16/05/2025
भारतीय लोकशाहीचे आरोग्य सुदृढ होण्याकरिता…
‘आरोग्य वारी’ दरम्यान लोकांशी होणारा संवाद हा माझ्यासाठी सामाजिक वर्तवणुकीचा अभ्यास आणि औत्सुक्याचा विषय आहे. सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी राजकीय परिस्थिती बदलणे अत्यावश्यक असल्यामुळे लोक राजकारणाविषयी कसे व्यक्त होतात, त्यांची मतदानाविषयी वर्तवणूक नेमकी कशी आहे, याबाबत मी सतत चर्चा करत असतो आणि त्यात माझ्यासाठी सर्वात मोठा विषय म्हणजे ‘मतदान करण्यासाठी मतदारांनी थेट पैसे घेणे.’
खरं सांगायचं तर अलिकडच्या काळात निवणुकीला उभे राहिलेले उमेदवारसुद्धा या विकृतीला वैतागले आहेत, असं त्यांच्यांशी बोलल्यावर लक्षात येतं. पैसे घेतल्याशिवाय लोकं मतदान करण्यासाठी येतंच नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे. यातील सर्वात वाईट गोष्ट अशी की पैसे वाटण्यामुळे निवडणुकीचा खर्च फुगत जातो आणि त्यामुळे तुमच्या-आमच्यासारखा सामान्य कुटुंबातला मुलगा/मुलगी निवडणुकीला उभं राहण्याचा विचारच करत नाही.
मतदानाच्या एक दिवस आधी एखाद्या गावात कोणता उमेदवार किती पैसे वाटतो (गावातील प्रत्येक व्यक्तीला), याचा “भाव फुटतो” व त्या ‘भावा’बद्दल निरनिराळ्या चर्चा सुरू होतात. असे असूनही मला या गोष्टीची उत्सुकता लागून राहिलेली असते की, अमुक एका उमेदवाराकडून पैसे घेतल्यानंतर लोकं त्याच उमेदवाराला मतदान करतात का? आजकाल बहुतांश उमेदवार पैसे वाटप करतात. अगदी गरीबातला गरीब उमेदवारसुद्धा तजवीज करून थोडेफार पैसे वाटण्याचा प्रयत्न करतो. मग ज्याचे पैसे जास्त त्या उमेदवारास लोकं मतदान करतात का? की सगळ्यांचे पैसे घेऊन त्यांना ज्या उमेदवाराला मतदान करायचं असतं, त्याला किंवा तिलाच मतदान करतात?
शर्ट घालताना पहिलं बटण लावायचं चुकलं तर पुढची सर्व बटणं आपोआपच चुकतात. तसं लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या आदल्या रात्री पैसे घेतले तर लोकशाहीचे सर्व हेतू पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतात.
‘आरोग्य वारी’च्या निमित्ताने मी एका गावात गेलो होतो. तिथे मी सहजच विचारलं की, “तुमच्या गावात मतदानासाठी पैसे घेतात का, की पैसे घेतल्याशिवाय मतदान करता? किंवा एखाद्या छोट्या निवडणुकीला पैसे न घेता मतदान करता येऊ शकतं का? अथवा मतदानासाठी पैसे घ्यायचेच नाहीत, असं ठरवता येईल का?” ��गावक-यांसोबत गावातल्या निरनिराळ्या समस्यांविषयी चर्चा सुरू होती. त्यांना मी विचारलं , ‘लोकप्रतिनिधींकडे तुम्ही या समस्यांबाबत काही पाठपुरावा करता का?’ तर त्या गर्दीतला एक माणूस मला म्हणाला, “”डॉक्टर साहेब निवडणुकीच्या काळात मताच्या बदल्यात उमेदवाराकडून पैसे घेतले असतात. मग कुठल्या तोंडाने तुम्ही त्यांच्याकडे समस्या सोडवण्याची विनंती करणार?”
मी म्हटलं, “अगदी अडिचशे लोकसंख्येचं गाव आहे तर एखाद्या वर्षी आपण ठरवून पैसे नको घेऊया. पुढची पाच वर्षे आपल्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधीला धारेवर धरूया. तर एक गावकरी म्हणाला, “गावं जेव्हा छोटी होतं, लोकं गरीब होती, तेव्हा निव़णुकीच्या आदल्या दिवशी गावातील लोकं जमायची आणि ठरवायची की आपण कोणत्या उमेदवाराला मतदान करायला हवं. मग कुणी किती पैसे दिले तरी ते नाकारून ठरवून मतदान केलं जायचं. पण गेल्या वीस वर्षात गावातील लोकांकडे थोडाफार पैसा आला. एकमेकांशी असलेला संवाद तुटला. प्रत्येकजण आपापला वेगळा विचार करतात आणि आता सगळेच पैसे घेतात.”
गावक-याचं हे म्हणणं ऐकून मी आश्चर्यचकीत झालो. एका सर्वसामान्य शेतक-याचं हे निरीक्षण मला नोंदवण्यासारखं वाटलं. निवडणुकीपूर्वी उमेदवाराने पैसे वाटण्याचा आणि मतदारांनी पैसे घेण्याचा हा कॅन्सर कधी कसा जाईल माहित नाही. परंतु मला वाटते की आरोग्य वारीत भेटलेल्या माणसांना मी मतदान करण्यासाठी पैसे घेण्यापासून परावृत्त करू शकलो, तरी ‘आरोग्य वारी’च्या माध्यमातून भारतीय लोकशाहीचे आरोग्य सुदृढ होण्यास मदत होईल.
तुमच्या गावात याविषयी कोणता प्रवाह आहे, याविषयीचे मत मला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. मला वाचायला आवडेल.
- डॉ. अमोल अन्नदाते