05/07/2025
"यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:॥"
— मनुस्मृती, अध्याय 3, श्लोक 56
📜 शब्दशः मराठी अर्थ:
यत्र – जिथे
नार्यः – स्त्रिया
तु – खचितच / खरंच
पूज्यन्ते – पूजल्या जातात / आदराने वागविल्या जातात
रमन्ते – रमतात / प्रसन्न होतात
तत्र – तेथे
देवता: – देवता
यत्र एता: तु न पूज्यन्ते – ज्या ठिकाणी या स्त्रिया पूजल्या जात नाहीत
सर्वाः तत्र अफला: क्रियाः – तेथील सर्व क्रिया निष्फळ होतात
🌸 मराठीत सुलभ अर्थ:
"ज्या घरात किंवा समाजात स्त्रियांचा सन्मान आणि पूजन केले जाते, तिथे देवताही आनंदाने वास करतात. पण ज्या ठिकाणी स्त्रियांना सन्मान दिला जात नाही, तिथे केलेले सर्व शुभकार्य निष्फळ ठरतात."
🧭 (संदेश):
या श्लोकाचा संदर्भ आपल्या दैनंदिन जीवनाशी लावायला गेले तर आताच्या स्त्रियांना या श्लोकात जसे सांगितले आहे त्या दर्जाचे स्थान मिळते का याचा विचार करण्याची गरज आहे.
अलीकडची ताजी उदाहरणे आपण घेऊयात .यानिमित्ताने स्त्रियांच्या अंतरंगातील ज्वालामुखी रोज नव्याने कसा उसळून बाहेर पडतोय हे बघूया.या लेखमालिकेत आपण सर्व जिवंत कहाण्यांची मालिका वाचणार आहोत.
1) वैष्णवी हगवणे...
आई वडिलांनी लडिवाळाने वाढवले गेलेले लेकरू सासरच्या लोकांनी सासरी छळून कुस्करून मारले असेच म्हणावे लागेल.
आज ती या जगात नाही पण तिच्या वाट्याला जे त्यांनी दिले त्याचा आशीर्वाद म्हणजे त्या कुटुंबाची आपल्या देशात निघालेली मानहानी रुपी धिंड.
कदाचित चुकली असेल तीसुध्दा पण तुमचे दिवटे असे कोणते परिपूर्णतेचे पुतळे होते याचे सामाजिक भान ठेवले असते तर एक कळी उमलायच्या आत चितेत जळाली पण.
त्या काळामध्ये एका ब्राह्मण लेखकाने एक लेख लिहला होता....
आईशप्पथ तुम्हाला सांगतो या ठिकाणी नरवणे असता तर अख्खा महाराष्ट्र पेटविला असता...हगवणे आहे म्हणून सारे कसे निमूटपणे चालले आहे....
ते वाक्य माझ्या काळजाला इतके लागले की कितीतरी दिवस त्याच्यावर विचारमंथन करण्यात गेले शब्द तिखट असले तरी हे वाक्य खऱ्या बाजूची बोचरी शाल पांघरूण बसले होते.
आम्हा मराठ्यांच्या लेकी सुनांना संस्काराच्या शिदोरीत एक डोस नेहमी पाजला जातो " बायांनो जाती साठी माती खा"
जसं असेल तसं स्वीकारून संसार नेटका करायचा प्रयत्न करा... भले तु तिथे जरा होरपळली तरी चालेल..
आमचे जातबंधव मिरवणुका जयंत्या साजऱ्या करत असताना गाडीचे सायलेन्सर काढून धूर फेकत आपण वाघाची वंशावळ आहोत हे गर्जून सांगतात...पण पोटच्या पोरीला कधी हा सांगत नाहीत की तू वाघाची "बछडी" आहेस ....वेळप्रसंग बघून तुझी वाघनखे बाहेर काढ....
