19/07/2025
*किरकोळ जखम ते व्हेंटिलेटर* ...
शनिवारच्या मध्यरात्री ला 15 वर्षांचा मुलगा आमच्या हॉस्पिटलच्या Casualty मध्ये आला.
मी नेहमी प्रमाणे रुग्णाची History आणि क्लिनिकल तपासणी केली....
3-4 दिवसांची short history
*प्रमुख लक्षणे:* चालण्यात अडचण, नंतर चालता येत नाही, तोंड उघडण्यात अडचण आल्याने खाण्यास त्रास होणे, ताप, शरीरदुखी .....
तपासणी मध्ये....
मानेचा कडकपणा,
हात आणि पायामध्ये कडकपणा, ट्रीसमस ( तोंड उघडण्यात अडचण येणे),
अधूनमधून येणारे झटके,
परंतु तळपायावर किरकोळ जखम होती....मनात शंका आली..
जखमे बदल विचारले असता रुग्णाने स्वतः 15 दिवसांपूर्वी *खिळा लागल्या मुळे जखम* झाल्याचे सांगितले.....
मी जखमे नंतर टी.टी. ची लस घेतले होते का हे विचारले.
*नाही* असे उत्तर ऐकताच.....
Meningitis( मेंदुज्वर ),
Neuroleptic malignant syndrome,
Drug induced extrapyramidal symptoms ,
GBS etc
संभाव्य निदानाच्या यादीवर भिरभिरणारे माझे मन *Tetanus (धनुर्वात)* च्या निदानावर स्थिर झाले होते..
दुसऱ्या दिवशी..रविवार..
रुग्णाच्या आयुष्यात वादळ आले.
पेशंट ची तब्यत खालावली....
त्याला झटके खूप वारंवार येत होते, संपूर्ण शरीरात कडकपणा वाढला, *lock jaw* ( तोंड पूर्णपणे बंद) ,श्वास घेण्यात अडचण, ऑक्सिजन पातळी कमी झाली.
मी रुग्णच्या नातेवाईकांना विश्वासात घेत आजाराचे आणि परिस्थीतीचे गांभीर्य समजावून सांगितले आणि त्याला व्हेंटिलेटरची गरज असल्याचे सांगितले.
घाबरलेल्या नातेवाईकांनी-
" सर, तुम्हाला जे योग्य वाटते ते करा....
पण माझ्या लेकराला वाचवा!" म्हणत आई ने टाहो फोडला.....
Trismus ( Lock jaw) असल्यामुळे पेशंटची *Tracheostomy* ( व्हेंटिलेटरची ट्यूब स्वर यंत्रामध्ये टाकण्याचे ऑपरेशन ) करावे लागले आणि त्याला व्हेंटिलेटर वर घ्यावे लागले.
झटके कमी करण्यासाठी त्याला झोपेचे इंजेक्शन आणि स्नायू शिथिल करणारे औषधे द्यावे लागले.
धनुर्वात तसा जुना पण दुर्मिळ होत चाललेला आजार.....
राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमामुळे या आजाराचा प्रादुर्भाव फार कमी झाला आहे.
त्यामुळे आजाराच्या उपचारासाठी लागणारा *टिटॅनस इम्युनोग्लोबुलिन (TIG)* ची खूप कमी उपलब्धतता आणि त्यात रविवार असल्यामुळे बहुतेक औषध वितरक दुकान बंद होते.
पन एका डिस्ट्रिब्युटर्स ने ते इंजेक्शन उपलब्ध करुन दिले आणि पेशंटला ते तत्काळ दिले.
या आजाराचे निदान रक्त तपासणी किंवा रेडिओलॉजिकल चाचणीद्वारे करता येत नाही. *ONLY CLINICAL DIAGNOSIS.*
नातेवाईकांच्या मनाची घालमेल आम्हाला कळत होती....
धनुर्वात सोडुन दुसरा कोणता तर आजार नाही?
