
19/10/2024
केसांच्या आरोग्यासाठी काय करू? भाग – ३
मागील २ लेखांमधून केसांच्या आरोग्यासाठी घातक आहार आणि सवयी यांची माहिती घेतल्यानंतर आता उपाय काय आहेत ते समजून घेऊया.
१. सूर्यनमस्कार आणि चालण्याच्या व्यायामाला दिनचर्येत आवर्जून स्थान द्यावे.
२. प्राणायामाच्या प्रकारात किमान दीर्घश्वसन आणि भ्रामरी यांचा उपयोग करावा.
३. ध्यान शिकून घ्यावे आणि किमान दिवसभरात एकदा करावे, अगदीच वेळ मिळाला नाही तरी किमान रात्री झोपताना पाठीवर झोपलेल्या अवस्थेत तरी का होईना ध्यान करत निद्राधीन होण्याचा सराव करायला हरकत नाही.
४. दिनचर्येत सकाळी उठल्यानंतर दिवसभरात किमान एका आहारात संपूर्ण आहार चौरस ठेवण्याचा प्रयत्न करावा.
५. भूक नाही मात्र पुढे खायला मिळणार नाही तर खाऊन घेऊ अथवा भूक लागली आहे मात्र खाण्यासाठी वेळ नाही अश्या अवस्था जवळपास सर्वच वयोगटात दिसतात, कुठे शाळा-कॉलेज-क्लासेस तर कुठे ऑफिसेस चे ब्रेक अनेकदा सोयीचे नसतात, अश्यावेळी खाण्यासाठी ज्वारीच्या लाह्या, खजूर अथवा मनुका असे पदार्थ जवळ एका छोट्या डब्यात बाळगाव्यात, भुकेची वेळ टळून जाऊ देऊ नये यासाठी प्रयत्नशील राहावे.
६. आहारात अल्प प्रमाणात का होईना सुक्या मेव्याचा नियमित वापर ठेवावा, यासाठी कोणताही आजार नसेल तर बदाम, मनुका, खजूर, जर्दाळू, भोपळ्याच्या बिया इ. चा उपयोग करता येईल, मात्र आजारी व्यक्तींनी वैद्यांच्या सल्ल्याने त्यांच्या आहारात कोणता सुकामेवा चालेल हे विचारून मगच खाण्यात समावेश केलेला उत्तम !
७. ओल्या नारळाचा आठवड्यातून किमान दोन वेळा आहारात चटणी, गूळ-खोबरं (मधुमेह नसणाऱ्यांना लागू) इ. माध्यमातून वापर करावा.
८. तीळ, काराळ यांचा वापर आहारात अल्प स्वरुपात ठेवावा.
९. आहारात आमटी, ररस्सा भाजी, वरण अश्या पदार्थांचा उपयोग करावा आणि कोरडे अन्न खाऊ नये.
१०. केसांच्या आरोग्यासाठी उत्तम अस्थीधातू असणे आवश्यक आहे, त्यामुळे आहारात गाईचे दुध, गाईचे तूप यांचा समावेश ठेवावा.
११. आहारात ऋतुनुसार आवश्यक ते बदल करणे.
१२. मलावष्टंभ, आम्लपित्त अश्या त्रासांवर आवश्यक ती चिकित्सा घेणे.
१३. सौम्य विरेचनासाठी पोटातून आठवड्यातून किमान एकदा एरंड तेलाचा उपयोग कसा करायचा हे जवळच्या वैद्यांना विचारून घ्यावे, कारण या स्वरूपाच्या चिकित्सा स्वरूप उपायाचा विचार करताना व्यक्तिपरत्वे मात्रा आणि वारंवारता ही ठरविणे आवश्यक असते.
१४. केसांना केस धुण्याआधी तेल लावण्याची पद्धत आहे, करायला हरकत नाही मात्र केस धुतल्यावर नियमित स्वरुपात केसांच्या मुळाशी आणि टोकाकडील केसांच्या लांबीच्या अनुसार तेलाचा वापर आवर्जून करावा.
१५. केसांच्या मुळाशी जे तेल नियमित लावायचे आहे ते तेल केश्य द्रव्यांनी युक्त वापरले तर केसांच्या असलेल्या तक्रारी दूर होतात आणि भविष्यात तक्रारींचे प्रमाण सुद्धा कमी राहते.
