08/03/2024
Night Shift आणि आयुर्वेद
सध्याचे धकाधकीचे जीवन, कामाचे बदलते स्वरूप, परदेशी कंपन्यांसोबत ऑनलाईन काम करण्याची उपलब्ध सुविधा या सगळ्या कारणांमुळे दिवसेंदिवस रात्र पाळीत काम करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आधी फक्त कारखान्यात काम करणारे मजूर आणि अधिकारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, जसे की वैद्यकीय सेवा, संरक्षण दल, पोलिस दल, सार्वजनिक वाहतूक अशा क्षेत्रात रात्री पाळी अनिवार्य होती. पण आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विकासामुळे यात रात्रपाळीत काम करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. रात्री जागरण झाल्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होणार हे निश्चित कारण आपल्या शरीराच्या घड्याळाला दिनचर्या - सकाळी उठणे, मलमूत्र विसर्जन, दैनंदिन कामकाज, खाणे पिणे, रात्री झोप अशी सवय झालेली असते. जेव्हा कामाच्या ठिकाणी रात्री जागरण करणे चालू होते, तेव्हा हा सगळा नित्याचा झालेला दिनक्रम बिघडतो. याची तीव्रता, त्या त्या व्यक्तीच्या कामाचे स्वरूप, रात्री सलग किती वेळ सजगपणे काम करावे लागते, शिफ्ट एक एक आठवडा पूर्ण की दर दोन दिवसांनी बदलते या सर्व बाबींवर अवलंबून असते.
आयुर्वेदानुसार रात्री जागरण केल्याने आणि दिवसा झोपल्याने वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचा समतोल बिघडतो. कारण जागरणाने वात दोष वाढतो, तर दिवसा झोपल्याने कफ आणि पित्त दोष वाढतात. तसेच आयुर्वेदात १३ अधारणीय शारीरिक वेग सांगितले आहेत. जसे की मल वेग, मूत्र वेग, क्षुधा, इत्यादि. अर्थात विविध शरीर धर्म ज्याला natural urges म्हणता येईल असे. यात निद्रा अर्थात झोपेचा सुद्धा समावेश केला आहे. आणि झोप आल्यावर न झोपल्याने होण्याच्या त्रासाचे वर्णन करताना चरकाचार्यांनी जांभया येणे, अंग दुखणे, सुस्ती जाणवणे, डोळ्यावर झापड येणे, डोके दुखणे अशा तक्रारी उद्भवतात, असे सांगितलेले आहे. या तात्कालिक त्रासांव्यतिरिक्त वजन वाढणे, कोलेस्टेरॉल, रक्तशर्करा वाढणे, रक्तदाब वाढणे, हृदयविकार अशा जीवनशैलीजन्य आजारांचा धोकाही वाढीस लागतो. झोपेचे चक्र बिघडते, पचनाच्या समस्या सुरू होतात, दिवसभर सुस्त आणि थकलेले वाटू लागते. हेच सर्व त्रास विनाकारण, रात्री उशिरापर्यंत मोबाईल वर गेम खेळणे, सोशल मीडिया वर वेळ घालवत राहणे किंवा OTT platform वर उशिरा पर्यंत वेब सिरीज बघत राहणाऱ्या Gen Z ला सुद्धा चालू होतात. हे लोक जागरण टाळू शकतात. पण ज्यांचे कामच रात्रपाळीत आहे, अशांनी मग काय करावे?! सध्याच्या स्पर्धात्मक युगात, पटकन नोकरी बदलणे सुद्धा शक्य नाही. त्यामुळे अशा व्यक्तींनी काही सोपे आरोग्यरक्षण नियम पाळले आणि जीवनशैलीत थोडे बदल केले तरी त्यांचे स्वास्थ्य अबाधित राहते.
