Vrushali Athale

Vrushali Athale *Counseling Psychologist*Psychotherapist
*Marriage Counselor*Relationship counselor
*Career Counselor*Writer

कोकण- संघर्षातलं सौंदर्य © वृषाली आठले         चार घरांचे गाव        चिमुकले पैलटेकडीकडे..       शेतमळ्यांची दाट लागली  ...
01/03/2026

कोकण- संघर्षातलं सौंदर्य
© वृषाली आठले
चार घरांचे गाव
चिमुकले पैलटेकडीकडे..
शेतमळ्यांची दाट लागली
हिरवी गर्दी पुढे!
बालकवींच्या कवितेत दिसतं आमचं गाव. गाडी गावाजवळ जायला लागली रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारी प्रत्येक खूण खुणावते असं वाटतं. ह्या वेळी वाटेतल्या प्रत्येक आंब्याला मोहर होता, प्रत्येक काजू वर मोहर होता. करवंदावर छान फुलं होती. मनात आलं की इतकं छान मोहरुन यावं ते ह्या झाडांनीच..माणसांना असं जुनं विसरून नव्याने नाही मोहोरता येत. गाडीच्या खिडकीच्या काचा खाली करून त्या मोहोराचा गंध श्वासात भरून घेत होते मी. प्रत्येक वळण ओळखीचं.. प्रत्येक झाड ओळखीचं..लाल मातीने माखलेले रस्ते पायवाटा जणू दर वेळी विचारतात की 'अगं किती दिवसांनी आलीस बये!' माझी आजी मला बाया म्हणायची. हा खास कोकणातला शब्द, बाया..तिच्या त्या बाया हाक मारण्यात गोडवा होता. प्रत्येक वेळी गावाला जाताना मनात येतं की आत्ता आजी असती तर तिला किती कौतुक वाटलं असतं की नात आई बाबांना घेऊन गावाला येतेय, राहतेय. असं वाटलं आत्ता आई बाबांबरोबर ती असती तर तिला ही घेऊन आले असते. तिचीही सेवा केली असती. पण वय थांबत नाही ना. ना तिचं वय थांबलं, ना आई बाबांचं थांबलं, ना माझं थांबलं. वय, वेळ, काळ, सगळं पुढे सरकत राहतं. आपण मात्र लगबगीने त्याबरोबर धावतो.
ह्यावेळी ठरवून आई बाबांबरोबर गावाला राहिले. कोकणात राहणं सोपं नाही. प्रत्येक बाबतीत संघर्ष असतो. आपण कधी नव्हे ते जाणार मग घराची साफसफाई हा मोठ्ठा उद्योग असतो. मी तर जाताना गाडीतून सगळा संसार घेऊन जाते. संसार म्हणजे अर्थातच स्वैपाकघरात लागणारं सगळं काही हे बायकांच्या लक्षात येईलच. आमचे दिवाकर दादा आणि वासंती मदतीला येतात म्हणून शक्य होतं सगळं. अख्खं घर धुवून पुसून काढून, सामान भरून मग सुरवात होते. घर लाऊन अंघोळ करून देवापाशी आणि तुळशी पाशी दिवा लावला की खरी तिथल्या संसाराला सुरुवात होते. प्रसन्न वाटतं!
हल्ली खूप लोकं कोकणात पर्यटनाला येतात. आणि खूप कौतुक करतात इथल्या निसर्गाचं. आपण कोकणचे आहोत ह्याचा कमालीचा अभिमान आहे मला. पण ह्या फिरायला चार दिवस येणाऱ्या लोकांना सांगावसं वाटतं की कोकणात राहणं आणि कोकणात फिरायला जाणं ह्यात खूप फरक आहे. इथे राहणं आव्हानात्मक आहे असं मला लहानपणापासून वाटत आलं आहे. डोंगराळ भाग, नद्यांचे प्रवाह, कुठे समुद्र ,खाडी किनारपट्टी हे सगळं खूप सुंदर आहे..पण अजूनही गावागावात चांगले रस्ते नाहीत. एक बस चुकली की पुढे कितीतरी वेळ दुसरं वाहन मिळत नाही. किराणामाल लांबून आणावा लागतो. जवळपास दुकानं नाहीत. शाळा कॉलेज वैद्यकीय सुविधा सगळ्यासाठी अजून ही खूप दूर जावं लागतं. पावसाळ्यात अतिवृष्टी मुळे लोकांचा एकमेकांशी संपर्क तुटतो. प्रत्येक गावात अजून फोन लागत नाहीत. ह्या आणि अशा अनेक अडचणी आपल्याला जाणवतात. मात्र इथली स्थानिक माणसं ह्या अडचणींना आपलसं करून सहज जगतात. भयंकर कौतुक वाटतं मला ह्याचं!
ह्या वेळची माझी ट्रिप वेगळी ठरली ह्याची काही खास कारणं आहेत. ह्यावेळी ह्यातल्या एक एक अडचणीने माझा आणि मी अडचणींचा पिच्छा पुरवला! गावांत २ घरांमध्ये wifi बसवल्याचं समजलं होतं. माझ्या काकानी पण बसवलं..मग लगेच काकाशी बोलून त्या माणसाला बोलवून आधी घरी wifi घेतलं. तो दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा की काय असं वाटलं. ज्या गावात फोन करण्यासाठी अख्खा डोंगर चढून जावं लागायचं त्या गावात आमच्या प्रत्येक घरात चक्क फोन, whatsapp कॉल , वगैरे शक्य झालं होतं. ह्या आनंदात चार दिवस गेले आणि चार दिवसांनी wifi बंद झालं म्हणून त्या माणसाला बोलावून बघायला सांगितलं तर बघितल्यावर थंडपणे त्यानी सांगितलं " वानराने उडी मारून ती cable तोडून टाकली आहे"..मग काय फ्रिज बिघडला, टीव्ही बिघडला मग दुसऱ्या गावातून माणसांना बोलाऊन त्याची दुरुस्ती. सगळं झाल्यावर लक्षात आलं की ह्या सोयी सुविधांशिवाय आपण जगू शकत नाही हेच खरं. एरवी आम्ही जरी फोन नेटवर्क नसलेली ठिकाणं जगात शोधून शांतपणासाठी जात असलो तरी इथे आई वडिलांच्या काळजी पोटी , त्यांच्याशी सहज संपर्क व्हावा म्हणून हे सगळं अत्यावश्यक आहे हे जाणवतं. थोडक्यात आता ज्या गावांत इलेक्ट्रिसिटी नाही, फोन नाही, डॉक्टर नाही अशा गावांत आपली आजी कशी राहिली असेल ही कल्पना सुद्धा करवत नाही. मग जाणवतं की ज्या गोष्टींना आपण सोयी सुविधा म्हणतो त्या अत्यावश्यक आहेतच. तिथल्या कष्टकरी लोकांची जिद्द आणि त्यांचे कष्ट ह्याची आपण कल्पनाच करावी आणि तोंडभरून त्यांचं कौतुक करावं असं मला नेहेमी वाटतं. आपण शहरात राहणाऱ्या लोकांनी ह्यांच्याकडून चिकाटी आणि मेहेनत शिकावी..निदान त्यांचे कष्ट समजून घ्यावे. आणि अगदीच ह्यातलं काही जमलं नाही तर निदान त्यांना अक्कल शिकवायला मुळीच जाऊ नये!
