
11/07/2025
चातुर्मास आणि आयुर्वेद
"अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः।प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्।।" भगवद्गीता
अर्थ: "मी वैश्वानर होऊन, सर्व प्राणिमात्रांच्या शरीरात राहतो. प्राण आणि अपान वायूच्या मदतीने, चार प्रकारचे अन्न पचवतो."
मागच्या लेखात आपण पाहिले की चातुर्मास म्हणजे नेमके काय होते. विष्णू अर्थात साक्षात वैश्वानर म्हणजेच जाठराग्नी. हा जाठराग्नी ४ प्रकारचे अन्न म्हणजेच खाद्य, चोष्य, लेह्य, पेय पचवतो. आता जर साक्षात विष्णू स्वतःच निद्राधीन झाले तर साहजिकच प्राणिमात्रांच्या शरीरातील जाठराग्नि वर देखील त्याचा परिणाम होणारच. जे पिंडी तेच ब्रम्हांडी. अर्थात जाठराग्नि मंद झाल्यामुळे भूक मंदावते. शरीर कोणतेही पचण्यास जड असे अन्नपदार्थ सहज पचवू शकत नाही. त्यामुळे धार्मिक कार्ये आणि त्याच्या अनुषंगाने उपवास, लंघन असे सांगितले आहे.
आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहता चातुर्मास हा साधारणपणे वर्षा आणि शरद ऋतुंचा काळ. या चार महिन्यांमध्ये संततधार पाऊस, दमट हवा, मध्येच ऊन मध्येच पाऊस, आणि शेवटी शेवटी शरद ऋतु मधील कडाक्याचे उन (October heat) असे अनेकविध वातावरणातील बदल आपण अनुभवतो. त्यामुळे शरीरातही अनेक बदल सतत होत असतात. ह्या बदलांना सामोरे जाताना शरीराचा कस लागतो. बारकाईने लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल खाण्यापिण्यात थोडेसे जरी बदल झाले तरी त्यामुळे अपचन, पोटात गॅस, जुलाब, ताप, सर्दी असे अनेक त्रास वरचेवर होत आहेत. पचनशक्ती (जाठराग्नि) कमी झाल्याची ही लक्षणे आहेत. त्यामुळे आधीच कमी झालेल्या पचनशक्तीला विश्रांती मिळावी म्हणून ह्या उपवासाचा फायदा होतो. पण त्यासाठी उपवासाचे पदार्थ हे पचायला हलके, गरमागरम, ताजे, भूक वाढवणारे, सात्विक असे असावे. खूप तिखट, मांसाहार, दही, मसालेदार पदार्थ, खूप तेलकट पदार्थ वर्ज्य करावेत. "रोगाः सर्वेsपि मन्देsग्नौ"आयुर्वेदामध्ये सर्व रोग होण्याचे प्रमुख कारण जाठराग्निमांद्य सांगितले आहे. याचाच अर्थ पचनशक्ती कमी असताना हलका आहार सेवन केला तर शारीर स्वास्थ्य टिकून राहते.
या काळात झाडांची लवकर वाढ होते. पशुपक्षी, जलचर यांसाठी हा प्रजनन काळ असतो. अनेक ठिकाणी पावसाळ्यात मासेमारीवर बंदी घातली जाते. निसर्ग, शरीर यांचे संतुलन ठेवले तरच sustainable विकास होईल. आहारावर नियंत्रण ठेवून, सवयी आणि जगण्याच्या पद्धतीत शास्त्रीय पद्धतीने बदल करुन शरीरास भविष्यात होणाऱ्या आजारांपासून सुरक्षित ठेवणे हे प्रत्येकाच्याच हिताचे आहे. जरासं खाल्ल म्हणून काय बिघडतंय असा विचार करून खातच राहिलं तर ते थोड थोड कधी मोठ होत हे समजतच नाही आणि मग प्रश्न पडतो मी तर काही चुकीच केलं नाही तरी आजारपण का येत? चातुर्मासाचे पालन करणे हे सर्वथा शरीराची ताकद व रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.
~ वैद्य ऐश्वर्या पंचपोर-मेहता