१६. केसांसाठी वापरली जाणारी प्रसाधने नैसर्गिक घटकांनी तयार केलेली आहेत आणि खात्रीशीररित्या त्याच घटकांनी तयार केलेली आहेत याची पडताळणी करूनच वापरावी.
१७. केस धुण्यासाठी नेहमीच कोमट म्हणजे अगदीच कमी कोमट पाणी वापरावे.
१८. केसांना धुण्यासाठी शाम्पूऐवजी शिकेकाई चा उपयोग करावा, अनेक वैद्य नित्य वापरासाठी उपयुक्त शिकेकाई मिक्स, उटणे, शाम्पू, केश्य तेल, केश्य लेप, कोंड्यासाठी लेप, तेल इ. तयार करत असतात, केवळ हर्बल आणि आयुर्वेद या नावाने जाहिरात करून शून्य आयुर्वेदीय औषधांचा उपयोग करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादनांपेक्षा वैद्यांकडून असे उत्पादने खरेदी करून वापरता येतील.
१९. केसांना लावण्यासाठी वापरावयाचे तेल कोमट (थेट अग्नीचा संपर्क न येऊ देता कोमट केलेले) उपयोगात आणावे.
२०. केस सुकाविताना शक्यतो केस मोकळे ठेऊन नैसर्गिकरीत्या सुकू द्यावे.
२१. थेट उन्हात दीर्घकाळासाठी काम करणारे अथवा दोन चाकी वाहन चालविताना दीर्घकाळ प्रदूषण आणि उन्हाच्या संपर्कात नियमित यावे लागत असेल तर अश्या लोकांनी डोके कापडाने झाकून घेण्याची सवय ठेवावी,
२२. केसांना रंगविण्यासाठी शक्यतो नैसर्गिक पर्यायांचा उपयोग करावा.
कोंडा, केस गळणे या समस्यांवर घरघुती उपायांच्या खंडीभर पोस्ट आपल्याला मिळतील, मात्र उपाय जर आयुर्वेदीय करायचे असतील तर मात्र रुग्ण इतिहास समजून घेऊन रीतसर परीक्षण केल्याशिवाय उपाय करता येत नाहीत. कारण आयुर्वेदीय चिकित्सा ही लक्षणांवर आधारित चिकित्सा नसून व्याधीच्या कारणांचा, व्याधीची अवस्था, व्याधीच्या निर्मितीत कारणीभूत असलेल्या दोषांचा सर्वार्थाने विचार करून करावयाची चिकित्सा आहे, केवळ भारतीय औषधी आहेत आणि आपल्याला नावे माहित आहेत म्हणून त्यांचा सहज वापर करून घरच्या घरी चिकित्सा करणे याला चिकित्सा म्हणत नाहीत, याचा विचार होणे फार आवश्यक आहे.
आयुर्वेदीय चिकित्सकाला वगळून केलेली चिकित्सा लक्षणे कमी करायला मदत करेल कदाचित, औषधांचा काही न काही प्रभाव दिसणारच! मात्र औषधी थांबवली की लक्षणे पुन्हा अवतरणे ही स्थिती अश्या चिकित्सेत निश्चित दिसून येते, त्यामुळे वैद्यांना भेटायला टाळाटाळ करू नये, केसांचे आरोग्य महत्वाचे असेल तर हा शॉर्टकट कामाचा नाही. केसांचे आरोग्य आणि एकूणच आरोग्य उत्तम राखायचे असल्यास जो गुण आवश्यक आहे तो म्हणजे सातत्याने चांगल्या सवयींचा सराव, याचा आपल्याला आयुष्याच्या सर्वच क्षेत्रांमध्ये उपयोग होतो, तेव्हा हा गुण अंगी बनविण्यासाठी प्रयत्नशील रहा असा शेवटचा आणि महत्वाचा सल्ला आहे.
शुभं भवतु!
वैद्य ज्योती प्रल्हाद कस्तुरे
आयुर्वेद वाचस्पती
छत्रपती संभाजीनगर
#ऐकावे_आयुर्वेदाचे
#केशविकार_आणि_आयुर्वेद
#खालित्य_पालित्य
#केशरंजनकल्प