ह्यावेळी गावाच्या वरती डोंगरावर, म्हणजे मुख्य रस्त्याला लागून जे आरोग्यकेंद्र आहे तिथे मी जाऊन आले. तिथे on duty असलेले डॉक्टर सिस्टर आणि आशा स्वयंसेविका ह्या तिघांनाही भेटून त्यांच्याशी बोलून मला खूप बरं वाटलं. ते डॉक्टर प्रत्यक्षात डॉक्टर नसून Bsc nursing केलेले आहेत हे त्यांचीच मला सांगितलं. सरकार नी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी मला सांगितल्या. जवळपास ची चार गावं ते आठवड्यातून बघतात. एक जालन्याचा तरुण इथे कोकणात येऊन नोकरी करतो. ती सिस्टर/ नर्स तिथे स्वतःच्या शाळेत जाणाऱ्या मुलाला घेऊन २४ तास त्या आरोग्यकेंद्रात वस्तीला असते. सूर्य मावळल्या नंतर जिथे कभिन्न काळोख असतो, हाक मारण्याच्या अंतरावर घर नाही, कुणाची सोबत नाही, स्वतःला काही मदत लागली तर मदतीला माणूस नाही अशा ठिकाणी वेगळ्याच गावातून नोकरीसाठी येऊन राहणं सोपं नाही. मला फार कौतुक वाटलं तिचं. गावातली लोकं छोट्यामोठ्या आजारपणात तिथे जातात, त्यांना तपासणं, औषधं देणं , Bp, sugar तपासून काही bloodtest वगैर करणं आणि काही प्राथमिक उपचार ही टीम छान करते हे बघून बरं वाटलं. वैद्यकीय सोयी सुविधा असल्या म्हणजे आपल्याला सुरक्षित वाटतं ही आपली शहरी लोकांची मानसिकता आहे. आपल्याला कधीतरी काहीतरी आजारपण आलं, emergency असली तर उत्तम हॉस्पिटल, तज्ञ डॉक्टर, ॲम्ब्युलन्स सगळी व्यवस्था हवी असं वाटतं आपल्याला. पण त्यामुळे रोजच्या जगण्यात आपण नैसर्गिक गोष्टींपासून किती दूर गेलो आहोत ह्याचा साक्षात्कार गावाला जाऊन राहिलं की मगच होतो. तिथल्या खडतर जगण्यातच तिथल्या लोकांच्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे हे नक्की. सकाळी उजाडल्या पासून अंगमोडून च काम करतात ही लोकं.. एकदा मागचं पुढचं अंगण झाडलं तरी पाठीचा कणा मोडणं म्हणजे नेमकं काय हे कळतं आपल्याला. आणि अशावेळी तीव्रपणे जाणवतं की इथल्या कष्टप्रद जगण्यातच त्यांचं आरोग्य आहे बहुदा. सगळी साफसफाई करताना वरच्या मजल्यावर बेडरूम मधे मला एकदा मण्यार दिसली, घाई ने दरवाजा बाहेरून बंद करून मी दिवाकर दादांना बोलावलं त्यांनी पटकन ती मण्यार मारली बाहेर लांब नेऊन टाकली आणि पुन्हा कामाला लागले, इतक्या सहज तर मला डास सुद्धा मारता येत नाही. पाचसहा दिवसांनी पुन्हा वरच्या मजल्यावरच्या बेसिन वर छान वेटोळं घालून बसलेली दुसरी मण्यार माझ्या भावजयीला दिसली..पुन्हा दादा आले आमच्या संरक्षणासाठी. त्यांना म्हटलं " दादा तुम्हाला काय मंत्र येतात ते म्हणा हो, दोनदा दिसलं जनावर"...(आमच्या कोकणात सरपटणाऱ्या प्राण्यांना किंवा विषारी सापांना जनावर म्हणतात.) दादांनी शांतपणे सांगितलं " नाय ता मण्यार काय ऐकित नाय ह्या मंत्राला...तिच्यात विष नाय". कोकणात जन्मलेल्या आणि एवढी वर्ष फक्त तिथेच राहिलेल्या दादांना ह्या सरपटणाऱ्या जीवांचा दांडगा अनुभव होता. पण माझ्यासाठी मात्र तिथे झोपणं हा संघर्ष होता.
रोजचं जगणं अत्यंत कठीण असूनही कोकणी माणसं तशी साधी आणि सरळ आहेत. बोलताना खोचक बोलतील पण ती त्यांची भाषा झाली..शहरातून येऊन कुणी अक्कल शिकवली तर असं होणारच ना! मग त्यांचा खोचकपणा, चमत्कारिकपणा अनुभवायची तयारीच ठेवायची आपण. हा पण आपण जर त्यांना समजून घेऊन, त्यांच्यातलं होऊन, त्यांच्याच भाषेत त्यांच्याशी संवाद साधला तर मात्र ही माणसं जीव लावतात. इथला पाहुणचार म्हणजे कुठलाही बडेजाव नाही, जे त्या दिवशी स्वतः जेवतील तेच तुम्हाला वाढतील अशी इथली माणसं. पण आपुलकीत मात्र कधीही कमतरता नाही. अशी निसर्गाची आव्हानं पेलत रोजच्या संघर्षाने काटक झालेली इथली माणसं. कोकणातला निसर्ग, हिरवळ, लाल माती , विहीरीचं गार पाणी, गार वारा ह्या माणसांना मायेने बांधून ठेवतो! पण ह्या निसर्ग सौंदर्या इतकंच ह्या काटक माणसांचं ही कौतुक व्हायला हवं.
© वृषाली आठले
Counseling Psychologist Psychotherapist.




