20/02/2024
खरंच आपल्याला ‘मुली' हव्या आहेत का?
रोजच्या रूटीनप्रमाणे ओपीडीत पेशंट तपासत असताना आरोग्य अधिकाऱ्यांचा व्हॉटसअप ग्रुपवर मेसेज आला. स्त्रीरोग तज्ज्ञ व सोनोग्राफी तज्ज्ञांची बैठक बोलविण्यात आली आहे...विषय होता.. PCPNDT (गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदा)...विषय वाचल्यावर थोडसं टेन्शनच आलं...आधीच या कायद्याची अंमलबजावणी करताना कागदोपत्री काम खूप आहे...आता बैठकीत आणखी काय नवीन काम लागणार?...असा विचार करीतच बैठकीला पोहोचलो. अनेक स्त्रीरोग तज्ज्ञ, सोनोग्राफी तज्ज्ञ तिथे होते...आरोग्य अधिकारी मोठ्या स्क्रिनवर आकडेवारी दाखवत होते. नगर जिल्ह्यात स्त्री जन्माचे प्रमाण घटले असून ते चिंताजनक पातळीवर आले आहे..डिसेंबर 2023 अखेर दर 1 हजार मुलांमागे स्त्री जन्माचे प्रमाण 850-60 पर्यंत खाली घसरले आहे...स्त्री पुरुष जन्मदरातील विषमता वाढत असून ती मेंटेन करण्यासंदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांनी सूचना केल्या...मिटिंग संपली...परत हॉस्पिटलला आलो, डोक्यात विचारचक्र सुरु झाले...
मागील दहा पंधरा वर्षात स्त्री पुरुष जन्मदर मेंटेन ठेवण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करीत आहे. अनेक कायदे आणले आहेत. स्त्री जन्माचे स्वागत, बेटी बचाओ, बेटी पढाओ सारख्या राष्ट्रीय चळवळीतून जनजागृती केली जात आहे. लेक लाडकी सारखे अभियान राबविण्यात येत आहे. अनेक सामाजिक संस्थाही समाजात व्यापक जागृती करत आहेत. असे असूनही स्त्री जन्माचे प्रमाण कमी होणे खरंच विचार करायला लावणारं आहे...आमच्यासारखे अनेक स्त्रीरोग तज्ज्ञ सरकारच्या नियमांचे तंतोतंत पालन करतात. कायदा पायदळी तुडवणाऱ्या काही अपप्रवृत्ती समाजात आहेत. त्यामुळे आमच्यासारख्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना त्रास होतो
आमच्याकडे पेशंट आल्यावर आम्ही सर्व कायदे पाळून डिलिव्हरी सुखरुप होईल इतकेच पाहतो...दुसरीकडे कायदा न पाळणाऱ्या समाजविघातक प्रवृत्ती फक्त पैसा पाहून गर्भलिंग निदान करतात, जसे चोर चोरी करताना फक्त पैसा, ऐवज पाहतो, तशीच प्रवृत्ती या लोकांची असते. हे दुष्टचक्र खूप वर्षांपासून चालू आहे..
मला स्वत:ला या गोष्टीला अनेक कारणं आहेत असे वाटतं. कारण सरकारच्या प्रयत्नातून जागृती तर होतच आहे...चांगले परिणामही पहायला मिळतात. पण स्त्रीभ्रूण हत्या 100 टक्के थांबल्या का? तर याचे उत्तर नकारात्मक आहे हे आकडेवारीतूनच स्पष्ट होते...स्त्री जन्माचा दर घटत असल्याने अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत...कित्येक गावांमध्ये मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत....आपल्याला आई, पत्नी, बहिणी हवी असते..पण मुलगी नको असते..ही मानसिकता का? याचा विचार ससंस्कृत समाज म्हणून प्रत्येकानेच करायला हवा...