तिच्यावर लहानपनापासून एकच संस्कार केला जातो
जसे असेल तसे राहायचे.तू जर अशी वागली तर समाजात आमची काय इज्जत राहील."इज्जत" हा शब्द ओशाळलेल्या ढगासारखा वाटतो....आणि याच इब्रतीसाठी आमच्या पोरी घरोघरी जाळल्या जातात...
माझ्या लहानपणीची एक गोष्ट सांगावीशी वाटते .लहान असताना आमच्या शेताच्या वाटेवर एक पडकी विहीर लागायची .विहिरीत पाणी होते..पण त्याचा शेतीसाठी पण कोणी वापर करायचे नाही.माणूस तर लांब पण साधे जनावर पण तिकडे फिरकायचे नाही.
मी एके दिवशी माझ्या आईला विचारले या विहारीची अशी अवस्था का..लोक इथे जायला घाबरतात का...तिने एक गोष्ट सांगितली खूप वर्षापूर्वी एक खूप सुंदर बाई या गावात संसार करायला आली होती..तिचा नीटनेटकेपणा,उठावदारपणा काही नतभ्रष्ट माथेफिरून रुचला नाही.तिची जिरवायची म्हणून कुणीतरी तिची कळ
काढली पण ते भांडण गावाच्या पंचासमोर पेटून उठले
पण त्या भांडणात तिच्या कपड्यांची चिरफाड झाली... आख्या गावासमोर आपण उघडे पडलो हे तिला सहन झाले नाही आणि तिने याच विहिरीत आत्महत्या केली बघ मग त्या खोड काढणाऱ्या माणसांना पोलिसांनी शिक्षा दिली असेल होय ना ग मी म्हटले..तसे झाले नाही बाळा..ते सर्व प्रकरण पंच लोकांनी आतल्या आत दाबून ठेवले गेले....तिला न्याय नाहीच मिळाला ना मग......
तसे नसते बाळा या जगात तू जी पण चांगली वाईट कामे करशील याचा सर्व हिशेब परमेश्वर ठेवतो बघ .तिला सरतेशेवटी न्याय मिळाला ना ...तोही देवाच्या दारात...ज्यांनी कारण नसताना छळले ....त्याचा वंश वाढला नाही...आणि त्याचा मृत्यू फार दैनीय व वाईट झाला...
पण आमच्या कितीतरी लेकीबाळी पुरुषी अहंकार,
सासू व नंदेचा छळकपट या कारणाने मातीत परत सामावल्या......
मुळात
स्त्रियांचा सन्मान हा संस्कृतीचा पाया आहे हे आपण विसरलो आहोत.
तिचा आदर, सन्मान, सुरक्षितता हे आता कुणाला तितके महत्वाचे वाटत नाही.
ज्या समाजात स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते, तिथे नैतिक व आध्यात्मिक अधःपतन होतो, ही शिकवण आपली पुराणें देतात.पण लक्षात कोण घेतो.
आधुनिक काळात हा श्लोक gender equality,
women empowerment,
family values
यावर भाष्य. आणि विवेचन करत असताना दिसतो
परवा मला मनिषा भेटली admit होती तासभर गप्पा मारत होती....सलाईन संपली आणि जाता जाता मला म्हणाली बरं झालं मला पोरगी दिली नाही देवाने...तिला तळहाताच्या फोडा सारखे जपाआणि जीव घ्यायला कसायाच्या दारात बांधा .....
मी म्हटले तुझ्या दोन पोरांच्या बरोबर लग्न करायसाठी कोणालातरी दोन पोरी जन्माला घालायला लागणारच की ....तुला सासू बनायला आवडतं खमकी आई बनायला नको...ती हसायला लागली..तुमच्यासारख्या बायकाच तिचे जन्माला येणे नाकारता हे फार वाईट आहे ...
जगराहाटी चालायची असेल तर तिचे जन्माला येणे नाकारू नका.......
क्रमशः
डॉ दिपा.
विटा,सांगली .