27/12/2024
*वातावरणातील बदल आणि आरोग्य*
वातावरणात झालेल्या या बदलांमुळे साथीचे आजार वाढण्याची शक्यता जास्त असते. ताप, सर्दी, खोकला असे अनेक साथीचे आजार बळावतात. अंगदुखी, उत्साह नसल्यासारखे वाटणे, डोके दुखणे असे अनेक आजार उद्भवतात. अचानक वाढलेला उष्मा आणि थंडी आरोग्याला बाधक ठरत आहे. या आजारांवर वेळीच उपाय केले नाहीत, तर ते बळवण्याची शक्यता असते.
वातावरणात झालेल्या या बदलांमुळे साथीचे आजार वाढण्याची शक्यता जास्त असते. ताप, सर्दी, खोकला असे अनेक साथीचे आजार बळावतात. अंगदुखी, उत्साह नसल्यासारखे वाटणे, डोके दुखणे असे अनेक आजार उद्भवतात. अचानक वाढलेला उष्मा आणि थंडी आरोग्याला बाधक ठरत आहे. या आजारांवर वेळीच उपाय केले नाहीत, तर ते बळवण्याची शक्यता असते.
हिवाळ्यात हवा कोरडी असल्यामुळे हवेत धूळ अधिक प्रमाणात असते. या धुळीमुळे श्वसनाचे वेगवेगळे आजार निर्माण होतात. यात मुख्यत: दम्याच्या रुग्णांची संख्या अधिक असते. त्यामुळे उष्ण वातावरणातून थंड वातावरणात संक्रमण होणाच्या काळात दम्याच्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
थंड हवेशी संपर्क आल्यामुळे, अतिशय थंड पाणी प्यायल्यामुळे किंवा सकाळी बागेत फिरल्याने, थंड पाण्याने आंघोळ केल्यानेही दम्याचा झटका येऊ शकतो. दम्याच्या रुग्णांनी हिवाळ्यात सर्दीसारखे आजार होऊ नयेत, यासाठीही काळजी घ्यायली हवी.
मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार असणाऱ्या रुग्णांनीही थंड हवेत फिरणे किंवा थंड पदार्थ खाणे टाळलेले बरे. या काळात वयोवृद्धांना होणारे पाठ, पाय दुखण्याचे त्रास वाढतात. बदलत्या वातावरणाचा परिणाम वयोवृद्ध मंडळी आणि लहान मुलांमध्ये अधिक दिसतो. त्यामुळे याबाबत दक्षता बाळगणे आवश्यक आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबर हा सण-उत्सवांचा काळ असल्यामुळे फटाक्यांमुळेही मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होते. या प्रदूषणामुळेही श्वसनाच्या समस्या उद्भवतात. दमा, क्षयरोग किंवा मूत्रपिंडाच्या रुग्णांचाही आजार बळावू शकतो.
*काय काळजी घ्यावी?*
- हिवाळ्यात थंड पदार्थ खाणे किंवा थंड हवेत फिरायला जाण्यामुळे सर्दी-खोकल्यासारखे आजार बळावतात. यासाठी गरम पाणी पिणे किंवा गरम पाण्याची वाफ घेणे हितावह आहे.
- हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करू नये. त्याऐवजी कोमट किंवा गरम पाण्याचा वापर करावा.
- खोकताना किंवा शिंकताना तोंड व नाकावर रुमाल धरावा. नाकातील स्रावातून निघणारे विषाणू हवेत पसरतात आणि त्यामुळे आजाराचा संसर्ग वाढतो. सर्दी किंवा खोकला झालेल्या रुग्णाचा हातरुमाल कुटुंबातील इतर व्यक्तींनी वापरू नये.
- डासांपासून बचाव करण्यासाठी खिडक्यांना जाळ्या लावणे.
- सर्दी, खोकला या आजारांचा संसर्ग होऊ नये, यासाठी वारंवार हात धुणे गरजेचे.
- दम्याच्या रुग्णांनी कमी तापमानात जाणे टाळावे. घराबाहेर पडल्यावर नाकावर रुमाल किंवा स्कार्फ बांधावा.
- संधिवाताचा त्रास असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. पथ्य पाळावे. नियमितपणे सांध्यांना तेल लावून मसाज केल्याने फायदा होईल.
- मधुमेहींनी या दिवसांत पायाच्या भेगा; तसेच इतर संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी.
*आरोग्यदायी हिवाळ्यासाठी...*
हिवाळ्यात ताजे आणि पोषक अन्नाचे सेवन करणे हितावह आहे. रोजच्या आहारात सुका मेवा, फळांचा समावेश असावा. थंडीच्या दिवसांतही भरपूर पाणी प्यावे. अधुनमधून कोमट पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. पुरेशी झोप घेतल्याने दिवसभर उत्साही राहता येणे शक्य होते; तसेच बेडशीट्स, उशीचे कव्हर दिवसाआड बदलल्यास अॅलर्जीपासून दूर राहता येते. थंडीतही दररोज अंघोळ करणे आवश्यक आहे. यासाठी सौम्य़ साबणाचा वापर करावा. खूप गरम पाण्याने अंघोळ करू नका. यामुळे त्वचा कोरडी पडू शकते. स्वच्छ धुतलेल्या अंतर्वस्त्रांचा वापर करावा. त्यामुळे युरिनरी टॅक्ट इन्फेक्शन; तसेच त्वचाविकार टाळता येतील. लहान मुलांनी आणि प्रौढांनीही उबदार कपड्यांचा वापर करावा. चेहरा स्कार्फने झाकावा. त्यामुळे संसर्गजन्य आजार टाळता येतील.