त्या फुलांच्या गंधकोशी©वृषाली आठले 13/1/2026त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का..'  हे डॉ सूर्यकांत खांडेकर यांनी लिह...
13/01/2026

त्या फुलांच्या गंधकोशी
©वृषाली आठले
13/1/2026
त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का..' हे डॉ सूर्यकांत खांडेकर यांनी लिहिलेलं आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं माझं अतीशय आवडतं गाणं आहे. लेखकाने परमेश्वराचं अज्ञात अस्तित्व निसर्गाच्या अनेक रूपांत शोधलं आहे! आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी इतकं आर्ततेने ते गायलं आहे की परमेश्वराचं अस्तित्व निसर्गात दिसू लागतं. हे गाणं म्हणजे मराठी साहित्य आणि संगीतातली एक उत्कृष्ट आणि अविस्मरणीय कलाकृती आहे!
निसर्गातली लाल, गुलाबी, जांभळी, पिवळी, पांढरी अशी ना ना रंगांची फुलं पाहिली की ते रंग डोळ्यात आणि मनात साठवून ठेवण्याची धडपड सुरू होते. आधी फुलांची नावं जाणून घ्यायची आवड होती मला, पण आता ती अचानक गेली. आता सुंदर फुलं बघताना कुणी त्यांच्या नावांची चर्चा करायला लागलं की वाटतं नका ना त्या नावांत अडकू..रूप पाहा त्या फुलांचं, गंध श्वासात भरून घ्या! आणि मनात जपून ठेवा! नाव आलं की सगळी माहिती आली, पण रंग आणि गंध आला की अनुभव आला. माहिती पेक्षा अनुभव अधिक खोल वाटतो मला! आणि अनुभवा पेक्षा ही स्वानुभव त्याहून प्रगल्भ! कधी अगदी गडद, कधी भडक, कधी फिकट रंगांची ही उधळण पाहिली की ह्या रंगीबेरंगी फुलांवरून नजर हटत नाही आणि आपण वेड्या सारखे फोटो काढत सुटतो. एकाच ठिकाणचे, एकेका रंगांच्या फुलांचे आपण इतके फोटो काढतो की जणू काही प्रत्येक क्लिक मध्ये, फोटो मध्ये ते रंग वेगळे दिसणार आहेत. आणि मग भान येतं की ही धडपड आहे ते पाहिलेलं रंगीत दृश्य पकडून ठेवण्याची. आपण सहसा पुन्हा त्या जागी येणार नसतो. म्हणून पुन्हा पुन्हा फोटोज् काढून आपण आपल्याच मनाला दिलासा देत असतो बहुदा.. हा पाहिलेलं सुंदर देखावा न विसरण्याचा!
मी खूप प्रवास केला, अनेक ठिकाणी तऱ्हे तऱ्हेची फुलं पाहिली.. काश्मीर मध्ये अक्षरशः प्रत्येक घराच्या कुंपणावर, हॉटेल च्या गेट वर, डवरलेले लाल गुलाबी गुलाब पाहिले, एप्रिल महिन्यात तिथे गुलाबी, अबोली, पिवळ्या रंगांची ट्युलिप (tulip) ची फुलं पाहिली, काश्मीर मधेच केशराचे मळे बघितले तेव्हा जांभळ्या रंगाची केशराची फुलं आणि त्यातला तो केशरी रंगांचा पराग/ केशर पाहताना नजर हटत नव्हती. नैनिताल ला जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या सरसू च्या शेतात फुललेली पिवळी जर्द फुलं पाहण्यासाठी गाडी बाजूला उभी करून त्या शेतात गेलो, ऋषिकेश ला अनेक रंगांची फुलं बघितली, ऊटी ला botanical garden मधली फुलं, डलहौसी मध्ये असताना अनेक ठिकाणी पिवळा पराग असलेली पांढरी फुलं दिसली. कोकणात ला घराच्या परिसरातला चाफा, पारिजात ,करवंदाची फुलं, कवठी चाफा, कुंदाची फुलं, जास्वंद, गावठी गुलाब, कण्हेर, सोनटक्का, मोगरा अशी एक ना अनेक फुलं जवळून पाहिली, अनुभवली. पेलिंग मधून दार्जिलिंग ला जाताना पाहिलेलं झेंडूची फुलं आणि मागे हिमशिखरं हे दृश्य कधीही मनातून जाणार नाही. तसंच कुठल्याही देशांत, प्रांतात दिसणारी बोगनवेल आणि तिचा तो गडद रंग..कितीही वेळा पाहिला तरी आपण आपला कॅमेरा काढून लगेच क्लिक करतोच. ह्या वेळी थायलंड मध्ये khao yai flower park मध्ये अशीच अनेक रंगीबेरंगी फुलं पाहिली. नजरेत हे रंग ताजे ताजे असतानाच मन आधीच्या स्मृतींमध्ये कधी गेलं समजलंच नाही. तिथले रंग नजरेने टिपताना मन आधी टिपलेल्या फुलांत गेलं..त्यावेळी मनामध्ये ही ह्या सुंदर फुलांसारखाच आठवणींचा ही बहर होता ही खूप सुखद जाणीव झाली! फुलांचं आयुष्य फार कमी असतं पण त्यांचं ताजेपण, रंग, रूप, गंध सगळच आपल्या कायम स्मरणात रहाणारं असतं. जातायेता सहज बघितलं तरी मनांत शिरणारी, फोटो काढले तर त्याच त्याच फोटोंवर नजर ठरून राहील अशी, अलगद उचलून हातात घेतल्यावर आपल्या हातांना सुगंध देऊन जाणारी, देवघरातल्या देवांवर वाहिल्यावर निरंजनातल्या ज्योतीच्या प्रकाशात..आपण देवाच्या पायी आल्याच्या सुखांत अधिकच उजळून दिसणारी फुलं हा देवत्वाचा एक देखणा चमत्कार वाटतो मला!
©वृषाली आठले
Counseling Psychologist and Psychotherapist





मानस संकल्प©वृषाली आठले १/१/२०२६प्रति एक झाडा माडा, त्याची त्याची रूपकळाप्रति एक पाना फुला, त्याचा त्याचा तोंडावळाउठे फु...
01/01/2026

मानस संकल्प
©वृषाली आठले
१/१/२०२६

प्रति एक झाडा माडा, त्याची त्याची रूपकळा
प्रति एक पाना फुला, त्याचा त्याचा तोंडावळा
उठे फुटे जी जी लाट तिचा अपूर्वच थाट
फुटे मिटे जी जी वाट तिचा अद्वितीय घाट!
~बा भ बोरकर

वाचता वाचता मनांत आलं प्रत्येक घटनेकडे, माणसा कडे ह्याच दृष्टिकोनातून पाहता येईल का आपल्याला? प्रत्येक गोष्टीची स्वतःची अशी ठेवण आहे, प्रत्येक माणसाची खास स्वतःची अशी जडण घडण आहे.. आपल्याला भेटलेल्या माणसांचं असं वेगळेपण स्विकारता येईल का आपल्याला? आपले मार्ग आणि त्यांचे मार्ग वेगळे असतात, प्रवास वेगळे असतात, दिशा वेगळ्या असतात, ध्येय वेगळं असतं, स्थिरावण्याच्या जागा वेगळ्या असतात. हे सगळं सतत जाणवत असतं..पण हे इतकं सहज स्विकारता येईल का आपल्याला! प्रयत्न केला की सहज जमतं हे मला. पण तरीही स्विकारताना कधीतरी मनाची घालमेल होतेच.
वर्ष संपता संपता मन थोडं हेलावलं! हे असं दर वर्षी होतं. हे वर्ष आपल्या काय देऊन गेलं आणि आपल्या कडून काय घेऊन गेलं ह्याचे हिशोब मांडणं सुरू झालं. मनांत अनेक विचार यायला लागले.
ह्या वर्षी केलेले प्रवास आठवले, भेटलेली नवीन माणसं.. काही जुनीच पण नव्याने भेटलेली माणसं आठवली. अनेक संवाद जसेच्या तसे आठवले. संवादातून नाती नव्याने घडतात हे तर आहेच पण क्वचित बिघडतातही हे ही अनुभवलं. काहीतरी सांगण्याची प्रत्येकाची धडपड पहिली..आपली बाजू, आपलं मत, आपल्या भावना, आपले विचार, आपल्याला असं वाटलं आणि तसं वाटलं....एक ना अनेक गोष्टी प्रत्येकाकडून वेगवेगळ्या संवादातून डोकावल्या. हे सगळं असं आठवायला लागलं की मन कितीतरी मागे मागे जातं आणि मग प्रयत्नपूर्वक मनाला वर्तमानात आणावं लागतं.
मग दर वर्षी असं खूप मागे जाऊन पुढे येत येत गेलं की लक्षात येतं अरे नवीन वर्षात आलोय आपण.. हळुवारपणे मागचं काही काही सोडायला हवं आता. आणि मग आवर्जून पाटी कोरी करून पुढे जाण्याचा दर वर्षी ठरलेला विचार. मला काही फार पाटी कोरी करता येत नाही. कारण इतकी कमाल स्मरणशक्ती देवाने दिली आहे, आणि शिवाय जे जे चांगलं ते स्मरणात ठेवावं आणि जे जे त्रास देणारं ते न आठवावं अशी छान कला ही मला अवगत आहे. मग कशाला उगीच पाटी कोरी करायची? त्यापेक्षा पुढे येणारा प्रत्येक दिवस कोरा करकरीत कसा जगता येईल एवढंच पाहते मी ..आणि नवीन वर्षी कुठलाही संकल्प न करताच प्रसन्न मनाने फक्त भरभरून जगते!
"भेटे जे जे त्यात भरे अशी लावण्याची जत्रा
भाग्य केवढे! अपुली चाले यातूनच यात्रा!"

