12/04/2012
बारामती एमआयडीसीत पाणीप्रश्न गंभीर
(12-04-2012 : 01:00:24)
बारामती। दि. ११ (प्रतिनिधी)
दुष्काळामुळे बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पाणी टंचाईने गंभीर स्वरुप धारण केले आहे. तर दुसरीकडे शासकीय उदासीनतेमुळे बारामती एमआयडीसीतील उद्योग आणि रहिवाशांना प्रदूषित पाणी आणि पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. खासगी टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ या परिसरावर आली आहे.
या प्रश्नाबाबत येथील बारामती चेंबर ऑफ कॉर्मस इंडस्ट्रीजच्या पदाधिकार्यांनी योजनेची पाहणी केली. यावेळी जलवाहिनीतून ३५ टक्के पाण्याची गळती होत असल्याची माहिती पुढे आली आहे. ही गळती त्वरित न थांबविली गेल्यास आंदोलन करण्याचा इशारा चेंबर व नागरिकांनी दिला आहे.
बारामती एमआयडीसीला पाणीपुरवठा करणार्या जलवाहिनीमध्ये गळतीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. उजनी जलाशयातील ज्ॉकवेलमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड झाल्याने दोन तीन महिने औद्योगिक क्षेत्रास अतिशय अपुरा, अनियमित पाणीपुरवठा होत आहे.
यामुळे उद्योगांच्या उत्पादनावर विपरित परिणाम होत आहे. खासगी टँकरद्वारे अवास्तव किमतीने नाईलाजस्तव पाणी विकत घ्यावे लागत आहे. बारामती चेंबर ऑफ कॉर्मस अँण्ड इन्डस्ट्रीजने एमआयडीसीच्या अशा गलथान कारभाराबाबत आवाज उठवला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून दिली आहे.
वारंवार होणार्या तांत्रिक बिघाडाबाबत वस्तूस्थिती जाणून देण्यासाठी बुधवारी (दि. ११) बारामती चेंबरचे अध्यक्ष धनंजय जामदार, उपाध्यक्ष भारत जाधव, महादेव गायकवाड, आशिष पल्लोड, सूर्यवंशी, अनंत अवचट, अभिजित शिंदे यांच्यासह कार्यकारी अभियंता मोहन पुरानिक, उपअभियंता नलगुलवार, शाखा अधिकारी सुनील गायकवाड, डायनामिक्स डेअरीचे नेगी व राव आदींनी एमआयडीसीचे कुंभारगाव येथील ज्ॉकवेल व पंपहाऊस व संपूर्ण जलवाहिनीची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीमध्ये पाणी गळतीचे प्रमाण ३५ टक्के जास्त असल्याचे धक्कादायक वस्तूस्थिती समोर आली आहे. केवळ ढिसाळ कारभारामुळे धरणामध्ये पुरेसा साठा असून देखील एमआयडीसी उद्योगांना पुरेसे पाणी पुरवू शकत नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
या प्रकाराबाबत अध्यक्ष धनंजय जामदार व इतर पदाधिकार्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाणी पुरवठा सारख्या अत्यावश्यक सेवेमधील हलगर्जीपणा खपवून घेणार नसल्याचा इशारा दिलेला आहे. दरम्यान, पाण्याचा दर्जा देखील खालावत चाललेला आहे. हिरवट पिवळ्या रंगाचे पाणी येत असल्याबाबत उद्योगांनी व निवासी क्षेत्रातील नागरिकांनी चेंबरकडे तक्रार केलेली आहे.
काही समाजकंटक एमआयडीसीची जलवाहिनी नेहमी फोडतात. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होतो, असे सांगण्याचा अधिकार्यांनी प्रयत्न केला. परंतु, शासकीय मालमत्ता सुरक्षित ठेवणे अधिकार्यांचे कर्तव्य आहे.
चुकीची कारणे सांगून सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करू नका, असे जामदार यांनी त्यांना सुनावले. सुरळीत, स्वच्छ पाणी पुरवठा एमआयडीसीने न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. आजच्या पाहणी दौर्याचा अहवाल उपमुख्यमंत्री पवार आणि उद्योग राज्यमंत्री सचिन आहेर यांना सादर करणार असल्याचे जामदार यांनी सांगितले.