*हिवाळ्यातील श्वसनविकार*
हिवाळ्यात श्वसनविकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. वातावरणातील बदलांमुळे श्वसनसंस्थेचे विकार बळावतात. अॅलर्जी, सर्दी-खोकला, दमा इत्यादी अनेक त्रास या काळामध्ये सुरू होतात किंवा असलेले बळावतात.
हिवाळ्यात श्वसनविकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. वातावरणातील बदलांमुळे श्वसनसंस्थेचे विकार बळावतात. अॅलर्जी, सर्दी-खोकला, दमा इत्यादी अनेक त्रास या काळामध्ये सुरू होतात किंवा असलेले बळावतात. थंड वातावरण, हवेतील कोरडेपणा यामुळे अनेक आजार वाढीस लागतात. सर्वच वयोगटांतील व्यक्तींना याचा त्रास होतो. कफ जास्त प्रमाणात तयार होतो आणि तो बाहेर पडत नाही किंवा चिकट राहतो. त्यासाठी पुढील उपाय करावेत...
*सर्दी आणि खोकला : कमी तापमान आणि हवेमधील प्रदूषण यामुळे श्वसनमार्गाचा दाह होतो. यामुळे नाकातून पाणी, शिंका आणि खोकला सुरू होतो. घसा दुखतो, प्रसंगी तापही येतो. श्वसनमार्गाचे विषाणूही याला कारणीभूत असतात.
*ब्रॉन्कायटिस : हवेतील धुलीकण, वाहनातील उत्सर्जित वायू आणि इतर रसायनेही श्वसनमार्गात गेल्यामुळे श्वसननलिकांना दाह होऊन त्या आकुंचन पावतात आणि त्यामध्ये अधिक प्रमाणात कफ निर्माण होतो. यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊन दम लागतो. यामध्ये विषाणू अथवा इतर जंतूसंसर्ग झाल्यास: हिरवा-पिवळा कफ येऊन ताप येतो. तीव्र स्वरूपात ब्रॉन्कायटिस झाल्यास रुग्ण अत्यवस्थ होऊन त्याच्या शरीरात ऑक्सिजनचा अभाव निर्माण होतो. अशा रुग्णास तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार करावे लागतात. धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती, विविध प्रकारच्या धुराच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती, लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यांना ब्रॉन्कायटिस फार चटकन होतो.
*दमा : हवेचे कमी झालेले तापमान आणि प्रदूषण हे अस्थमाचा आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी घातक ठरते. नियमितपणे औषधाची गरज असणाऱ्या आणि कधीतरी औषधांची गरज लागणाऱ्या स्थिर रुग्णांनाही त्रास होऊ लागतो. त्यांच्या श्वासनलिका आकुंचन पावतात आणि कफाचे प्रमाण वाढते. यामध्ये जंतुसंसर्ग झाल्यास दम्याचे प्रमाण वाढून रुग्णालयात तातडीने दाखल होण्याची गरज पडते.
*न्युमोनिया : प्रदूषण व घटलेले तापमान यामुळे श्वसनमार्गाची प्रतिकार शक्ती कमी होऊन जंतुसंसर्ग झपाट्याने होण्यास मदत होते. फुफ्फुसांना सूज येऊन त्या भागात कफ जमा होतो. यामध्ये रुग्णाला खोकला, ताप येऊ लागतो. फुफ्फुसाचा बराच भाग बाधित झाल्यास श्वास घेण्यास त्रास होऊन दम लागतो आणि रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ होते. रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागते.
याशिवाय थंड हवा आणि हवेच्या खालच्या थरामध्ये स्थिर झालेले प्रदूषण यामुळे डोळ्यांची जळजळ होणे, गुदमरल्यासारखे वाटणे, नाक व घसा जळजळणे, शिंका येणे, खोकला, घसा खवखवणे या गोष्टी सर्वांना त्रस्त करतात. त्वचा कोरडी पडून पुरळही येते. हे आजार संपूर्णपणे टाळणे अशक्य आहे. परंतु काही खबरदारी घेऊन ते काही प्रमाणात टाळू शकतो अथवा त्यांची तीव्रता कमी करू शकतो. यासाठी गर्दीची ठिकाणे टाळावीत.
*हे लक्षात ठेवा*
- शीतपेये, आइसक्रीम आदी थंड पदार्थांचे सेवन टाळावे.
- वयोवृद्ध व्यक्ती, गर्भवती तसेच लीव्हर, किडनी यांचे कायमस्वरूपी आजार असणाऱ्यांनी हे आजार टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
- या काळात शरीरातील जास्त ऊर्जा खर्च होत असल्याने भूक लागते. रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारा आहार सेवन करावा.
*डॉ अजय वि अवचार*
*गुरुकृपा हॉस्पिटल चिखली.*