©वृषाली आठले
Counseling Psychologist Psychotherapist
#जीवनयात्रा
#जीवनप्रवास
#नववर्ष
#संकल्प


शांतचित्त माणसांचं गाव - बाली©वृषाली आठले 8/12/25भटकंती साठी कुठे जायचं हा विचार करत होतो तेव्हा घड्याळाची गुलामी झुगारू...
13/12/2025

शांतचित्त माणसांचं गाव - बाली
©वृषाली आठले
8/12/25
भटकंती साठी कुठे जायचं हा विचार करत होतो तेव्हा घड्याळाची गुलामी झुगारून आराम करायचा एवढंच मनांत होतं. छान १२ दिवस कुठेतरी निसर्गाच्या जवळ जाऊन राहू इतकं च ठरवलं आणि बाली, इंडोनेशिया च बुकिंग केलं.
उबूद मध्ये एक छान व्हिला बुक करून राहिलो. ज्यांची प्रॉपर्टी होती ते जोडपं आणि त्याचं सगळं कुटुंब तिथेच बाजूला राहत होते. त्यांची भाषा आणि बोलणं इतकं गोड होतं की ऐकत राहावं.. इंग्लिश बोलताना त्यांचे उच्चार फार मजेशीर असतात. कळायला वेळ लागतो पण दुसरा इलाज च नव्हता. खूप काही जाणून घ्यायचं होतं मला. तिथे पोहोचल्यापासून त्यांची संस्कृती , त्यांच्या परंपरा, त्याचं राहणीमान सगळ्या विषयी खूप उत्सुकता वाढली होती. आमचा ड्रायवर आरी आणि ज्याची प्रॉपर्टी होती तो उगुस ह्या दोघांनी खूप सांगितलं बाली विषयी.
प्रत्येक गावांत इथे तीन मोठी मंदिरं असतातच. ब्रह्मा विष्णू आणि शिवा. आपल्याला भारतीयांना ब्रह्मा विष्णू आणि महेश माहिती आहे ह्याचं त्यांना आश्चर्य वाटलं. अर्थात महेश म्हणजेच शिवा हे त्यांना सांगूनही कळत नव्हतं. प्रत्येक घरा समोर ही इथे एक मंदिर असतंच. अगदी एकही घर मोठ्या मंदिरा शिवाय कुठेही दिसलं नाही. मोठ्या दगडी भिंती..मोठे दरवाजे. प्रत्येक ठिकाणी देवांच्या मोठ्या दगडी मूर्ती. प्रत्येकाच्या घरात जाण्याआधीच त्याचं स्वतःचं गणेश मंदिर, आणि मग सुंदर घर. प्रत्येक घराच्या दरवाज्यासमोर कनांग सारी ( Canang sari) ठेवलेलं दिसत.आपण जसं सण वार असताना पान बाहेर ठेवतो तसं इथे रोज च अगदी पहाटे पहाटे प्रत्येक घरा समोर हे छोटं सूप ठेवलेलं दिसतच. ते गणेशाला अर्पण करतात.
कनांग सारी' (Canang Sari) ही बाली बेटावरील हिंदू लोकांची एक महत्त्वाची आणि रोजची प्रथा आहे. बालीनीज हिंदू लोक दररोज 'संग ह्यंग विधी वासा' (Sang Hyang Widhi Wasa) म्हणजेच सर्वशक्तिमान अशा देवाला, त्याने आपल्याला शांतता आणि आशीर्वाद दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी ही छोटी अर्पणे तयार करतात. ह्यामध्ये हाताने विणलेल्या पामच्या पानांच्या छोट्या टोपलीत (ज्याला 'चेपर' म्हणतात) वेगवेगळ्या रंगांची फुले विशिष्ट दिशांना ठेवली जातात, जी विविध हिंदू देवतांचे प्रतिकं आहेत (उदा. पूर्वेला पांढरी फुले, दक्षिणेला लाल फुले).तसंच यामध्ये थोडे तांदूळ, किंवा शिजवलेला भात, सुपारी, फळं ,कधीकधी छोटी नाणी किंवा खाद्यपदार्थ ठेवतात. त्यावर उदबत्ती ओवाळून किंवा धूप जाळून प्रार्थना देवापर्यंत पोहोचवली जाते. ही अर्पणे मंदिरांमध्ये, घराच्या आणि दुकानांच्या प्रवेशद्वाराजवळ, छोट्या रस्त्यांवर आणि काही ठिकाणी वाहनांवरही ठेवलेली दिसली. आम्ही खूप फिरलो, पण एक ही घर अपवाद म्हणून दिसलं नाही. म्हणजे ही लोकं किती मनापासून श्रद्धेनी ही प्रथा रोज पाळतात हे लक्षात आलं. प्रत्येक घराच्या समोर रस्त्याच्या कडेला बहरलेला चाफा दिसत होता. आपण कुठेही चालतांना ह्या चाफ्याचा गंध आपल्या बरोबर आहे असं वाटत होतं.
बाली मधलं निसर्ग सौंदर्य आणि तिथल्या सुंदर प्रथा पहिला मिळाल्या त्या पेंगलीपुरन ह्या गावामध्ये. इतकं सुंदर गाव आहे की त्याचं वर्णन शब्दांत करणं कठीण आहे. हे जगभरातील सगळ्यात स्वच्छ गावांपैकी एक मानलं जातं. इथलं नैसर्गिक सौंदर्य आणि वास्तुकला बघताना मी त्यात हरवून गेले. छोटा रस्ता, दोन्ही बाजूला सरळ रेषेत दगडी बांधकाम असलेली घरं, त्या घराच्या मुख्य दरवाजातून आत जाताना आधी मंदिर, दाराच्या बाहेर उंच बांबूचा सुंदर सजवलेला 'पेंजोर '. पेंजोर हे इथल्या लोकांसाठी विश्वाचा समतोल आणि माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं दाखवणारं प्रतीक आहे!
गलुंगण (Galungan) हा बालीमधील एक महत्त्वाचा हिंदू सण आहे, जो धर्माचा (चांगुलपणाचा) अधर्मावर (वाईटावर) वर विजय दर्शवतो. इथे हा सण १० दिवसांसाठी साजरा केला जातो, ह्यावेळी पूर्वजांचे आत्मे पृथ्वीवर येतात अशी ठाम श्रद्धा आहे इथल्या लोकांची..म्हणून या काळात लोक मंदिरात जातात, घरं स्वच्छ करतात, प्रार्थना करतात आणि नातेवाईक एकमेकांना भेटतात. १० दिवसांच्या शेवटी येणाऱ्या कुनिंगन या दिवशी ते आत्मे पुन्हा स्वर्गात परत जातात. आम्ही गेलो त्या दिवशी बालिनिज लोकांचा 'कुनिंगन' नावाचा सण होता. बाली च्या हिंदू धर्मात ह्या सणाचं विशेष महत्त्व आहे. ह्या दिवशी लोकं पूर्वजांच्या आत्म्यांना शांत आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात.आपल्या पूर्वजांना त्यांच्या पुनर्जन्म घेण्याच्या मार्गावर त्यांना आशिर्वाद देण्याची प्रथा आहे ही. सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन सगळं कुटुंब त्यांच्या पारंपरिक वेषात तयार होऊन, एका मोठ्या टोपलीत सगळं पूजेचं साहित्य घेऊन घरातल्या मंदिरात पूजा करतात आणि तसंच गावातल्या ठरलेल्या मंदिरात पूजा करतात, प्रार्थना करतात, आणि पारंपरिक पदार्थ बनवून आपल्या कुटुंबा बरोबर एकत्र जेवण करतात. आपल्या पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा इतकी सुंदर प्रथा मी आज पर्यंत कुठे ही पहिली नाही.
गुनुंग कावी मंदिर (Gunung Kawi Temple) हे बालीमधील एक प्राचीन मंदिर संकुल आहे, जे ११ व्या शतकात राजा anak wungsu यांच्यासाठी बांधले गेले होते. हे मंदिर 'व्हॅली ऑफ द किंग्स' म्हणून ओळखले जाते. इथे राजा आणि त्याच्या राणीच्या आठवणी जतन केल्या आहेत. या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे आजकाल शेतकरी आणि 'सुबक' (भात सिंचन संस्था) हे देव विष्णू आणि देवी श्री यांची प्रार्थना करण्यासाठी या मंदिरात येतात. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण ३०० पायऱ्या उतराव्या लागतात. ते उतरणं आणि पुन्हा ३०० पायऱ्या चढून वर येणं हे एक मोठं दिव्य होतं. स्वतःच वय झालं आहे याची जाणीव करून देणारं होतं.खाली उतरताना अचानक मुसळधार पाऊस आला आणि त्या प्रत्येक पायरी वरती मस्त आमच्या बरोबरीने पाणी धावत खाली मंदिरा पर्यंत आल्या सारखं वाटलं. त्या खळाळत्या पाण्याला पहिलं आणि स्वतःच्या शरीर मनाच्या जडत्वाची जाणीव झाली.
