06/09/2025
भगवान मंडलिक.
मनोरुग्णांना बळ देणारा आधारवड :मनोदय
मनोविकार रुग्ण(शुभार्थी)त्यांच्या नातेवाईकांना(शुभंकरांना) कुठलेही शुल्क न आकारता मोफत आधार देणे, त्यांचे पुनर्वसन, मानसिक समस्यांविषयी जनजागृती करणे आणि मनोरुग्णांच्या क्षमतेप्रमाणे त्यांचा परिपूर्ण विकास करणे हे डोंबिवलीतील मनोदय ट्रस्ट संस्थेचे मुख्य उद्दिष्ट. ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डाॅ. अद्वैत लक्ष्मण पाध्ये या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहेत. डोंबिवलीत मागील पंचविस वर्षापूर्वी मनोविकार रुग्णांवर वैद्यकीय उपचारांना डाॅ. पाध्ये यांनी सुरूवात केली. मनोविकार रुग्णांवर उपचार करत असताना अनेक वेळा या रुग्णांचे कुटुंबीय मुलगा आता ठीक झाला आहे. त्याच्या हालचाली, वागण्यात प्रगती दिसते. तो आता ठीक आहे. पण तो घरात केवळ बसून राहतो. काहीही करत नाही. घरात एकाच जागी बसून राहत असल्याने त्याच्यात अस्वस्थता निर्माण होते, असे डाॅ. पाध्ये यांना सांगू लागले. सुरूवातीला डाॅक्टर त्यांना दिलासा देत होते.
मनोविकार आजाराचे असे विविध प्रकारचे रुग्ण तपासत असताना डाॅ. पाध्ये यांना मनोविकारी रुग्णाच्या बहुतांशी कुटुंबीयांकडून रुग्ण उपचाराने ठीक होत आहे, त्याच्या हाताला कोठे काम मिळेल, त्याला नोकरी, शिक्षणासाठी त्याच्या काही करता येईल का, असे प्रश्न विचारू लागले. रुग्णाच्या पालकांकडून रुग्ण ठीक होत आहे. त्याच्या साठी पुढे काय करता येईल का, अशी वारंवार विचारणा होऊ लागल्यावर डाॅ. पाध्ये यांना मनोविकार रुग्ण सेवे बरोबर रुग्ण ठीक झाल्यावरही त्यांच्यासाठी, त्या्ंच्या कुटुंबीयांसाठी पुनर्वसन, प्रबोधनात्मक, या मुलांच्या बुध्दी क्षमतेप्रमाणे त्यांची कौशल्ये विकसित करण्यासाठी काही करता येतील का असा विचार करू लागले.
अशा विचारणा करणाऱ्या रुग्ण मुलांच्या पालकांना एका व्यासपीठावर आणून त्यांच्याशी चर्चामंथन करण्याचा निर्णय घेण्यात आला. केईएम रग्णालयाचे ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ व प्राध्यापक डाॅ. प्रकाश प्रधान यांच्या उपस्थितीत मनोविकार रुग्णांचे कुटुंबीय यांच्या बरोबर एक चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्रात डाॅ. प्रधान यांनी मनोविकार आजार, उमद्या वयात या विकाराची लक्षणे दिसू लागल्यावर काय करायचे. अशा विकारी रुग्णांचे नियंत्रण, त्यामुळे कुटुंबीयांना होणारा त्रास, अशा परिस्थितीत रुग्ण आणि त्याच्या पाल्य, नातेवाईकांनी कशी आधाराची गरज असते, मनोविकारी रुग्ण वय वाढत जाते त्याप्रमाणे त्याच्यातील भावना विकसित होत जातात. भावनेशी संंबंधित मार्गदर्शन, पुढील काळात नातेवाईकांनी टाकायची पावले, घ्यायचे निर्णय, या विषयावर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनातून मनोविकारी रुग्णांचे आजाराचे स्वरुप पाहून ‘स्वमदत गट’ स्थापन करण्याची संकल्पना सन २००३ मध्ये पुढे आली. मनोविकारी रुग्ण सेवेबरोबर सामाजिक कार्याचा भाग म्हणून स्वमदत गटाचे उपक्रम, त्यावरील नियंत्रणाचे काम डाॅ. पाध्ये यांनी मोफत सुरू केले.