या साठी केलेले सर्व टेस्ट सीटी स्कॅन, एमआरआय, , मेंदूतील पाणी ( CSF), रक्त तपासणी सर्व *NORMAL* होत्या.
सर्व चाचण्या normal, पण आजार काही कमी होत नव्हता, त्याला झटके चालूच होते आणि व्हेंटिलेटर चे प्रमाण कमी करता येत नव्हते.
सर,अजुन काही औषधे, इंजेक्शन देता येतिल का ?
अजुन काही टेस्ट करता येतील का ?
त्याचे विषारी रक्त आपण बदलू शकतो का?
नातेवाईकाच्या अश्या एक ना अनेक प्रश्नांना आमच्या टीम चे एकच उत्तर होते ते म्हणजे *वेळ आणि संयम* ....
आजाराचा जोर कमी होण्यास 3- 4 आठवडे लागणार होते आणि तोपर्यंत आम्हाला आणि नातेवाईकांना धैर्य ठेवणे होते.
*व्हेंटिलेटर* वर चा रुग्ण म्हणजे तारे वरची कसरत....
नाकात नळी, तोंडात नळी,लघवीची नळी, बेशुद्ध अवस्था. व्हेंटिलेटर जसे जीव वाचवण्याचे उपकरण तसेच त्यासोबत काही दुष्परिणामही असतात जसे की न्यूमोनिया, पायाच्या धमण्यात गाठ , युरिन इन्फेक्शन असे अनेक गुंतागुंत होण्याची संभावना असते.
पण या सर्व बिकट परिस्थीती मध्ये नातेवाईकां नी आमच्या टीम वर विश्वास ठेवला.
या सर्व संकटावर मात करत 25 दिवसांनंतर हा रुग्ण व्हेंटिलेटरवरुन बाहेर निघाला.
ह्या रुग्णाच्या Recovery मध्ये
ICU मधिल कनिष्ठ डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, हाऊस किपिंग स्टाफ, फिजिओथेरपिस्ट यांचे योगदान खूप मोठे होते.
एका महिन्याच्या प्रदीर्घ लढाईनंतर रुग्णाला यशस्वीरित्या डिस्चार्ज देण्यात आला.
*Tetanus** :
हा आजार *Clostridium tetani* या बॅक्टेरियाच्या इन्फेक्शननी होतो...
या जंतूंचे *Tetanospamin* हे विष *Brain* आणि *spinal chord* या वर परिणाम करते, या मुळे पूर्ण शरीर कडक होऊन रोगी धनुष्यासारखा होतो म्हणूनच या आजाराला मराठीत *धनुर्वात* म्हणतात.
योग्य वेळेत उपचार न भेटल्यास *मृत्युदर ९०%.* संसर्ग झाल्या नंतर विषाचा प्रादुर्भाव *3 ते 4* *आठवडे* राहतो.
*धनुर्वात* हा *T.T. ( Tetanus* *Toxoid* )* लसीने टाळता येणारा आजार आहे.
राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात ते बालकांना ६ आठवडे, १० आठवडे आणि १४ आठवड्यांच्या वयात *DPT* डोस म्हणून दिले जाते. वयाच्या दीड , ५ वर्षे आणि १० वर्षांना *बूस्टर* डोस दिला जातो आणि नंतर दर १० वर्षांनी पुनरावृत्ती केली जातो.
कधी जखम झाल्यावर प्रथमोपचार आणि लसीकरण स्थिती माहित नसल्यास टीटी इंजेक्शन घेणे खूप गरजेचे आहे.
एक छोटेसे इंजेक्शन आपल्याला खुप मोठया जीवघेण्या आजरापासुन वाचवू शकते.
Dr Prafull Prabhakarrao Pande
(M.B.B.S., M.D. Medicine)
Director Pentagon super speciality Hospital , Beed bypass
Chh. Sambhajinagar