22/02/2026
*सुखावणारे क्षण - 2*
मॅडम... मी+++++ खरे तर डिलिव्हरी होऊन 3 आठवडे झाले.. तुमची रोजच आठवण येत होती..पण फोन करणे जमले नाही..
"बाळ ठीक आहे ना?..वजन किती आहे?"..माझा प्रश्न.... तिचा मोठा pause ... खोल सुस्कारा सोडत ती बोलत होती.. एव्हाना मला काहीतरी अघटीत झाले होते असा अंदाज आला होता..मी जरा सावध होऊन ऐकू लागले..
"मॅडम.... प्रसव वेदना सुरू झाल्या होत्या, वेदनेने विव्हळत असताना तुम्हाला कॉल केला..तुमची सूचना कानात घुमत होती.. "डरना मना है, कळा सुरू झाल्या की,शांतपणे पोटावर हात ठेवायचा, किती वेळाने कळ येते? किती वेळ थांबते? कधी डॉक्टर कडे जायचे? कुठली कंडीशन सिरियस आहे?".. हे खूप वेळा तुम्ही क्लास मध्ये सांगितले होते.. त्यामुळे सगळ्या गोष्टी माहित होत्या.. ज्यावेळी त्रास वाढला तुम्हाला कॉल केला.. तुम्ही म्हणाला..
" आता जा..तुझ्या आवाजावरून वाटतेय, की तुझी वेळ जवळ आली आहे..सगळ्या सूचना लक्षात ठेव..काही वाटले तर फोन कर"
हॉस्पिटल ला जाताना..देवाशप्पथ सांगते.. तुमचा आवाज कानात घुमत होता.. कळा आधीच सुरू झाल्या होत्या.. थोडी ओरडले..पण तेही साहजिकच होते, वेदनेची अतिउच्च पातळी गाठली आणि एका गोंडस तीन किलो च्या बाळाला जन्म दिला, जीवनाचे सार्थक झाले..सगळे खूप कौतुक करत होते..आजच्या जमान्यात नॉर्मल डिलिव्हरी!! ..पण तुमचे शब्द आठवत होते.."Normal Delivery is a skillful job, श्र्वासाचा खेळ आहे सगळा.. कुठे श्वास रोखायचा,सोडायचा आणि दीर्घ घ्यायचा हे जमले की हा कठीण प्रवास सुखाचा होतो.."
माझेच बाळ पाहून धन्यधन्य वाटत होते..पहिला दिवस गेला..आणि अचानक लक्षात आले की बाळाचे पोट फुगत आहे.. डॉक्टरांनी असे होतेच..असे म्हटले..पण.. तिसऱ्या दिवशी पोटाचा आकार वाढला..काहीतरी वेगळे आहे असे डॉक्टर बोलले..आणि त्या कोवळ्या जीवाची तिसऱ्या दिवशी सोनोग्राफी केली..आणि डॉक्टर बोलले INTESTINONAL PERFORATION ( आतड्याला छोटे 3 MM चे छिद्र आहे).. आपल्याला ऑपरेशन करावे लागणार...नियतीने पदरात सुख देऊन हा अन्याय का केला,हा प्रश्न मनात येत होता वारंवार..
सगळेच चिंताग्रस्त..पण मी आई, ओली बाळंतीण.. पण पर्याय नव्हता.. डॉक्टरांची कमाल, त्या तीन दिवसाच्या जीवाला व्हेंटिलेटर..आणि सक्सेसफुल ऑपरेशन केले..डॉक्टर म्हणजे देव,हे त्यादिवशी पुन्हा नव्याने जाणवले..नतमस्तक झाले,कोणाकोणाचे आभार मानू असे झाले.. ?
आज पंधरा दिवस झाले..आता बाळ दूध घेत आहे व्यवस्थित.. पोट फुगत नाही.. मी शांत.. लांब सुस्कारा घेऊन म्हणाले.. हिम्मतवाली पोरगी आहेस..
मी फोन केला ह्यासाठी की बाळाला व्हेंटिलेटर वर ठेवले..पण मी त्याच्या पाळण्या जवळ जाऊन फक्त " करो रक्षा विपतीसे, ऐसी मेरी प्रार्थना नही.. विपतसे भय नही पाऊ.. ये मेरी प्रार्थना है".. एवढेच म्हणत होते...फार शक्ती मिळते मॅडम प्रार्थनेनी.. कधी कधी प्रश्न विचारला स्वतःला..तू असे का केलेस?.. माझ्या बाळाला इतक्या लहानपणी ह्या वेदना..मला हवी ती शिक्षा चालली असती पण... पुन्हा तुमचे वाक्य आठवले.. "हुशार विद्यार्थ्यांना नेहमी अवघड पेपर येत असतो..हरायचे नाही लढायचे"...
" लढले हो मॅडम...आपली प्रार्थना, ओंकार, दीर्घ श्वसन..सगळे सगळे ह्यावेळी उपयोगाला आले.. हतबल असतो ना आपण अश्यावेळी..लांब श्वास फार उभारी देतो..हे केवळ क्लास मधील सातत्याने शक्य झाले.. आभार म्हणून नाही संपणार हे नाते.. बाळाला घेऊन येईन नक्की..
खरेतर बोलणे फोन वर चालू होते..पण अश्रूंची गर्दी.. व्यवसाय म्हणून जरी आपण प्रकल्प राबवत असलो तरी..प्रामाणिकपणा, योग्य वेळी मदतीचा हात, पारदर्शकता हा पण कर्मयोग आहे,हे खूप वेळा जाणवत राहते..आणि सुखाची एक लहर शरीर मनात तरंगून जाते.. ह्या पेक्षा सुख वेगळे काय असते!!
डॉ चारुलता रोजेकर - देशमुख
18/02/2026