08/03/2021
महिलांचे आरोग्य व होमिओपॅथी
आजच्या आधुनिक वातावरणात मुलगा आणि मुलगी यांना एकत्र, एकसारखं वाढवलं जातं, शिकवलं जातं, सांभाळलं जातं. परंतु काही निसर्गदत्त जाणीवा आणि बदल मात्र नाकारता येत नाहीत. स्त्रीच्या बाबतीत असा पहिला ठळक बदल म्हणजे मासिक पाळीची सुरुवात. अशा वेळी मुलींना विविध तक्रारींना सामोरे जावे लागते.
यासाठी होमिओपॅथी उपचारपद्धती आदर्श ठरु शकते, शिवाय ही औषधे सौम्य, सोपी, सवय न लावणारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यक्तिविशिष्ट असतात. उदा. एखाद्या हळव्या स्वभावाच्या मुलीची पाळी अकारण उशीरा अथवा अनियमितपणे येत असेल, पाण्यात जास्त काम केल्याने ती दबली जात असेल, बारीकसारीक कारणाने तिला रडू येत असेल, पाळीच्या आसपास अपचनाच्या किंवा जुलाबाच्या तक्रारी असतील तर ’पल्सेटिला’ हे औषध उपयोगी पडू शकेल.
पाळीपूर्वी अथवा पाळी चालू असतांना ओटीपोटात होणा-या वेदना, अनियमित स्राव, मानसिक दृष्ट्या ’नर्व्हस’ आणि सोबत सांध्यांच्या वेदना असतील तर त्या मुलीला ’सिमिसिफ्युगा’ हे औषध वरदान ठरेल.
दिवसेंदिवस अशा तक्रारींसाठी केवळ औषध घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. जणू काही ’pill for every ill’ हा एक मंत्र बनू पहात आहे. याला कारण शहरी जीवनाचा वाढता वेग, व्यायामाचा अभाव, वाढते वजन, वेळी-अवेळी खाण्याचा स्वभाव, वडापाव संस्कृती आणि वेदना सहन करण्याची तर बातच नाही.
या पार्श्वभूमीवर व्याधीचे वेगळेपण लक्षात घेऊन योग्य आचार आणि आवश्यक तेवढाच औषधोपचार हा विचार होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांनी सुमारे २०० वर्षांपूर्वी मांडला आणि आजच्या मेडिसीन-मॅडनेसच्या जमान्यात खरं तर हा विचार रुजविण्याची नितांत आवश्यकता आहे.
विशेषतः स्त्रियांसाठी ’होमिओपॅथी’ ही एक जवळच्या मैत्रिणीसारखी आहे. दैनंदिन जीवनात एक मुलगी, पत्नी, आई, गृहिणी किंवा नोकरदार महिला अशा विविध भूमिका पार पाडतांना आपले आरोग्य अबाधित राखण्यासाठी होमिओपॅथी उपचार साहाय्यभूत होऊ शकेल.
असं म्हणतात की व्यक्ती एक तर विवाहित तरी असते किंवा आनंदी तरी असते! परंतु होमिओपॅथीच्या साथीने विवाहित स्त्री नक्कीच आनंदी राहू शकते.
विवाहपश्चात नवीन वातावरणाविषयी निर्माण झालेली अनामिक भीती अथवा हूरहूर कमी करण्यासाठी ऍकोनाईट, पल्सेटिला, इग्नेशिया यांसारखी औषधे घेऊन मनावरील ताण सुसह्य करता येईल.
लैंगिक समस्येविषयी तर बोलायचीच चोरी. परंतु त्यामुळे अनेक तरुणींना खूप मोठी किंमत मोजावी लागते. यासाठी मुख्यत्वे करुन योग्य मार्गदर्शन, शास्त्रीय माहिती आणि आवश्यक तेवढेच पूरक उपचार दिले जावेत. अशा प्रसंगी ’नव्या नवरीचे औषध’ असा उल्लेख असलेले स्टॅफिसाग्रीया हे औषध अनेक तरुणींना उपकारक ठरु शकेल.
अनेकदा घरातील वातावरणामुळे नव्या सूनेचा भावनिक कोंडमारा होतो. कुठे व्यक्त होता येत नाही. अशा वेळी नॅट्रम अथवा मॅग्नेशिअम गटातील औषधांचा उपयोग होऊ शकतो.
