30/05/2023
मन करा रे प्रसन्न
आपलं मन हे आपल्या प्रत्येकात असणारा महत्वाचा पण न दिसणारा घटक आहे. मन खुश असेल तर सारं काही छान वाटतं, पण मन उदास झाले तर अन्नही गोड लागत नाही. त्यामुळे मन आनंदी, उत्साही, प्रसन्न ठेवणं खूप आवश्यक आहे.
सध्याच्या काळात काळजी किंवा टेन्शन हा प्रत्येकाच्याच आयुष्याचा एक भाग झालाय. त्यामुळे सतत काही ना काही विचार करत रहाणे, चिडचिडेपणा, मनाची चंचलता, भीती, असमाधान, भविष्याची अतिकाळजी या गोष्टी थोड्याफार प्रमाणात प्रत्येकात आढळतात. मनाचे संतुलन राहत नाही. एखादा नुकताच घडलेला आनंदाचा क्षण विचारला तर लोकांना आठवून सांगावा लागतो. शेवटचे खळखळून कधी हसलात हेही आठवत नाही. म्हणजेच मनाची प्रसन्नता हरवत चालली आहे. आयुर्वेदात तर "प्रसन्न आत्मेंद्रिय मन: स्वस्थ इत्यभिधियते" अशी स्वस्थ असण्याची व्याख्या केली आहे. म्हणजेच निरोगी असण्यात मन प्रसन्न असणेही महत्त्वाचे आहे.
मन जर प्रसन्न असेल तर आयुष्यातले संकट, शारीरिक व्याधी, आर्थिक हानी इत्यादींना माणूस तोंड देऊ शकतो. पण मनच दुबळे असेल तर आज नसलेले रोगही उद्या निर्माण होऊ शकतात. गेल्या १-२ वर्षात कोविडमुळे शरीरासोबत मनाचं स्वास्थ्य किती महत्वाचं आहे हे आपल्या लक्षात आलं असेलच. हे मनाचं स्वास्थ्य म्हणजेच स्वतःच्या ठिकाणी स्थिर असं प्रसन्न मन. असं मन ठेवण्यासाठी काय करता येईल पाहू या…
१. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावे. सकाळची वेळ ही प्रसन्न, ताजेतवाने वाटणारी, उत्साहाची असते. त्यामुळे दिवसाची खरंच सुंदर सुरुवात होते. ही सांगण्यापेक्षा अनुभवण्याची गोष्ट आहे.
२. उठल्यानंतर थोडा वेळ, किमान १५ मिनिटे ध्यान करावे. ध्यानात आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करावे. याने मन शांत, स्थिर होते. जास्त वेळ करता आले तर उत्तमच.
३. यानंतर व्यायाम आणि प्राणायाम करावा. व्यायामाने शरीराबरोबर मनही उत्साही होते. आपल्या क्षमतेनुसार थोडा पण नियमित व्यायाम करावा. प्राणायाम म्हणजेच अनुलोम- विलोम करावे. याने श्वासाची लय साधते, शरीरातील प्राणवायूचे संतुलन होते. भ्रामरी आणि ओमकार करावे. या सगळ्यांनी शरीराला, मनाला वेगळीच तरतरी आणि चैतन्य मिळते.
४. नेहमी सकारात्मक विचार ठेवावेत. यासाठी रोज काही वेळ चांगल्या ग्रंथांचे वाचन करावे, हे ग्रंथ मुख्यत: अध्यात्मिक असावेत. रोज थोडेच पण मन लावून वाचावे. त्यातील विचारांचा आपल्या मनावर निश्चित परिणाम होतो.
५. रात्री झोपतानाही काही सकारात्मक वाचन, ध्यान करून झोपावे. म्हणजे झोपेतही आपल्या नकळत आपल्या मनावर तेच संस्कार होत राहतात.
६. घरातल्या लहान मुलांनाही या सर्व गोष्टींची सवय लावावी. मुलांना मोबाईल, कॉम्प्युटरवरचे खेळही विचार करूनच खेळायला द्यावे. मारामारी करून जिंकायला शिकवणाऱ्या या खेळांनी आपण काय साधणार आहोत? याने मनाची चंचलता तर वाढतेच पण मुलांच्या मनात नकळत क्रूरता, राग, असंयम असे दुर्गुण वाढीस लागतात.
