31/07/2025
*आयुर्वेदिक पंचकर्म याबद्दल माहितीपर लेख*
*पंचकर्म – व्याधिप्रतिबंधात्मक व व्याधीनिवारणार्थ*
मुळात व्याधी होऊ नये यासाठी (Preventive )आणि आजार झालाच तर झालेला आजार कमी करण्यासाठी(Curative )आयुर्वेदिक पंचकर्म उपचार पद्धती
(Panchkarma For ” Prevention” of Diseases and
to “Treat” Diseases )
रुग्णांचा नेहमी एक प्रश्न असतो , पंचकर्म म्हणजे काय ? मग मसाज म्हणजे पंचकर्म का ? शिरोधारा म्हणजे पंचकर्म का ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात .
जाणून घेऊ यात पंचकर्म विषयी
पंचकर्म म्हणजे सोप्या भाषेत शरीरशुद्धी साठी केले जाणारे पाच प्रकारची चिकित्सा उपक्रम
१) वमन
२) विरेचन
३) बस्ती
४) रक्तमोक्षण
5) नस्य
या पाच चिकित्सा उपक्रमांनाच पंचकर्म म्हणणे अपेक्षित आहे बाकी इतर जे उपक्रम आहेत म्हणजे शिरोधारा , स्थानिक बस्ती उदा. जानुबस्ती , मन्याबस्ती आदींचा समावेश पूरक पंचकर्म उपचारांमध्ये होतो .
पंचकर्म उपचारांसाठी प्रथमतः आमपाचन करणे आवश्यक आहे . त्यांनतर कर्म करण्याआधी स्नेहन स्वेदन हे पूर्वकर्म करावे व त्यानंतर च बस्ती आदी कर्म करावे . दोषस्तिथी व व्याधीनुसार योग्य ते पंचकर्म व नंतर पश्चात धूम, गंडूष, संसर्जनक्रम अशी कर्मे केली जातात .
पंचकर्म म्हणजे शोधन उपचार .
आता प्रश्न असा पडतो कि हे का करायचे ?
मग कुठलाही व्याधी नसताना पंचकर्म घेता येते का ?
पंचकर्माचे प्रयोजन
१) निरोगी व्यक्तिंमध्ये
निरोगी व्यक्तींनी शरीरशुद्धी म्हणजे DETOXIFICATION साठी ऋतू नुसार पंचकर्म हे अवश्य घ्यावे .
आजकाल सिडेंटरी लाइफस्टाइल यामुळे मेटाबोलिक डिसऑर्डर्स वाढत चालले आहेत .
स्थूलता , कमी वयात मधुमेह , रक्तदाब यांसारखे व्याधी यामुळेच वाढत आहेत . हे टाळण्यासाठी शरीरशुद्धी होणे अत्यावश्यक आहे . यासाठी ऋतूनुसार जे पंचकर्म सांगितले आहे ते आवर्जून घ्यावे .
वसंत ,शरद,वर्षा या ३ ऋतूंमध्ये अनुक्रमे वात , पित्त , कफ या दोषांचा प्रकोप होतो त्यामुळे या काळात त्या त्या दोषांचे शोधन करावे . वसंतात वमन , शरद ऋतूमध्ये विरेचन , रक्तमोक्षण व वर्षा ऋतूमध्ये बस्ती आदी पंचकर्म उपचार तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने नाडी परीक्षणांनंतर सुरु करावेत .
२) रसायन – वाजीकरण
रसायन चिकित्सा याचा अर्थ रस , रक्त इत्यादी सर्व सप्तधातू प्राकृत करून आयुष्य वर्धन करणारी चिकित्सा . वाजीकरण – शुक्रधातू प्राकृत करून आयुष्य वर्धन करणारी चिकित्सा .
या दोन्ही चिकित्सा सुरु करण्याआधी शरीरात वाढलेले दोष , मल इत्यादी पंचकर्म चिकित्सेने शरीराबाहेर काढून टाकणे अत्यावश्यक आहे .
INFERTILITY वंध्यत्व यावर चिकित्सा करत असताना तसेच स्त्री व पुरुष बीजशुध्दी साठी पंचकर्माच्या या प्रयोजनाचा आश्चर्यकारक अनुभव येतो . म्हणूनच PRECONCEPTION शोधन चिकित्सा , गर्भधारणा होण्याआधी स्त्री व पुरुष दोघांनी अवश्य घ्यावी .
३) व्याधीनुसार
विविध व्याधींमध्ये औषधी चिकित्सेसोबत पंचकर्म केले तर उत्तम परिणाम दिसून येतात . उदा. मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी,हाडांची झीज,वाताचे आजार यामध्ये बस्ती या पंचकर्माचा चांगला उपयोग होतो.बस्ती सारखे पंचकर्मातील कर्म तर वरदान आहे , यामुळेच बस्ती ला अर्धचिकित्सा म्हंटले आहे.
दमा, तमकश्वास च्या रुग्णांमध्ये वमन केले असता ASTHMA ATTACKS कमी होतात . रुग्णाला आराम पडतो .