स्त्री जीवनातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे गर्भारपण आणि प्रसूती. या कालावधीत अनेक बारीकसारीक तक्रारींना सामोरे जावे लागते, परंतु वारंवार औषधे घेणेदेखील अशा वेळी अपायकारक ठरु शकते. आणि याला अपवाद म्हणजे होमिओपॅथी उपचार. कारण या औषधांना कुठलेही अनुषंगिक-दुष्परिणाम (साईड-इफेक्टस्) नसतात. शिवाय औषध-निवड लक्षणांच्या आधारे असल्यामुळे नेमकेपणाने उपचार केले जाऊ शकतात. उदा. पहीलटकरीणमध्ये असलेली प्रसूतीची अकारण भीती ऍकोनाईटमुळे कमी होऊ शकते ; अन्नाच्या केवळ वासाने निर्माण होणारी उलटी-मळमळीची भावना कॉल्चिकम अथवा सेपियासारख्या औषधाने दूर होऊ शकते.
अनेक मानसशास्त्रज्ञ सांगतात की, ’वैवाहिक जीवनातल्या अनेक दबलेल्या कहाण्यांतून स्त्रियांची कित्येक आजारपणं जन्माला येत असतात.’ अशा या आजारपणाच्या विविध छटा चाळीशीच्या आसपास प्रकर्षाने जाणवतात. काही शारीरिक बदलाचे (हार्मोनल) तर काही मानसिक प्रतिसादाचे परिणाम असतात, काही नैसर्गिक असतात तर काही व्यक्तिगत असतात.
मेनोपॉजच्या टप्प्यातील अनेक आजार मनो-कायिक असतात व होमिओपॅथी उपचारांचा हाच मुळी गाभा आहे. अशा आजारांत शरीर व मनाचा एकत्रित उपचार केला जातो. उदा. ग्राफाईट या औषधाची स्त्री गोंधळलेली, चिकित्सक वृत्तीची, निराश व भावूक स्वभावाची असते. टाळूची आग, बद्धकोष्ठता, त्वचाविकार, अंगावरुन जाणारा पांढरा स्राव, स्थूलत्व आणि अपचनाच्या तक्रारी, गोड पदार्थाची नावड, संभोगाचा तिटकारा अशा लक्षण-समूहासाठी ग्राफाईट उपयोगी पडते.
संशयी, बोलघेवडी, बारीक अंगकाठीची, सतत गार वारा – फॅन हवा असणारी, त्वचेवर काळसर डाग, व्हेरिकोज-व्हेन्स, अकारण सुरु झालेला रक्तदाब, छातीत होणारी धडधड, सैल कपड्यांचा वापर सुखावह वाटतो, शरीरातून गरम वाफा जाणवतात, रात्रीच्या वेळी तक्रारी वाढतात, अशावेळी लॅकेसिससारखे सर्पविष उपयोगी ठरते. उंच, बारीक, सडपातळ, पुरुषी स्त्रियांना सेपिया हे औषध उपयोगी पडू शकते. बेपर्वा, उदासीन वृत्ती, अकारण रडू येते, त्वचेचे विकार, अंग बाहेर येण्याची तक्रार, एके काळी अतिशय स्मार्ट, तल्लख, उत्साही असलेली ही स्त्री मंद, शिथिल, निस्तेज बनते. सांसारिक जबाबदा-या पार पाडता पाडता चाळीशी्पर्यंत पार खचून जाते.
चाळीशी हा टप्पा स्त्रीसाठी पुनर्जन्माचाही ठरु शकतो. गरज आहे दृष्टीकोन बदलण्यासाठी, कात टाकण्याची, उगाळत बसण्यापेक्षा उजाळत जाण्याची! अशा वेळी होमिओपॅथी अभ्यास हा एक सार्थ पर्याय ठरु शकतो. खरं तर प्रत्येक स्त्रीने या उपचार पद्धतीने प्राथमिक अभ्यास करुन घरातील आजीबाईच्या बटव्याचे पुनरुज्जीवन केले पाहिजे.
डॉ. प्रदीप सेठिया