बाली मध्ये अजून एक तिर्टा एम्पुल मंदिर आहे. हे हजारो वर्षांहून जुने असं इंडोनेशियातील एक प्रसिद्ध हिंदू जलमंदिर आहे. हे मंदिर त्याच्या पवित्र झऱ्यांसाठी ओळखले जाते, मंदिराचे नावच "पवित्र झरा" असे आहे! हे मंदिर वर्मादेव राजवंशाच्या काळात बांधले गेले होते. मंदिराच्या आवारात एक नैसर्गिक झरा आहे, ज्यातून सतत पवित्र पाणी येते. बालिनी हिंदू याला 'अमृत' मानतात आणि त्याचा उपयोग धार्मिक विधींसाठी करतात. या मंदिराचा उपयोग 'मेलुकत' नावाच्या धार्मिक शुध्दीकरणासाठी होतो.
मंदिराच्या आवारात 'पेटिरताआन’ नावाची स्नान करण्यासाठी एक रचना आहे, जिथे लोक पाण्यात डुबकी मारून स्नान करतात.
Goa Gajah नावाचं एक गणपती मंदिर ही पाहिलं. तिथे पायऱ्या चढताना उतरताना दमछाक झाली माझी. पण देवळा कडे जाणारी छोटीशी पाऊलवाट सुद्धा छोट्या छोट्या दगडांनी कलात्मक पद्धतीने रचली होती. ज्या वाटेवरून आपण रस्ता तुडवत चालणार आहोत त्या वाटेवरचे छोटे दगड लावताना सुद्धा फुलांच्या आकाराचे लावले होते. कौतुक वाटतं मला अशी कामं करणाऱ्यांचं. इथे प्रत्येक मंदिरात त्रिमुर्ती असते..म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि शिवा अशी लिंग असतात.
( Pura dalem) पुरा दलाम म्हणून एक शिव मंदिर पहायला गेलो तिथे बाजूचा परिसर इतका हिरवा गार होता की चालताना मन हलकं झालं होतं.खूप मोठ्या पसरलेल्या झाडाच्या पारंब्या झाडावरून पुन्हा जमिनीत रुतलेल्या.. रुजलेल्या , पुन्हा बाजूच्या वाहत्या ओढ्या कडे ओढ घेत गेलेल्या होत्या..आणि त्या खालून वाट काढत मंदिरा जवळ जाणारा छोटासा मार्ग होता.फार देखणं होतं सगळं. उबूद मधून निघाले खरं पण माझं मन तिथेच रेंगाळत होतं.
Nusa penida या बेटावर आम्ही राहिलो ते हॉटेल समुद्र किनाऱ्यावर आहे म्हणून मी खुश होते. प्रत्यक्ष गेलो तेव्हा लक्षात आलं की आमच्या रूम च्या बाल्कनी बाहेर खालीच समुद्र आहे..इतक्या जवळ राहून दिवस रात्र समुद्राची प्रत्येक लाट उसळताना पाहणं हा दिवसा सुंदर पण रात्री मात्र भीतीदायक अनुभव होता. गुहागर ला समुद्र किनाऱ्यावर च चार वर्ष राहिले आहे, पण घर आणि समुद्र किनाऱ्या मध्ये अख्खी लांबलचक वाडी असायची. हे म्हणजे अजब च होतं. उसळणारी प्रत्येक लाट सुरुवातीला अंगावर आल्यासारखी वाटत होती, मग हळू हळू त्या लाटांची लय लक्षात आली. बसल्या जागी मनांत विचार आला की आपल्या मनातल्या विचारांच ही असच असतं ना..उसळून येतात, बेचैन करतात, पण त्यांची येण्याची तीव्रता आपल्याला त्रास देते..आपण परतीच्या लाटे सारखं परतणाऱ्या विचारांकडे पहायला शिकलं पाहिजे. येतात तसेच ते जातात ही. समुद्राची लाट अंगावर आली की आपण कसं किंचीत मागे सरतो ना..आपण त्या ओघात वाहत नाही जात. मग मनातल्या विचारांच्या बाबतीत ही तसंच करायचं असतं किंचित मागे येऊन त्यांचा आवेग ओसरताना पहायचा असतो. आपण उगीच वाहून जातो.
इथे Broken beach, Angel Billabong, klinking beach अशा छान जागा आहेत. जिथे निळाशार समुद्र दिसतो.
Nusa penida ह्या बेटावरून बोटी ने आम्ही Gili Trawangan (गिली त्रावांगान) ह्या एका छोट्याशा बेटा वर गेलो. हे लोम्बॉक जवळ आहे. चारी बाजूंनी सुंदर समुद्रकिनारा, मध्ये homestays आणि हॉटेल्स आहेत. हे बेट पर्यटना साठी खास डेव्हलप केलेलं आहे. अक्षरशः 45 मिनिटांत या बेटावर आपण सायकल घेऊन गोल फिरून येऊ शकतो. इथे फिरण्यासाठी सायकल किंवा घोडागाडीचा वापर केला जातो. बेटावर मोटार-गाड्यांना परवानगी नाही. इथले स्थानिक लोक अनेक भाषा बोलतात.. सासाक, बहासा आणि इंग्लिश. हे बेट पार्टी आणि नाईट लाईफसाठी प्रसिद्ध आहे. ज्यामध्ये आम्हा दोघांना काडीचा ही रस नसल्यामुळे आम्ही मस्त सायकलिंग केलं. सूर्योदय आणि सूर्यास्त पाहायला समुद्रावर शांत बसता येईल अशा अनेक जागा आहेत तिथे आवर्जून गेलो. Gilli वरून पुन्हा Seminiyak / Kuta आलो आणि गरुडा विष्णू आणि uluwatu temple पहिलं. ह्या uluwatu temple मध्ये balinese लोकांचा एक Fire dance /Kecak dance नावाचा एक पारंपरिक नृत्य प्रकार पाहिला. रामायणाची कथा ह्या नृत्यातून सादर केली जाते. आपल्या कडे गावोगावी जसं नमन/खेळे होतात तसंच इथे ही रामायण सादर करताना इथे सगळ्या व्यक्तिरेखा/ सोंगं पाहिली. साधारण पन्नास कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण केलं.पारंपरिक पद्धतीने इतके कलाकार एक तास तोंडाने आवाज काढत म्युझिक देतात. एकही वाद्य वापरलं जात नाही. मागे सूर्यास्त होताना आपल्या डोळ्यासमोर रामायणचं सुंदर सादरीकरण होतं. आपण शांत होऊन पाहत राहतो आणि समरस होतो.
पृथ्वी वर असणारा निसर्ग म्हणजेच स्वर्ग आहे अशी माझी ठाम समजूत आहे! ही सृष्टी तर सुंदर आहेच..पण निसर्गा बरोबर इथली माणसं एकरूप झाली आहेत असं जाणवलं. कुणीही मोठ्या आवाजात बोलताना दिसलं नाही, कुणीही एकमेकांवर ओरडताना, चिडताना दिसलं नाही. हळू बोलतात आणि हसून बोलतात..साधं सरळ राहणीमान आहे, आणि प्रत्येकजण आपलं काम अतिशय शांतपणे करत आहे असं लक्षात आलं. इथली माणसं धावपळ करताना दिसत नाहीत हे मला फार आवडलं. पण ती आळशी पण नाहीयेत.
जणू काही एखादी विशिष्ट विचारधारा सगळे जगतात, अनुसरतात असं वाटलं. जगणं किती साधं सरळ सोपं आणि शांत असावं हे अनुभवायला मिळालं. पर प्रांतात गेल्यावर सौंदर्य आणि स्वच्छता अनेक ठिकाणी अनुभवली आहे. पण निसर्गाबरोबर समरस होऊन अतिशय शांतपणे जगणारी माणसं एकाच गावांत, प्रांतात पहिल्यांदाच पाहिलं मी. जगण्याची गती, जगण्याचा वेग कमी ठेऊन, लयबद्ध जगणारी इथली माणसं मला खूप भावली! तिथून निघाले ती श्वासात, ऊरांत, मनांत शांतता घेऊनच..आणि ते ही माझ्या सवयी प्रमाणे पुन्हा परत येण्याचा विचार घेऊनच.
©वृषाली आठले
Counseling Psychologist and psychotherapist