PSORIASIS, रक्तदुष्टी, पिंपल्स,पित्ताचे त्रास असल्यास विरेचन , रक्तमोक्षण याचे खूप छान रिझल्ट्स येतात .
मायग्रेन , शिरोरोग, केसगळती , अकाली केस पांढरे होणे , दमा , वारंवार होणारी जुनाट सर्दी , इत्यादी व्याधींवर नस्य लाभदायक आहे . नस्य म्हणजे नाकात औषधी तेल किंवा घृताचे थेंब टाकणे .
योग्य प्रकारे रुग्णाची माहिती घेऊन त्याची प्रकृती , वय ,बल कामाचे स्वरूप, पूर्वी झालेले आजार, सध्याची लाईफ स्टाईल, खाणे पिणे, व्यायाम रोजच्या सवयी या सर्व व इतर अनेक बाबींचा विचार वैद्याद्वारे केला जाऊन त्यानंतर कोणते पंचकर्म करायचे हे ठरवले म्हणजेच व्यक्तीच्या प्रकृती व गरजेनुसार कर्म करताना कोणते तेल वापरावे कोणता काढा व औषधे बस्ती साठी किंवा पंचकर्मासाठी वापरावी हे वैद्याने अचूक ठरवावे लागते.
केले जाणारे पंचकर्म उपचार योग्य प्रकारे व्हावेत यासाठी रुग्णाने किंवा पंचकर्म करून घेणाऱ्या व्यक्तीने सर्व नियम पाळून कर्म केले म्हणजे पंचकर्माच्या काळामध्ये हलका आहार घेणे ,पचायला जड पदार्थ बंद करणे , वेळेवर झोपणे लवकर उठणे विनाकारण प्रवास दगदग जागरण या गोष्टी न करणे. आहाराची विहाराच्या पथ्य पाळणे या गोष्टी पाळून कर्म केले तर त्याचे खरंच खूप चांगले परिणाम दिसतात.
बऱ्याच लोकांची अशी धारणा असते की पंचकर्म करून शरीरशुद्धी केली म्हणजे मी काहीही करायला मोकळा किंवा आता शरीर शुद्धी झाली म्हणजे मी कसेही वागले तरी चालेल. तसे मुळीच नाही पंचकर्म करून शरीर शुद्ध झाल्यानंतर नको असलेल्या गोष्टी शरीरातून निघून गेल्या आता चांगला आहार विहार दिनचर्या पाळून ते शरीर निरोगी राखणे ही नंतरची आपलीच जबाबदारी आहे.आठवडा घालवून पूर्ण साफ आणि नीटनेटके केलेले घर मी पुन्हा अस्तव्यस्त केले तर परत आवरायला त्रास होणारच ना? त्याप्रमाणे पंचकर्म करून शरीरशुद्धी केल्यानंतर व्यक्तीने पुन्हा आजार होऊ
नयेत यासाठी योग्य खबरदारी घेणे देखील आवश्यक आहे.
अशा पंचकर्मांमुळे पूर्वीचे सर्व त्रास कमी होऊन रुग्णाचे आयुष्य वाढते , quality of life सुधारते दोषस्तिथी , व्याधिअवस्था , रुग्णाचे कोष्ठ , अग्नी , सामता इत्यादी गोष्टींचा विचार करून तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्म करावे .
पुढील श्लोकात आचार्य चरकांनी अतिशय सुंदर पद्धतीने पंचकर्म चे फायदे सांगितले आहेत .
” एवं विशुद्ध कोष्ठस्थ कायाग्नी अभिवर्धते !
व्याधयोश्चउपशामयंती प्रकृतिश्चानुवर्तते
इंद्रियांनी मनोबुद्धीवर्णश्चास्य प्रसीदति !!
बाळ पुष्टिर्पत्यम चा वृषता चास्य जायते !
जरा कृछएन लभते चिरंजीवथनाम: !!”
अशा प्रकारे पंचकर्म हे व्याधी प्रतिबंधात्मक(मुळात आजार होऊ नये यासाठी शरीर शुद्धी करून घेणे) व व्याधीनिवारर्णार्थ (झालेला आजार बरा करण्यासाठी) असे आहे. अनेक व्याधींमध्ये याचे आश्चर्यकारक परिणाम दिसून येतात , योग्य औषधी चिकित्सा व योग्य पंचकर्म यामुळे अनेक असाध्य व्याधींवर विजय मिळवता येतो .
आपण गाडी इत्यादि निर्जीव असलेल्या यंत्राची देखील सर्विसिंग नियमित करतो, घरची साफसफाई दर सणासुदीला करतो, मोबाईल साठी अनेक क्लिनींग अॅप्स वापरतो . विचार करा आपले शरीर तर चोवीस तास अव्याहतपणे चालणारे यंत्र आहे. त्याची काळजी वर्षानुवर्षे आपण घेत नाही .. detoxification, शरीरशुध्दी याची नितांत आवश्यकता आपल्या शरीराला आहे .
त्यामुळे निरोगी व्यक्तींनी वैद्यांच्या सल्ल्यानुसार पंचकर्म अवश्य घ्यावे.
94226 00636