
18/06/2025
*देखीला आनंदाचा सुख सोहळा*
*’ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’*
संत ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, कबीर या सगळ्या संतांची शिकवण तुकोबांनी आत्मसात केली होती. म्हणूनच आपण तुकोबांचा शब्द अंतिम मानतो.
संत तुकारामांनी प्रस्थापित यंत्रणेला आव्हान दिलं म्हणून आपण त्यांना विद्रोही कवी म्हणतो, पण त्यांचा विद्रोह हा सकारात्मक आहे. कशाचा तरी नाश करणं हे त्यांचं उद्दिष्ट नाही. येशू ख्रिस्ताने म्हटलं होतं, ‘आय हॅव कम टू फुलफिल अँड नॉट टू डिस्ट्रॉय.’ हेच तत्त्व मला तुकोबांच्या बाबतीतही वाटतं.
मी परंपरा पूर्ण करण्यासाठी आलो आहे, मोडण्यासाठी नाही, असाच तुकोबांचा अविर्भाव होता. प्रस्थापित यंत्रणेमध्ये जे जे समतेच्या आणि प्रेमाच्या विरोधात असेल त्यावर ते थेट टीका करतात. प्रस्थापित परंपरेमध्ये धर्म सांगण्याचा अधिकार हा उच्चवर्णीयांकडे होता. तुकोबांनी त्याला आव्हान दिलं आणि धर्म सांगण्याचा अधिकार आपल्या हातात घेतला.
*जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुले । तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ।*
जो समानतेच्या, मानवतेच्या धर्माने पुढे जाईल त्याला देव मानावं, असं ते म्हणतात. म्हणूनच तुकोबा हे न्या. महादेव गोविंद रानडे यांचा प्रार्थना समाज किंवा महात्मा फुलेंचा सत्यशोधक समाज यांची प्रेरणा बनले. धर्म हा माणूस आणि ईश्वर यांच्यातल्या संबंधांबद्दल आहे तसाच तो माणसांमाणसांतल्या संबंधांबद्दलही आहे यावर तुकोबांचा भर होता. तुकोबांची ही 17 व्या शतकातली शिकवण समाजसुधारकांनी पुढे नेली आणि आजही आपल्याला ती अंगीकारावी वाटते, याचाच अर्थ तुकोबा त्यांच्या काळाच्या खूप पुढे होते. तुकोबांच्या वाङ्मयात अध्यात्मासोबतच ऐहिक विचार आहे. स्वर्ग किंवा मोक्षाच्या मागे लागून इहलोकांतल्या व्यवहारांकडे दुर्लक्ष करणं त्यांना मान्य नाही. व्यावहारिक जगामध्ये कसं जगावं याचं मार्गदर्शन त्यांनी त्यांच्या शैलीत अचूकपणे केलं आहे.