28/09/2025

*मैत्री च्या तऱ्हा*
© वृषाली आठले
प्रत्येकाच्या मैत्रीत एखादा नाका, एखादा कट्टा, किंवा एखादा अड्डा असतोच. एका विशिष्ट वयात तो जितका खास असतो तितका तो नंतर राहतोच असं नाही. ह्याची कारणं अनेक असतात. सामान्य कारणं अशी की लहानपणीचे मित्र किंवा तरुणपणातले मित्र आपापल्या उद्योग, व्यवसाय, करिअर मध्ये स्वतःला सिद्ध करत असतात, मग प्रत्येकाचा "तो" किंवा "ती" आयुष्यात येते, आपापल्या संसारात ते रमतात. जबाबदाऱ्या वाढतात, अनेक अडचणींना तोंड देत असतात. वगैरे वगैरे.. पण हे सगळं अगदी स्वाभाविक आहे. तरीही ह्या नाक्याची मैत्री घट्ट रहाते. अगदी सगळा नाका किंवा कट्टा अशा घट्ट मैत्रीत बांधला जातो असं नाही. पण तरीही एकमेकाला भेटून फ्रेश वाटण्या इतपत ही मैत्री नक्की असते. जिथे भेटलो की तेच तेच विषय, तेच तेच विनोद असूनही मन हलकं होतं, पुन्हा लवकर भेटू असं ठरवलं जातं. जे प्रत्यक्षात मात्र कधीही होत नाही. पूर्वी वाटायचं की ह्याची कारणं अगदी प्रॅक्टिकल म्हणता येतील अशीच असणार. पण कालांतराने जशी भेटण्या मध्ये खूप gap पडायला लागली तसं जाणवलं की आपण समजत होतो तसं नाहीये. कदाचीत वारंवार भेटावं अशी फार शी ईच्छा नसावी ,किंवा ईच्छा असली तरी लोक म्हणतात तसं त्यांना भेटायला जमत नसावं, किंवा सहज भेट झालीच तर ठीक पण भेट नाहीच झाली तरी फार काही फरक पडत नसावा..आता ह्यातलं नेमकं काय हे ज्याचा तोच जाणे.
बऱ्याच काळाने गणपती निमित्त भेट झाली तेव्हा एका मित्राजवळ न आलेल्या दुसऱ्या मित्राची चौकशी करता फार मजेशीर उत्तर मिळालं...ते असं...की "अगं तो मजेत आहे, तुझ्या आयुष्यात त्याचा जेवढा सहवास होता तेवढा पूर्ण झाला असं समजायचं" भेटलेल्या मित्राने इतक्या सहजपणे हे म्हटलं की मी उडालेच.. हे विधान माझ्यासाठी मजेशीर वगैरे न राहता फार गंभीर तत्त्वज्ञान असल्यासारखं आरपार शिरलं माझ्या मनांत. आणि मग जाणवलं मानसशास्त्र आणि तत्वज्ञान कोळून प्यायलेली बाई आहे मी, पण मी इतक्या सहज हे सत्य पचवू शकत नाही. कारण मी अती जास्त सकारात्मक आहे. वास्तवातल्या गोष्टींकडे सतत सकारात्मक विचारांनी पहात असते मी. आणि ते तसंच असावं ह्यासाठी धडपडते. पण अलीकडे लक्षात आलं आहे की ही धडपड एकतर्फी आहे. मग आपोआप withdrawal घडतं. मनातून नाही, पण कृती नी अलिप्तता येते.
आमच्या मित्रांचे किस्से काही कमी नाहीयेत. आमच्या नाक्याची एक खास (पण माझ्या शब्दशः डोक्यात जाणारी) खासियत म्हणजे ग्रूप मधे अत्यंत आलतुफलतू पोस्ट वर react होतील, पण आपण जर वैयक्तिक नावं घेऊन (@) msg लिहिला तर वाचल्या नंतर सुद्धा अजिबात वाचलंच नाही असं दुर्लक्ष करतील. कोण वागतं असं??? असा प्रश्न मला गेली अनेक वर्ष भेडसावयचा....पण अलीकडे मी ते पचवलं आहे की हे फक्त आणि फक्त आपल्याच "जवळच्या" मैत्रीत घडतं. मला खरंच प्रश्न पडतो की जर काहीही संवाद च नसेल तर ही मैत्री जवळची असं आपण का म्हणतो? क्वचित कधीतरी भेटल्यानंतर थोडा वेळ चक्कलस केली की मैत्री जवळची होते का?? मग ह्या प्रश्नाचं उत्तर माझं मलाच मिळालं की मी च जास्त अपेक्षा ठेवत होते.. कदाचीत मैत्री ही अशीच असावी अनेकांसाठी. त्यात मी बसत नव्हते. आणि आपण जेव्हा एखाद्या गोष्टीत ठीक ठाक बसत नाही ना, तेव्हा आपल्यामध्येच प्रोब्लेम आहे म्हणावं आणि गप्प बसावं. कारण जेव्हा उरलेल्या समस्त मित्र मैत्रिणी ना हे खटकत नाही तेव्हा उघड असतं की आपण च 'Odd man Out' आहोत. आपण म्हणजे मी.
