23/06/2024
गर्भिणी परिचर्या भाग 3
गर्भिणीचा आहार
दिवस राहिल्याबरोबर बऱ्याचदा गर्भिणीला खायची इच्छा नसणे, मळमळणे ,भूक न लागणे असे वाटते. त्यामुळे तिला सवय असलेला सात्विक आहार पचेल इतपत द्यावा .हा आहार मधुर रसाचा असावा .मधुर रस म्हणजे फार गोड नाही .पोळी ,भाकरी ,भात हे मधुर रसात्मक आहेत .हा आहार द्रवरूप किंवा पातळ असावा .दूधही मधुर रसात्मक आहे .खीर ,लापशी, पेज यांचा समावेश करावा. फारसे कोरडे अन्न खाऊ नये .आहारात गाईच्या तुपाचा समावेश अवश्य करावा .भाजीचे सूप, मुगडाळ, उसळीचे सूप यांचे सेवन करावे. ह्या आहाराला तिला आवडतील असे मसाल्याच्या पदार्थांची व गायीच्या तुपाची फोडणी द्यावी. पोळी ,भाकरी खावी पण भात अधिक खावा .दुधी, कोहळा यासारख्या फळभाज्या अधिक खाव्यात .काकडी ,रताळी यांचा वापर करावा. पहिल्या तीन महिन्यात अंग जड वाटणे, दमल्यासारखे वाटणे ,झोप जास्त येणे ही लक्षणे वरील आहाराने कमी होतात. दिवस राहण्याआधी शतावरी सिद्ध दूध सुरूच ठेवावे. डाळिंब अवलेह, कुष्मांड रसायन, फलघृत द्राक्षाची लेह ही औषधे वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावीत. तिसऱ्या महिन्यात साठे साडीचा भात दुधाबरोबर घ्यावा. तसेच तूप व मध घातलेले दूधही घ्यावे. चौथ्या महिन्यापासून बाळ झपाट्याने वाढते .सर्व अवयव तयार होतात .वजन वाढते .त्यामुळे आता घन आहार अधिक घ्यावा. साठे साळीचा भात दह्याबरोबर घेण्यात सांगितला आहे .चौथ्या महिन्यात तर दुधापासून काढलेले लोणी सेवन करण्यास सांगितले आहे. दाळ, उसळी, कंदमुळे ,भाज्या यांचा आहारात समावेश करावा .गर्भिणीचा आहार सहा रसांचा म्हणजे सहा चवींचा असावा .पण त्यात मधुर रस थोडा जास्त असावा .कुठल्याही एकाच चवीचे पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करू नयेत. गोड जास्त प्रमाणात सेवन केल्यास बाळ लठ्ठ होते व त्याला नंतर मधुमेह होण्याची शक्यता वाढते.
आंबट चवीचे पदार्थ जास्त खाल्ल्याने त्वचा विकार, डोळ्यांचे आजार होऊ शकतात.
बाळाला मीठ जास्त घेतल्यास बाळाला त्वचेवर सुरकुत्या व त्याचे केस पांढरे होणे लवकर होते.
तिखट खूप खाल्ल्याने बाळ दुर्बल होते व त्याला पुढे नपुंसकत्व येऊ शकते .
कडू जास्त सेवन केल्यास बाळ कृश व शुष्क होते.
तुरट जास्त खाल्ल्यास बाळाला पोटफुगी व ढेकरांचा त्रास होतो. अधिक माहिती पुढील भागात.........