमार सरदेशमुख (पुणे)
· डॉ. वा. द. वर्तक वनमित्र पुरस्कार: सचिन पुणेकर (पुणे)
आचार्य वैद्य यादवजी त्रिकमजी ग्रंथ पुरस्कार: वैद्य रविंद्रनाथ जवळेकर (सोलापूर)