तसं नाही नाही म्हणत म्हणत आम्ही मित्रांनी काही छोट्या trips आणि मोठे tours एकत्र केले..खरच खूप धमाल केली. पण त्यात पण गंमत म्हणजे एखाद्या मित्राला प्रत्यक्ष ट्रिप ला जाण्यापेक्षा ट्रिप ठरवण्यासाठी meeting म्हणून भेटण्यात आणि चर्चा करण्यात जास्त इंटरेस्ट.. एकाला काय तर ठरत आलेली ट्रिप cancel करण्यातच जास्त इंटरेस्ट.. एखादा ह्यातलं काहीही कधीही आपल्या साठी नाहीच आहे असं समजून वरून ते तुम्हालाच कसं समजत नाही म्हणून हा तुमचाच कसा प्रोब्लेम आहे हे तुम्हालाच जाणवून देणारा...एखादा सगळ्यात सहभागी होईल पण ग्रूप वर मात्र कधीही न बोलणारा.. एखादा काहीही कारण नसताना उगीचच सगळ्यांचं विचित्र वागणं सांभाळून घेणं ही जणू त्याचीच जबाबदारी असल्या सारखं बोलणारा, मात्र स्वतः ही फार seriously कधीही काहीही न वाचणारा.. एखादा त्याला ग्रूप मधे add कराल तितक्या वेळा ग्रुप सोडणारा.. एखादा फक्त जसं काही दुसऱ्यांना good morning करणं एवढीच त्याच्यावर कुणीतरी जबाबदारी टाकल्या सारखा..इतकं की त्याच्या आगे मागे काय लिहिलंय ह्याचा सुतराम संबंध त्याच्याशी नाहीच असं वागणारा..एखादा कुणी कुठलीही पोस्ट करो राजकीय किंवा विनोदी.. सगळ्या पोस्ट ला आवर्जून अंगठा दाखवणारा, लाईक करणारा..एखादा एखाद्याच msg ला "मी अंगठा दाखवला होता" अशा defensive mode वर असणारा...तर असे आमचे मित्र... अर्थात ह्या एखाद्याच्या यादीत एखादा आणि एखादी दोन्ही आले बरं का.
कुणाचाही वाढदिवस असला की आवर्जून आठवणीने msgs असतात ग्रूप वर. जसे सगळे वयाने मोठे झालो तसे वाढदिवसाचं कारण काढून भेटलो, खास करून प्रत्येकाच्या ५० व्या वाढदिवशी नक्की भेटलो. आता एक एक करत आमची सगळ्यांची "साठी..बुद्धी नाठी" होणार हे उघड च आहे. ५० शी साजरी करण्याचा उत्साह ६० मध्ये राहतो की नाही कळेल च. असो...
मैत्री मध्ये boundaries असतातच. किंवा काही बाबतीत त्या असाव्याच. पण त्या कुठल्या बाबतीत असाव्या, आणि किती असाव्या हे मात्र प्रत्येकावर अवलंबून असतं. नेमका तिथे फरक पडतो. मला स्वतःला अभिप्रेत असलेला मोकळेपणा मला समोरून दिसला नाही की मी अस्वस्थ होते. किंवा मैत्रीत खूप जास्त boundaries असतील, आणि त्या स्पष्ट न सांगता वागण्यात दिसत असतील तर मग नेमकी मैत्री आहे म्हणजे काय आहे असे प्रश्न मला पडतात. निदान जे असेल ते खुलेपणाने सांगता येतं आणि जरूर सांगावं अशी जागा म्हणजे माझ्यासाठी मैत्री..अर्थात मी कोण? प्रत्येकासाठी ही गोष्ट वेगळी असूच शकते. पण निदान ते पोचतं करावं अशी सरळ साधी अपेक्षा असते. आणि जेव्हा हे घडत नाही तेव्हा अंतर वाढतं. कुणाला ते कळतं कुणाला कळत नाही. पण अंतर वाढतं नक्की. ह्यावर ह्यातल्याच "एखाद्याचं " म्हणणं असतं की मुळात मैत्रीत इतकं काही seriously घ्यायचंच नसतं. आणि काहीच seriously न घेणं मला फार झेपत नाही. तर अशी ही आमची मैत्री..म्हटली तर निखळ, स्वच्छ, कुठलंही राजकारण न शिरलेली, घरच्यांनाही सामावून घेणारी मैत्री. पण पारदर्शकता आणि भावनिक गरज ह्या महत्वाच्या दोन गोष्टींचा अभाव असलेली. आणि म्हणून आपण एकमेकांच्या जवळ आहोत असं भासवणारी पण अंतर असलेली. हे अंतर काहींना जाणवत असेल ही कदाचित, पण खटकत नसेल. किंवा अनेकांची भावनिक गरज च कमी असेल. ही शक्यता जास्त आहे. आपल्या प्रत्येकाला आपल्या अनेक मित्र मैत्रिणींच्या बाबतीत असे अनेक अनुभव येतात. कुणी त्याची मोकळेपणी वाच्यता करतं, कुणी करत ही नाही. कुणी मैत्रीत मोकळं बोलणं झालंच पाहिजे अशा आग्रही मतांचं असतं तर कुणी बोलणं प्रशस्त नाही अशा विचाराचं असतं. एक मात्र नक्की की मैत्री हे नातं पूर्णतः निस्वार्थी असावं. तर अशी ही आमची संवादाविना असलेली मैत्री निस्वार्थीपणा मुळे टिकून असावी. थोडक्यात ह्या मैत्री च्या बाबतीत ठेविले अनंते तैसेचि रहावे.. हे धोरण ठेऊन मी माझ्या चित्ती समाधान बाळगून आहे!
© वृषाली आठले


