30/01/2017
मानसशास्त्रातलं करिअर...
जीवघेणी स्पर्धा, विभक्त कुटुंबपद्धती, बदलत असलेली जीवनशैली यामुळे मानसिक/ भावनिक समस्याही तीव्र होत आहेत. म्हणूनच मानसशास्त्राची गरज वाढत आहे. मानसशास्त्रज्ञ ब-याच क्षेत्रात काम करतात. वैयक्तिक समुपदेशक म्हणून मानसशास्त्रज्ञांची आवश्यकता असते, पण त्याशिवायही अनेक क्षेत्रांत त्यांची मागणी आहे. मानसशास्त्र एक कला आहे व एक विज्ञानही, म्हणूनच काही विद्यापीठांमध्ये हा विषय कला शाखेद्वारे शिकवला जातो. मानसशास्त्र या विषयाची आणि भविष्यात उपलब्ध असलेल्या संधींविषयीची माहिती -
मानसशास्त्र हे एक विज्ञान आहे. समुपदेशन हा तसा मानसशास्त्र विषयातील एक विशेष अभ्यासक्रम. आधुनिकीकरणाच्या रेटयामुळे जगणंच हरवून बसलेल्यांच्या मनात आयुष्याबद्दल ओढ निर्माण करण्याचं सामाजिक कार्य समुपदेशक करू शकतात. विद्यार्थी, पालक, वृद्ध सर्वासाठीच समुपदेशन उपयोगी पडू शकतं. स्पर्धात्मक युगातील अनेक समस्या, मानसिक दडपण यावर समुपदेशनाद्वारे एखादी व्यक्ती खात्रीने मात करू शकते.
मानसशास्त्र या विषयात औषधोपचारापेक्षा समुपदेशनामध्ये अधिक भर असतो. मानसशास्त्रज्ञ बऱ्याच क्षेत्रात काम करतात. वैयक्तिक समुपदेशक म्हणून मानसशास्त्रज्ञांची आवश्यकता असते, पण त्याशिवायही अनेक क्षेत्रांत त्यांची मागणी आहे. उदा. क्रिकेट, हॉकी इत्यादी सांघिक खेळातील संघांचं मनोबल वाढवणारे ‘स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट’ किंवा गुन्हेगाराची मानसिकता समजून विश्लेषण करून पोलिसांना तपासकार्यात मदत करणारे ‘क्रिमिनोलॉजी सायकोलॉजिस्ट’ इत्यादी.
♣शैक्षणिक पात्रता-
मानसशास्त्रात करिअर करण्यासाठी या विषयात पदव्युत्तर शिक्षण आवश्यक ठरतं. पदव्युत्तर (एमए/एमएससी) शिक्षणासाठी किमान पात्रता म्हणजे मानसशास्त्रातील पदवी घ्यावी लागते. काही विद्यापीठांत पदव्युत्तर प्रवेशपरीक्षा घेतली जाते. यासंबंधी विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाशी संपर्क करणं योग्य ठरेल. पदव्युत्तर शिक्षणानंतर आपल्या आवडीच्या विषयातील डॉक्टरेट मिळवणं किंवा एखाद्या अभ्यासक्रम करणं हे पर्याय असतात.
♣स्पेशलायझेशनचे पर्याय..
♦क्लिनिकल सायकोलॉजी-
मानसिक आजार, वर्तणुकीसंबंधी समस्या यासंबंधी उपचार करणारी शाखा. क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ अनेकदा मानसरोग चिकित्सक किंवा इतर डॉक्टरांबरोबर काम करतात. डिप्रेशन, स्क्रिझोफेनिया, फोबिया अशा तीव्र मनोविकारांनी पीडित रुग्णांबरोबर ते काम करतात. मनोरुग्णालयात, व्यसनमुक्ती केंद्रात, मतिमंद मुलांच्या शाळेत इत्यादी ठिकाणी क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ काम करतात.
♦कौन्सिलिंग-
एखाद्या समस्येने त्रस्त होऊन एखादी व्यक्ती सल्ला घेण्यासाठी सल्लागाराकडे येते तेव्हा सल्लागार तिच्या मुलाखती घेऊन तिच्याशी विश्वासपूर्ण असे संबंध प्रस्थापित करतो. व त्यायोगे त्या व्यक्तीला स्वत:च्या समस्या सोडवण्यास साहाय्य करतो. यालाच मानसशास्त्रीय मार्गदर्शन किंवा समुपदेशन असं म्हणतात. हे सल्लागार व्यवसाय मार्गदर्शनसुद्धा करतात. अॅप्टिटयूड टेस्ट (अभिक्षमता चाचणी) बुद्ध्यांक चाचणीआधारे पुढील अभ्यासक्रम निवडण्यास विद्यार्थ्यांला मदत करतात. हे व्यक्तिगत समुपदेशन, ग्रुप समुपदेशन, करिअर समुपदेशन, विवाह समुपदेशन, स्पोर्ट्स समुपदेशन इत्यादी क्षेत्रांत काम करतात. मानसशास्त्रज्ञ मुलांचे प्रश्न, पौगंडावस्थेतील समस्या, सांसारिक समस्या, व्यावसायिक समस्या आणि इतर समस्या सोडवण्यास मदत करतात.
♦सोशल सायकॉलॉजी-
समाजातील जात, धर्म, वर्ण, निवास, आर्थिक स्तर, लिंग, वय यावर आधारित विविध गटांच्या वर्तणुकीचा येणा-या तंत्रांचा अभ्यास व विकास करणारी शाखा. अभिक्षमता चाचणी, व्यक्तिमत्त्व चाचणी इत्यादी संबंधातील कामं ही शाखा करते. सामाजिक मानसशास्त्रज्ञ (सोशल सायकोलॉजिस्ट) माणसाच्या समाजातील वागणुकीचा सखोल अभ्यास करतात. बाजार संशोधन संस्था, जाहिरात संस्था, सरकारी संस्था अशा ठिकाणी हे काम करतात.
♦इंडस्ट्रिअल सायकॉलॉजी-
कामगारांची उत्पादनक्षमता, कामाचा दर्जा वाढावा यासाठी त्यांच्या मानसिकतेचा वेध घेऊन कार्यक्रम ठरवण्यासाठी या शाखेची मोलाची मदत होते. औद्योगिक मानसशास्त्रज्ञांना (इंडस्ट्रीअल सायकोलॉजिस्ट) सध्याच्या जगात फारच महत्त्व आहे. इतर लोकांबरोबर सुरळीत काम कसं करावं, कार्यसमाधान कसं उपलब्ध करावं अशा अनेक गोष्टी ते हाताळतात. शिवाय योग्य कामासाठी योग्य लोकांना ते हाताळतात. योग्य कामासाठी योग्य लोकांना नेमणं, नवनवीन प्रशिक्षण शिबिरं आयोजित करणं या जबाबदा-यासुद्धा औद्योगिक मानसशास्त्रज्ञांकडे असतात.
♦डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी-
नवजात शिशूंपासून वृद्धावस्थेपर्यंत वयोमानानुसार व्यक्तीमध्ये होणा-या मानसिक बदलांचा अभ्यास करणारी शाखा.
♦कन्झ्युमर सायकॉलॉजी-
नवीन उत्पादन बाजारात आणताना त्यासंबंधी ग्राहकांच्या प्रतिक्रिया काय असतील, ते कितपत स्वीकारलं जाईल, यासंबंधी संशोधन करणारी शाखा.
*Shared by Nutan Patil