हम दो हमारे दो असा परिवार असलेल्यांना एक मुलगा, एक मुलगी चालते...पण दोन्ही मुली म्हटलं की पालकांच्या कपाळावर आठ्या असतात...मुलगी जन्माला आली की, चिंता सुरु होते...तिचं शिक्षण, तिच्या लग्नाचा खर्च, हुंडा...पुढे तिची बाळंतपण, त्याचा खर्च...असा सगळा खर्चच खर्च डोळ्यासमोर आणला जातो. त्याचवेळी मुलगा म्हणजे असेट (Asset) आणि मुलगी म्हणजे जबाबदारी (liability)...असं माननंच मुळात चूक आहे...कारण जोपर्यंत आपल्या मनातील मुलगा, मुलगी हा भेद नाहीसा होत नाही तोपर्यंत या गोष्टी पूर्णत: थांबणार नाही...वंशाला दिवाच हवा, मुलगी म्हणजे परक्याचे धन या मानसिकतेतून बाहेर पडायला हवं...याची सुरुवात घरातूनच करायला हवी...मुलगी म्हणून तिला थोडी कळत्या वयाची झाली की, घरातील कामं कर, स्वयंपाक शिक असा तगादा लावला जातो. मुलगा असेल तर त्याला मात्र स्पेशल ट्रिटमेंट...असं का? मुलांनाही सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायला शिकवा...त्यालाही भांडी घासायला, स्वयंपाक करायला शिकवा...मानसिकतेत बराच फरक पडल्याचे दिसून येईल...मुल आईवडीलांचे पाहून अनेक गोष्टी शिकतात....आई वडीलांनीच मुलगा मुलगी असा भेद केला नाही तर मुलांवरही तसे संस्कार होतील...मुलगी सासरी गेली म्हणजे ती कायमची परकी झाली असं मानायचंही कारण नाही...ती चांगली शिकली, कर्तृत्वाने मोठी झाली पाहिजे...तिला माहेरी येजा करू दिली पाहिजे. उलट दोन कुटुंबातील कर्ती म्हणून तिला सन्मान दिला पाहिजे...बरं मुलगी नको ही मानसिकता मोठ्या उच्च शिक्षितांमध्येही दिसून येते...आमच्याकडे डिलिव्हरीला महिला येतात...मुलगा झाल्यावर काही नातेवाईक इतके खूष असतात की बिलात कमी जास्त करा असेही म्हणत नाहीत...पण तेच मुलगी झाल्यावर चेहऱ्यावर उसने हसू आणून लगेचच बिल कमी करण्याचा आग्रह धरला जातो....अनेकदा तर काही नातेवाईकांचे चेहरे असे असतात की, जणू काही डॉक्टरच मुलगी होण्यास कारणीभूत आहेत...अर्थात अशी उदाहरणे थोडीच आहेत....कित्येक वेळा स्त्री जन्माचे उत्साहात स्वागत झाल्याचेही पहायला मिळते...पण म्हणून दुसरी नकारात्मक बाजू सोडून देता येणार नाही...
प्रबोधनातून चांगले काम निश्चिच होत आहे..पण हे प्रयत्न अपुरे आहेत...परंपरेने चालत आलेले समज गैरसमज दूर होणे गरजेचे आहेत...सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुलगा मुलगी दोघातही समानता, त्यांना एकाच पातळीवर आणून त्या दृष्टीने पाहणे महत्वाचे आहे...तरच स्त्री पुरुष गुणोत्तर समान पातळीवर येईल...तेव्हा अनेक सामाजिक प्रश्नही सुटलेले असतील...आणि मुलींच्या किलबिलाटाने प्रत्येक घर आनंदी असल्याचे पहायला मिळेल...तेव्हा तुम्हीही शक्य तितके योगदान द्या...एक एक ‘पणती' प्रज्वलित होण्यासाठी....
-डॉ.अमोल जाधव
स्त्रीरोग तज्ज्ञ, सरस्वती हॉस्पिटल