08/08/2024
☘️आयुर्वेदाचे बोल 🕊️
🌼खैय्के पान बना रस वाला....🌼
‘आपला देश’ किती विविधतेने नटलेला आहे. प्रत्येक राज्याचे वेगवेगळे पोशाख, खाद्यपदार्थ, व्यंजने! हे सर्व खाद्यपदार्थ तिथल्या वातावरणाला, तेथील लोकांच्या प्रकृतीला अनुसरून बनवलेले. खरच आपले पूर्वज किती बुद्धिमान होते हे पदोपदी लक्षात येतं. सगळी कडे वेगवेगळे व्यंजनं असली तरी सगळी कडेच गुरु म्हणजे भरगच्च जेवणानंतर सारखंच खाल्लं जातं ते म्हणजे तांबुल किंवा पान.
काही दिवसांपूर्वी एका समारंभात गेलो होतो. तिथे आपलं नेहमी सारखं जेवणाच्या स्टॉल बरोबर आईस्क्रीम चा स्टॉल....आमचे जेवण आटोपली आणि ग्रुप निघाला आईस्क्रीम कडे! माझा हात पकडून एक मैत्रीण मला घेऊन निघाली.
“मी नही गं खाणार?” मी
“बसं गं ....चल मस्त आईस्क्रीम खाऊयात, तुझं नेहमीच असत, फास्ट फूड नाही खाणार, हे नाही खाणार ते नाही खाणार अँड ब्ला...ब्ला...ब्ला...” मैत्रीण. आम्ही एकच हसलो.
“पान असेल तर खाईन.” मी
“हे बरय! डॉक्टर साहेब पान खातील पण आईस्क्रीम नको.” पान तर हेल्थ साठी खराब असत ना.”? तिला समजावून सांगण्याची ती वेळ नव्हती आणि जागाही. मी आपली गप्प बसली. पानाचा बोकणा होताच तोंडात.
आम्ही घरी आलो पण “हेल्थ साठी पान खराब असत ना” हे तिचे वाक्य माझ्या डोक्यात फिरतच होते. पान हे हेल्थ साठी कधीच खराब नव्हतं. जो पर्यंत आपण त्यात तंबाखू, जर्दा टाकला नाही. तांबुल किंवा पान हे कफ वातहर असत. तांबुल खाल्ल्याने पचन सुधारते. आवाज चांगला होतो (म्हणजे बसला असेल तर), मुख स्वच्छ होण्यास मदत होते. मुखाचा दुर्गंध जातो. पोट साफ होण्यास मदत होते. याशिवाय बऱ्याच आयुर्वेदिक औषधात नागवेली पत्र म्हणजे पानाचा उपयोग केला जातो. पानात टाकण्यात येणारे जिन्नस पण शरीरासाठी योग्य असतात. जसे काथाने तोंड आले असल्यास फायदा होतो, चुन्यामध्ये कॅल्शियम प्रचुर मात्रेत असत. सोफ व ओवा अग्नी वाढवणारा असतो.
या उलट आईस्क्रीम! गरम गरम जेवणानंतर लगेच थंडगार आईस्क्रीम हे विरुद्ध असत. शिवाय जी अग्नी उदरात पेटली आहे, जी अन्न पचवणार आहे तिच्या वर आईस्क्रीम टाकून आपण विझवून टाकतो. ज्यामुळे अपचन होऊन अनेक व्याधी निर्माण होतात. बऱ्याच घरांमध्ये जेवणानंतर आईस्क्रीम खाण्याचे रुटीन असत. जर असच रोज राहील तर बिपी, शुगर, लठ्ठपणा आलाच म्हणून समजा.
वेस्टर्न कल्चर फोल्लो करण्यापूर्वी एकदा शहानिशा करून मगच फोल्लो करा.
टीप – अम्लपित्त, पित्ताचे आजार, जळजळ असणार्यांनी तांबुल सेवन टाळावे.
वैद्या . मयुरी देशपांडे
एम.डी (कायाचिकित्सा), दीर्घायू आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म सेंटर, रामनगर, वर्धा.