26/08/2024
*काला आणि आयुर्वेद*
आपले हिंदू संस्कृती नुसार येणारे सणवार आणि त्यावेळी केले जाणारे विशिष्ट पदार्थ ही केवळ रूढी परंपरा नसून त्याचा बदलत्या ऋतूशी ,हवामानाशी आणि आरोग्याशी फार जवळचा संबंध आहे .
श्रावण महिना सुरु झाला की सणवारांची अगदी रेलचेल चालू होते आणि मग येतो श्रीकृष्ण जन्माचा उत्सव म्हणजेच जन्माष्टमी !! व त्याबरोबर येते ती बालगोपालांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची पर्वणी म्हणजे दहीहंडी !!(शतावरी आयुर्वेद क्लिनिक,औरंगाबाद)
थर लावून दहीहंडी फोडायची आणि प्रसाद खायचा हा त्या मागचा महत्वाचा हेतू ! गोपाळकाल्याची त्यादिवशी चवही अप्रतिम असते.
गोपाळकाल्यातील महत्वाचा घटक म्हणजे लाह्या हा आहे .पावसाळा सुरु झाला की नवीन येणारे पाणी पचायला जड असते आणि हवामानामुळे आपली पचनशक्ती मात्र क्षीण होते म्हणूनच श्रावण महिन्यात उपवासाचे वेगळे महत्व आहे .अश्यावेळी जे पदार्थ खायचे ते पचायला हलके हवेत म्हणून ह्या लाह्यांचे प्रयोजन .
त्यात थोडी चव हवी ,वैविध्य हवे म्हणून साळीच्या लाह्या,ज्वारीच्
या लाह्या,चुरमुरे असं सगळं एकत्र करतात.(शतावरी आयुर्वेद क्लिनिक,औरंगाबाद)
गोकुळची आठवण काढून दही,दूध ,लोणी त्यात मिसळवतात.
दही खाण्याचा विशेष हेतू म्हणजे या दिवसांमध्ये आयुर्वेदानुसार अम्ल रसाचा जास्त वापर करायला हवा म्हणून दही खायला परवानगी !
म्हणूनच काही जण काल्यात लिंबाचे लोणचेही टाकतात.नुसत दही टाकलं तर सगळ्या लाह्या दह्यातील पाणी शोषून घेतात आणि काला कोरडा होतो म्हणून थोडे दूध घालातात.
पचनशक्ती वाढावी म्हणून त्यात आले किसून घालायचे,चवीला मीठ ,साखर मिसळायचे आणि मग आवडत असेल तर वरून चांगल्या तुपात जिरे,हिंग,आणि हिरवी मिरची अशी छान झणझणीत फोडणी द्यायची .वरून ताजी हिरवीगार कोथिंबीर भुरभूरायची की झाला मस्त ,चविष्ट गोपाळकाला तयार .
"पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे ज्या वेळी हवेत अधिक गारवा असेल त्यावेळी वातजन्य विकारांच्या शमनासाठी प्रामुख्याने अम्ल (आंबट) आणि लवण (खारट ) रस असणारे तुपात किंवा तेलात तयार केलेले स्निग्ध भोजन करावे" असे आयुर्वेद सांगते.
गोपाळकाला खायला हवा म्हणजे त्याची जिभेला छान चव तर येईलच आणि शिवाय पावसाळ्यात शास्त्रीय आहार खाता येईल ते वेगळंच !!पूर्ण पावसाळा संपेपर्यंत अधूनमधून असा गोपाळकाला करून खायला काहीच हरकत नाही.
*वैद्य. अमित वैष्णव*
*मो-9561333566*