आहार :
सामान्यतः सकाळी पोटभर न्याहारी घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात होत असते. पण रत्रपळीमध्ये मात्र रात्रीच्या जेवणाला महत्त्व आहे. रात्रीचे जेवण हे उशिरा जेवू नये. जास्तीत जास्त ७.३० - ८ वाजेपर्यंत जेवावे. आणि जेवणात शक्यतो पचायला हलके असे पदार्थ खावेत. आयुर्वेदानुसार एरवी रात्री दूध पिणे कफकारक सांगितले आहे. पण रात्री जागरण होणार असेल तर लवकर जेवावे. आणि रात्री एक कप दूध त्यात अर्धा चमचा घरी कढवलेले साजूक तूप घालून खावे. त्यामुळे रात्रीच्या जागरणाने वाढणारा वात नियंत्रणात राहण्यास मदत होते. रात्रीच्या आहारात तळलेले, मसालेदार पदार्थ खाणे कटाक्षाने टाळावे. तसेच थंड पाणी, कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम सुद्धा टाळावे. पिण्यासाठी शक्यतो पाणी गरम राहील अशी बाटली सोबत घेऊन जावी. मध्ये मध्ये थोडे गरम पाणी प्यावे. रात्री सुकामेवा खाल्ला चालेल पण जागे राहण्यासाठी म्हणून चहा, कॉफी अशा पेयांचे सेवन करणे टाळायला हवे. नाईट शिफ्ट संपवून घरी आल्यानंतर जर कडकडून भूक लागली नसेल तर आधी झोपावे. झोप पूर्ण झाल्यानंतर स्नान करून मग जेवावे. खाऊन मग लगेच झोपणे टाळावे. त्यापेक्षा आधी सांगितल्याप्रमाणे झोप झाल्यानंतर खावे, जेणेकरून अपचनाचा त्रास होत नाही.
दिनक्रम :
कोणतीही शिफ्ट चालू असली तरी, व्यायामात सातत्य असायला हवे. आठवड्यातून किमान चार दिवस योगासने / सूर्यनमस्कार - जोर बैठका / चालणे / धावणे / सायकल चालवणे असा एखादा; आपल्या वय, बल, उपलब्ध वेळ आणि आवडीनुसार कोणतातरी एक व्यायाम प्रकार अवश्य करावा. त्यामुळे पचनशक्ती, रक्ताभिसरण, हाडे, स्नायू, मणके यांचे स्वास्थ्य चांगले टिकून राहण्यास मदत होते. नाईट शिफ्ट मुळे शरीरावर जसे परिणाम होतात, तसे मानसिक स्वास्थ्यावर सुद्धा परिणाम होतात. नातेवाईक, मित्र यांना कमी भेटता येते. इतरांपेक्षा आपले घड्याळ पूर्णतः भिन्न चालू असते. अशावेळी मानसिक ताणतणावांचा सुद्धा सामना करावा लागू शकतो. त्यामळे ध्यानधारणा, मेडिटेशन, योगनिद्रा शिकून घेऊन त्याचा सुद्धा आपल्या दिनक्रमात समावेश करावा. फावल्या वेळात चित्रकला, बागकाम, मनाला शांत वाटेल असे संगीत/गाणी ऐकणे असे काही आपल्या आवडीचे काही छंद जोपासावेत. सर्वात महत्वाचे म्हणजे काम सोडून बाकी दिवसभर टिव्ही, मोबाईल, लॅपटॉप अशा सर्व प्रकारच्या स्क्रीन पासून लांब राहावे. त्याने आपला बहुमूल्य वेळ वाया जातोच आणि त्याचा परिणाम आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत असणाऱ्या संवादावर सुद्धा होतो. व्हिडिओ रिल्स मध्ये कसा आणि किती निरर्थक वेळ वाया जातो, हे तो निघून जाईपर्यंत कळत सुद्धा नाही. दिवसाच्या दोन जेवणापैकी किमान एक वेळ तरी कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून जेवण जेवण्याचा प्रयत्न करावा. हे सर्व पाळले तर "वर्क - लाईफ बॅलन्स" अर्थात् काम आणि वैयक्तिक जीवन याचा समतोल राखला जाईल आणि परिणामी शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सुद्धा चांगले राहिल.
- डॉ. अमेय केळकर
डॉ. केळकर आयुरकेयर अँड पंचकर्म सेंटर, अलिबाग
९१६८९११४४४