७. आपल्या संतांनी करून ठेवलेले साहित्य आपल्याला मानसिक स्वास्थ्य जपायला बहुमोल मदत करते. दासबोध, ज्ञानेश्वरी, तुकारामांचे अभंग, कबीरांचे दोहे खूप काही सांगून जातात. आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच याने बदलतो. त्यांनी करून ठेवलं आहे, आपल्याला फक्त वाचून आचरणात आणायचं आहे. "मनाचे श्लोक" हा तर मानसशास्त्राचा उत्तम ग्रंथ आहे. मनाला काय कर काय नको हे सुंदर रित्या सांगितलं आहे.
८. समाधानी राहायला शिकलं पाहिजे. आपली गरज भागली तरी अपेक्षा संपत नाहीत. त्यामुळे कितीही मिळालं तरी पुरत नाही. आपल्यापेक्षा कोणीतरी श्रीमंत आहे, सुंदर आहे, हुशार आहे, कर्तृत्ववान आहे म्हणून आपण आपले समाधान घालवू नये. देवाने जे जे दिलंय ते आपल्या हिताचं आहे यावर विश्वास ठेऊन समाधानी राहावे.
९. सुखी राहण्यासाठी लोभ, द्वेष, मत्सर, राग या भावनांवर ताबा मिळवता यायला हवा. हे आपोआप होणार नाही, तसे प्रयत्न केले पाहिजेत. हे प्रयत्न म्हणजेच मन शांत, स्थिर, आनंदी ठेवण्याचे उपाय. मन नुसतच रिकामं राहू शकत नाही. मग त्यात या वाईट गोष्टी नको असतील तर ते सतत चांगल्या गोष्टींनी भरत राहिलं पाहिजे, मग वाईटासाठी जागाच उरणार नाही. म्हणून चांगले वाचन, श्रवण, चांगल्या विषयांवर चर्चा यासाठी वेळ द्यायला हवा.
१०. आपल्या रोजच्या आयुष्यातला बराचसा वेळ आपली नोकरी, व्यवसाय आणि घरकामात जातो. हे प्रत्येकाच्या आवडीचं किंवा सोयीचं असतंच असं नाही पण चरितार्थ चालवण्यासाठी सगळं करावं लागतं. त्यामुळे कधीतरी - किमान आठवड्यातून एकदा तरी - यातून वेळ काढून आपल्या आवडी, छंद, इच्छा याला वेळ द्यावा. बागकाम, चित्रकला, वाचन, एखादा वेगळा खायचा पदार्थ करून बघणे, मैत्रिणीशी गप्पा या गोष्टी मनाला आनंद देतात आणि परत जोमाने काम करायचा उत्साहही देतात.
११. आपल्या कुटुंबियांसोबत दिवसातला थोडा वेळ तरी नक्की घालवावा. रोजचे बोलणे, विचारपूस, चौकशी याने कुटुंबातल्या व्यक्तींचे एकमेकांशी गोड आणि दृढ नाते तयार होते. या गप्पांमुळे कधी आपले मन बोलून हलके होते तर कधी आपल्याला सतावणाऱ्या एखाद्या प्रश्नाचे उत्तरही मिळून जाते.
मन प्रसन्न रहाण्यासाठी खरं तर खूप मोठं असं काही करायची गरज नाही. खूप मोठी ट्रीप केली, महागड्या वस्तूंची खरेदी केली, आलिशान हॉटेल मध्ये जेवण केलं तरी यापासून मिळणारा आनंद क्षणिकच आहे. फार काळ टिकत नाही. खरा आनंद आपल्या आजूबाजूच्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींत आहे. आपल्याला तो डोळसपणे पाहून मिळवता आला पाहिजे.
संध्याकाळी देवापुढे दिवा लावल्यावर समईची ज्योत पाहूनही किती प्रसन्न वाटते! परमेश्वराने आपल्याला दिलेल्या असंख्य चांगल्या गोष्टींबद्दल त्याचे आभार मानून कृतज्ञतेने त्याच्या पुढे माथा टेकवणे हीच खरी मनाची प्रसन्नता!