*माझी अनवट अलिप्तता*   © वृषाली आठले        मन थेंबाचे आकाश       लाटांनी सावरलेले       मन नक्षत्रांचे रान       अवकाशी...
16/09/2025

*माझी अनवट अलिप्तता*
© वृषाली आठले
मन थेंबाचे आकाश
लाटांनी सावरलेले
मन नक्षत्रांचे रान
अवकाशी अवघडलेले
आपलं मन किती लहरी असतं. कित्येकदा स्वतःच्याच मनाचा अंदाज बांधता येत नाही आपल्याला. नेहेमी सारखं न वागता अगदी अनिश्चित असं काहीतरी वागतं. गेला काही काळ तुफान पाऊस पडला. असं वाटलं पाऊस जीव तोडून कोसळला! तो धो धो कोसळला,तो न थांबता बरसला, त्याने लोकांची गैरसोय केली, त्याने कष्ट करणाऱ्या लोकांना हैराण केलं. पाऊस वेड्या सारखा कोसळला खरा ... अवतीभवती खूप काही घडलं..पण तरीही माझ्या आत मध्ये काहीच घडलं नाही. हा पाऊस मला काहीच देऊन गेला नाही, आणि माझ्या कडून काहीच घेऊन ही गेला नाही. ना माझ्यासाठी तो सुंदर आठवणीं घेऊन आला, ना त्याने आयुष्यातले भरभरून जगलेले क्षण समोर आणले, ना त्याने माझ्या मनाचे हळवे कोपरे उलगडले..अगदी काहीही घडलं नाही. एरवी असं होतं ना...की हा पाऊस जेव्हा असा कोसळतो तेव्हा तो आपल्याला ही हलवतो. कधी खुश करतो, कधी उगीचच धुंद करतो..कधी एखादी सल, एखादं दुःख, किंवा आपल्या मनावरचं एखादं ओझं अलगद वाहून नेतो..आणि आपल्याला मोकळं करतो! पण ह्यावेळी असं काहीच घडलं नाही अशी ही पहिलीच वेळ असावी. काय गंमत आहे आपल्या मनाची..आपल्या मनाला सतत काहीतरी घडत राहावसं वाटत असतं. अगदी चांगलं वाईट, भन्नाट किंवा अगदी साधसं च काही...पण घडायला पाहिजे. नाहीतर उगीच बेचैन होतं मन. आणि काहीतरी घडलं की मग ते कामाला लागतं. ह्यावेळी जरा वेगळा अनुभव होता हा, अगदीच तटस्थपणे मी ह्या कोसळणाऱ्या पावसाकडे बघत होते. कुठून आली ही तटस्थता..हा प्रश्न नाही पडला मला. ही तटस्थता कुठून आली आणि कशामुळे आली ह्याची उत्तरं होती माझ्याकडे. पण का आली ही तटस्थता असं मात्र वाटून गेलं. इतकं तटस्थ वाटायला नको होतं मला असं वाटलं. तो मूळ स्वभाव नाहीये. मग मी बदलतेय का? जर हा बदल चांगला असेल तर काय हरकत आहे! आपल्यातला प्रत्येक माणूस बदलतो, परिस्थितीनी, अनुभवांनी किंवा क्वचित जाणीवपूर्वक ठरवून बदलतो. मला वाटतं मला जाणीवपूर्वक ठरवून बदलायला आवडेल.
आपल्यातल्या प्रत्येकाला ठरवलं तर बदलता येतं. त्यासाठी विचारांची स्पष्टता हवी. आणि अर्थातच भावनांची सुद्धा. गुंतागुंतीच्या भावना मनांत बाळगून सकारात्मक बदल नाही घडवता येत. कधीकधी विचार आणि भावना दोन्ही मधे स्पष्टता असताना, आणि होणारा बदल आपल्या स्वतःसाठी चांगला असतानाही आपण बदलायला धजावत नाही. कारण बदलताना जुनं काहीतरी सुटतं आहे ह्याची हळहळ जाणवत असते.
म्हणजेच अगदी जे आहे ते कुठेतरी सलणारं असलं तरीही आपण ते कुरवाळत बसतो कारण आपल्याला त्यातून मोकळं व्हावंसं वाटत नाही. ह्याचं खरं कारण अचानक आपल्याला रिकामं झाल्यासारखं होतं. आणि हे रिकामं रिकामं वाटणं आपल्याला जास्त त्रास देतं. ही मनस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येते.. ह्या पावसाळ्यात मी तो अनुभव घेतला. पाऊस कितीही मुसळधार कोसळला तरी तो पोचू शकला नाही माझ्या पर्यंत. इतकी अलिप्त झाले मी. आपल्या ही नकळत आपलं मन आपल्यालाच सांभाळत असतं (Coping Mechanism). आणि म्हणून उदास आणि अस्वस्थ व्हायचं नाही. ही मनस्थिती सुद्धा पूर्ण अनुभवायची, जगायची. असे रिकामं वाटण्याचे अनुभव आठवून पहा बरं. .आणि मग त्या रिकामपणाच्या पोकळीत सकारात्मकता भरता येते का पहा. फार सुंदर अनुभूती असते ही पण.
मन काळोखाची गुंफा
मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात
मन देवाचे पाऊल!
ह्या पावसाने मला काही काळासाठी बाकी सगळ्यातून अलिप्त केलं खरं,पण माझं त्या अलिप्ततेतल्या पोकळी बरोबर ही नातं जुळलं. सोपं नसतं ना अलिप्त होणं.
© वृषाली आठले
Counseling Psychologist
Psychotherapist
16/9/2025






Address

F/17, Shree Parshwa Industrial Premises, V P Road. Opp Plasma Blood Bank
Dombivli East
421201

Opening Hours

Tuesday 5pm - 9pm
Wednesday 10am - 1pm
Thursday 5pm - 9pm
Friday 10am - 1pm
Saturday 5pm - 9pm
Sunday 10am - 1pm

Telephone

+919769083479

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vrushali Athale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Vrushali Athale:

Share