09/03/2020
होली कब हैं? कब हैं होली?
हा प्रश्न फक्त गब्बरसिंगनेच विचारला पाहिजे असं काही नाही. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनात या रंगाच्या महोत्सवाची आस लागलेली असते. जीवाची काहिली करणाऱ्या परंतु निसर्गचक्राचा अविभाज्य भाग असणाऱ्या उन्हाळ्याचे, रंगांची मनसोक्त उधळण करून, गोडधोड़ खाउन, मस्तीभरे स्वागत करण्याचा हा सोहळा असतो.
अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठान् पर्यन्त सर्वांनाच मनापासून खुलवणारा सण म्हणजे होळी ! आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात धूलिवंदन व रंगपंचमी असे दोन रंगबिरंगी सोहळे होतात.
मित्र मैत्रीणीना, जीवलगांना रंगात न्हाऊ घालत मनसोक्त धमाल करणारा हा सण झाल्याबरोबर त्वचेचे व केसांचे आजार घेऊन येणाऱ्या रोग्यांची संख्या वाढते.
म्हणूनच यावर्षी होळी व रंगपंचमीच्या शुभेच्छा देतानाच 'रंगिल्या' लोकांसाठी काही महत्वाच्या सूचना
नियम काळजीचे तुम्ही पाळा।
न् वापरोनी रंग कृत्रिम, ग्रीस काळा।
करावा साजरा नैसर्गिक रंगाचा सोहळा । देवोनी आनंद सकलजनांसी ।।
होळी रंगपंचमीच्या आनंदावर विरजण पडते ते त्वचेला किंवा केसांना रंगांचा किंवा केमिकलचा त्रास झाल्याने. स्वस्त केमिकलने युक्त कृत्रिम रंग किंवा सर्वात भयंकर म्हणजे क्रूड ऑइल, ग्रीस अश्या गोष्टीच्या वापरामुळे त्वचेचे खूप नुकसान होते. हे टाळणे गरजेचे आहे.
*१. नैसर्गिक रंगांचाच वापर करा*
मेहंदी, हळद, गुलाबाच्या पाकळ्या, झेंडूची फुले, इतकेच काय तर पालकची पाने व बीट या भाज्यांपासून देखील चांगले रंग तयार करता येतात. बाजारात मिळणारे नैसर्गीक किंवा हर्बल रंग महाग असल्याची तक्रार अनेक जण करतात परंतु आपल्या त्वचेपेक्षा ती किंमत जास्त नव्हे.
*२. रंग त्वचेत उतरु नये याची काळजी घ्या.*
रंग खेळण्या आधी त्वचेवर चांगले मॉइस्चराइजर किंवा तेलाचा थर किमान 15 ते 20 मिनिटे आधी लावावा. केसांत तेल लावावे किंवा हेअर जेल लावावी. किंवा कंडीशनर लावून धुवू नये. त्वचेवर पाण्यात न् विर्घळणारे सनस्क्रीन लावावे. पिम्पल्स असणाऱ्यानी चेहऱ्यावर तेल किंवा पेट्रोलियम जेली लावू नये.
*3. कपडे*
"होली के दिन इतने भी पुराने कपड़े ना पहने की
लोग रंग लगाने के बजाय हाथ में चव्वनी दे दे" असा विनोदी मेसेज सगळी कड़े फिरतोय. कपडयाचे फार महत्व आहे. सैल, संपूर्ण शरीर झाकणारे, थोडेसे गडद रंगाचे कपडे रंग खेळताना वापरा. ओले घट्ट कपड़े हे यश चोप्रांच्या फिल्मी होळीसाठी ठीक आहेत, आपल्या शरीरावर घट्ट व ओल्या कपडयामुळे बुरशीची लागण होऊ शकते.
*४. डोळ्यांच्या व केसांच्या संरक्षणासाठी टोपी व गॉगल वापरा*
रंग डोळ्यात गेल्यास वाहत्या पाण्याने धुवा डोळे चोळू नका व तत्काळ नेत्र रोगतज्ञाना दाखवा
*५. त्वचेला रंगांची रिएक्शन आल्यास*
किंवा रंगाचा त्रास होऊ लागल्यास तत्काळ वाहत्या व कोमट पाण्याने त्वचा धुवावी परंतू घासू नये. त्वचा कोरडी करताना टिपून घ्यावी टॉवेलने घासू नये.
चेहरा स्वच्छ करताना डोळे व तोंड घट्ट मिटलेले असावे.
*६.त्वचेची जळजळ झाल्यास अथवा लाल झाल्यास*
तात्पुरता उपाय म्हणून कॅलामाइन लोशन वापरा पण तत्काळ त्वचारोगतज्ञाना दाखवा व सल्ला घ्या.
*७*. रंगाच्या या मनोहारी उत्सवाआधी व नंतर लगेचच वैक्सिंग, ब्लीचिंग व फेशियल करू नका.
*८*. रंग खेळून झाल्यावर मध्यम किंवा सौम्य शाम्पूने केस धुवा, कंडीशनर लावा. केस खूपच कोरडे झाले असल्यास तेल लावा.
*९. आपल्या प्रिय पाळीव प्राण्यांना रंग लावू नका*
प्राण्यांची कातडी ही खूप नाजुक असते रंगामुळे त्यांना प्रचंड त्रास होतो. केसांत,
फरमध्ये रंग अडकल्याने त्यांना विविध आजार होतात व डोळ्यात रंग गेल्याने तर अंधत्व येवू शकते.
*१०. त्वचेवरील रंग काढताना अंग खूप घासू नका*
किंवा केस स्वच्छ करण्यासाठी खूप तीव्र स्वरूपाचा शाम्पू वापरु नका. त्वचेचा रंग पूर्ववत करण्यासाठी घरगुती उपाय जपुन वापरा.
ही सर्व काळजी घेवून सुद्धा धूलिवंदन व रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी आपण लाल, हिरव्या, निळ्या, पिवळ्या रंगानी माखलेले असूच आणि जरी अंगावरचा रंग हळूहळू फिकट होत गेला तरी या रंगोत्सवाच्या आनंदाच्या आठवणी काही पुसल्या जाणार नाहीत!
*_होळी, धूलिवंदन व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!_*
योग्य काळजी घ्या व स्वतःला त्रासापासुन वाचवा
आपली त्वचा सुंदर निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी आम्ही आहोतच्
#9/03/2020
*डॉ. राजीव सूर्यवंशी*
त्वचारोगतज्ञ व सौंदर्य शास्त्रतज्ञ
फिनिक्स स्किन, हेअर, लेझर क्लिनिक व स्पा
1ला मजला मित्तल टॉवर
बजाज शो रूमच्यावर
मनमाड रोड सावेडी अहमदनगर
02412329845
9011690866