18/10/2023
नवरात्रीनिमित्त महिला आरोग्यविषयक लेखमालिका - भाग 3 - श्वेतप्रदर / अंगावरून पांढरे पाणी जाणे
खरंतर योनी मार्गातून बाहेर पडणारा पांढरा चिकट स्त्राव हा योनीचे रक्षण करत असतो. योनीगत ओलेपणा टिकून ठेवणे आणि जिवाणूंचा संसर्ग होऊ न देणे हे या स्त्रावाचे प्रमुख कार्य असते. पाळीच्या आधी किंवा ओव्ह्यूलेशन होत असताना हा स्त्राव कमी जास्त होताना दिसतो. त्यावेळी होणारा श्वेतस्त्राव हा प्राकृत असतो.
याऐवजी दह्यासारखा घट्ट, पांढरट, पिवळ्या, हिरवट, लालसर रंगाचा, दुर्गंधी वास असलेला स्त्राव हा आजाराचे द्योतक असतो. या अप्राकृत स्त्रावाबरोबरच योनीच्या जागी खाज असणे, लालपणा असणे, पुरळ येणे, ओटी पोटात सतत दुखणे ही लक्षणे विविध श्वेतप्रदर संबंधित आजारात दिसतात.
त्यातही सतत कंबरदुखी आणि अंगावरून पांढरे जाणे, अशक्तपणा असणे ही लक्षणे महिलांमध्ये प्राधान्याने दिसतात. खूप दिवसांपासून हिमोग्लोबिन कमी असणे हे त्यामागचे प्रमुख कारण असू शकते.
साधारणतः श्वेतप्रदराकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जाते. बऱ्याच वेळी या श्वेतप्रदरामागे हिमोग्लोबिन अत्यंत कमी असणे, वजन झपाट्याने कमी होणे, डायबेटिस असणे ही कारणे दिसून येतात. पुरुषांमधील लैंगिक व्याधींमुळेही ही समस्या दिसून येते.
दमट हवामान, सतत येणारा घाम, सतत लेगिन्स किंवा जीन्स सारख्या टाईट कपड्यांचा वापर, कामावरती गेल्यानंतर अस्वच्छ वॉशरूम त्यामुळे बाथरूमला न जाणे, पाळीच्या वेळात ठराविक कालावधीनंतर पॅड न बदलणे या सर्व कारणांमुळे योनीगत इन्फेक्शन, फंगल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याची संभावना वाढते व त्यामुळेच वरील लक्षणे दिसतात.
योग्य वेळीच योग्य उपचार सुरु केल्यास व योग्य हायजीन राखल्यास या आजाराला आटोक्यात ठेवता येते.
याहून महत्त्वाचे म्हणजे सतत अंगावरून पांढरे जात असल्यास, त्याचबरोबर वजन कमी होणे, भूक न लागणे, मेनोपोज झाल्यानंतरही ब्लीडिंग होणे, ओटी पोटात सतत दुखणे अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा. ही लक्षणे सर्वाइकल कॅन्सरची असू शकतात, त्यामुळे वयानुसार तपासण्या करत राहणे व कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करणे ही महिलांसाठी अत्यंत गरजेची गोष्ट आहे.
या देवी सर्वभूतेषु आरोग्य-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
ऑर्थोवेद क्लिनिक, डोंबिवली वेस्ट
अधिक माहितीसाठी, संपर्क - 084228 82215