
18/07/2025
महाराजांची जेव्हढी पुस्तके वाचनात आली, त्या प्रत्येक पुस्तकातून नवीन काहीतरी दर्शन होतं. प्रत्येक घटनेकडे वेगवेगळ्या व्यक्ती वा लेखकांनी, वेगवेगळ्या अंगांनी पाहिलं आणि त्यातून महाराजांचे वेगवेगळे व्यक्तिमत्व विशेष समोर आले.
महाराजांबद्दलचा वाचनप्रवास हा कादंबरी, मग वस्तुनिष्ठ इतिहास, मग संदर्भासहित्य असा झाला. त्यानंतर आता शिवाजी या संकल्पनेचं आकलन (Understanding), पृथक्करण(Analysis) हा टप्पा येतो. सदर पुस्तकात इतिहासलेखकांच्या लेखनाचा आधार घेऊन महाराजांचे व्यक्तिमत्व व कारकिर्द यांचे बहुआयामी दर्शन घडते. महाराज म्हणजे एक युद्धकुशल सेनानी अशी एक लोकप्रिय पण अपूर्ण प्रतिमा जनमानसात खूप खोलवर रुजली आहे. पण त्यापलीकडे जाऊन महाराज म्हणजे उत्कृष्ट ॲडमिनिस्ट्रेटर/व्यवस्थापक, अर्थतज्ञ, मुत्सद्दी, संघटक, दूरदर्शी राजकारणी आणि तरीही अतिशय संवेदनाशील शासक होते. महाराजांचे हे पैलू अल्प स्वरूपात समोर आले आहेत. त्या सर्वांना एकत्रित करून सोप्या आणि तरीही रंजक स्वरूपात लेखकाने मांडले आहे.
लेखकाने या पुस्तकात, पद्धतशीरपणे प्रत्येक व्यक्तीविशेष निवडून त्याचे साधार विश्लेषण केले आहे. इतिहासरंजन व इतिहासकथन यापेक्षा वेगळे काहीतरी म्हणजे इतिहासविश्लेषण आणि त्यातून इतिहासआकलन याचा आनंद पुस्तक वाचताना मिळतो.
'शिवाजी महाराज' ही व्यक्ती नसून एक 'संकल्पना' आहे आणि ती समजून घ्यायची असेल तर जरूर वाचावे असे साहित्य....