14/11/2019
वातज विकार (संधीवात)
स्वाती ! संस्कारी, कर्तव्यदक्ष, सुगृहिणी ! सगळ्यांची काळजी घेणारी, स्वत:ला कितीहि त्रास झाला तरी काहिही कुरबुर न करता सगळ्यांसाठी झटणारी ! सुनीलबरोबर नुकतेच लग्न झालेले. संसार अगदी छान चालू होता. सासू-सासरे, सुनीलची आजी .. सगळे अगदी आनंदात होते. लग्नाला २ वर्षे होत आली, आजी अगदी मागे लागली .. लवकर बाळाचा विचार करा म्हणू लागली आणि अशातच स्वातीने गोड बातमी दिली. मग काय सगळा आनंदच ! सगळे अगदी स्वातीचे कौतुक करु लागले. काय हवंय-नकोय ते बघू लागले. स्वाती कुठे गप्प बसायला तयारच नाही. नुसती गडबड. कामे.. पट्पट् चालणे, बसणे-ऊठणे, अश्या गोष्टी. ती तब्येतीने चवळीची शेंग म्हणावी तशीच !
बघता बघता तो दिवस आलाच. आणि स्वातीने छान-गोंडस बाळाला जन्म दिला. मग काय आजी अगदी खुष ! घराला दिवा मिळाला म्हणू लागली. स्वाती, सुनील, सासु-सासरे सगळे मजेत. ८-१० दिवसातच स्वाती परत पहिल्यासारखी कामाला लागली. आजी,सास,आई
सगळे म्हणत "अग नको दगदग करु, पाण्यात काम करु, ओझी नको उचलू." . पण स्वाती कशाची ऐकतेय ! दिवसामागुन दिवस गेले. बाळ मोठे झाले. शाळेत जावू लागले.
डिसेंबर महिना लागला. खूप थंडी वाढलेली. सकाळी रोज स्वाती ५ वाजता ऊठून सगऴी कामे करायला तयार व्हायची. पण त्या दिवशी तिला काही ऊठता येत नव्हते. तिची कंबर, हात-पाय सगळे सांधे कसे एकदम आखडून गेल्यासारखे लॉक झाले होते. हालचाल करता येत नव्हती. कशीतरी ऊठली आणि कामाला लागली. पण तो त्रास वाढतच गेला. डॉक्टरांनी संधीवात ( आर्थ्राईटिस ) झाला हे निदान केले. मग काय रोज शेक, मसाज-औषधे सुरु झाली. पण स्वाती मात्र अगदिच टेन्शन मध्ये. आजी एकदा म्हणालीच ,"तूला सांगितलेच होते. नको पाण्यात कामे करु, नको ओझी उचलु... बाळंत झाल्यावर दोन-तीन महिने पाण्यात कामे करायची नाहित. थंड हवेत जावू नये. कानाला स्कार्फ बांधावा, स्वेटर घालावा, घरात चप्पल वापर , पायमोजे वापर...आणि मुख्य म्हणजे बाळंतकाढा पी ! ..तू काही ऐकले नाहीस .. आता सहन करा ! "
डॉक्टरांनी औषधे दिली. महारासनादि काढा. महायोगराज गुग्गूळ. वातहरवटी इ.इ. पण बरे व्हायला कमीत कमी २-३ महिने लागले. आणि त्रास थोडा कमी झाला, पण पुढे आयुष्यभर तिला थंड वातावरणात थोडाफार त्रास होत राहिला.