स्वमदत गट स्थापन
तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पालकांशी चर्चा अशा विविध चर्चामंथनातून स्किझोफ्रेनिया झालेल्या रुग्णांच्या नातेवाईक शुभंकरांसाठी ‘आधारवड’ नावाचा पहिला स्वमदत गट स्थापन करण्यात आला. शुभंकर म्हणजे मनोविकारातून ठीक झालेल्या रुग्णाचे नातेवाईक. आधारवडच्या मंचावर शुभंकर येऊन मनोरंजन कार्यक्रम, आपल्यातील कौशल्ये दाखविणारे कार्यक्रम करू लागले. विचारांची देवाण घेवाण या व्यासपीठावर होऊ लागली. रुग्ण चिंतेत असलेल्या पालकांना या मंचावर एक सकारात्मक उर्जा मिळू लागली. येणाऱ्या परिस्थितीवर उमेदीने मात कशी करायची, असा धीर एकमेकांना शुभंकर देऊ लागले. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी होणाऱ्या शुंभकरांच्या उपक्रमाला ३० शुभंकर उपस्थित असतात. वीस वर्ष हा स्वमदत गट सुरू आहे.
मनोविकाराची लक्षणे बरी/नियंत्रणात असलेल्या रुग्णाला शुभार्थी असे नाव देण्यात आले. या शुभार्थींसाठी ‘फिनिक्स’ स्वमदत गट स्थापून एका मंचावर आणण्यात आले. या गटात आता ३० शुभार्थी आहेत. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे. त्यांच्यात सकारात्मक उर्जा निर्माण करण्याचे काम या गटात केले जाते. योग, नृत्योपचार,विविध प्रकारचे खेळ, कौशल्ये विकसित करण्यासाठी या मुलांकडून रद्दी कागदापासून पिशव्या, रंगीत पेपरांपासून कागदी पर्यावरणस्नेही फुले, घरघंटीच्या माध्यमातून विविध प्रकारची पीठे तयार करणे, शिवण यंत्राच्या माध्यमातून कपड्यावर आकर्षक वेलबुट्टीदार सजावट करणे असे हस्तकौशल्यधारी उपक्रम राबविले जातात.
शुभार्थींनी तयार केलेल्या वस्तू सामाजिक संस्थांच्या माध्यमातून, अनेक मंचावर विक्रीसाठी ठेवणे असे उपक्रम नियमित केले जातात. या माध्यमातून मिळणारे पैसे शुभार्थींची उपस्थिती, उत्पादकता, गुणवत्ता याप्रमाणे त्यांना प्रोत्साहनवेतन म्हणून दिले जातात. आपण केलेल्या कामाचे आपणास पैसे मिळाले, अशी एक उत्सुकता शुभार्थींमध्ये निर्माण होऊन ते अधिक तनमनाने या कामात झोकून देतात. आता ३० शुभार्थी ‘फिनिक्स’ स्वमदत गटात सहभागी आहेत.
अशा स्वमदत गटांच्या माध्यमातून शुभार्थी (मनोविकार लक्षणे असलेला रुग्ण), शुभंकर (रुग्ण बरे झालेल्याचा नातेवाईक) आपली मनमोकळी करू लागले. एकमेकांना आधार देऊ लागले. मनोविकारातून बाहेर आलेले पण घरी अस्वस्थता, चिंतेत, स्वस्थ बसून राहणारे शुभार्थी स्वमदत गटांच्या माध्यमातून आपली कौशल्ये, क्षमता सिध्द करू लागले. त्यांच्यातील एकारलेपणा दूर होऊ लागला. सांघिकपणामुळे शुभार्थींमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होत असल्याचे दृश्य परिमाण या स्वमदत गटांच्या माध्यमातून दिसू लागले.
तसेच आपस्मार रूग्ण व नातेवाईकांसाठी" प्रोत्साहन" ऑब्सेसिव कम्पलसिव डिसऑर्डर साठी "चिंतन" डिमेंशिया रूग्णांच्या शुभंकरांसाठी 'उत्तररंग"स्किझोफ्रनियाच्या नोकरी,व्यवसाय करणार्या शुभार्थींचा "उडान" बायपोलार डिसऑर्डरच्या शुभार्थींचा 'इंद्रधनुष्य' तर डिमेंशिया,पार्किन्सनच्या सुरूवातीच्या पायरीवरील रूग्ण वा प्रतिबंधात्मक म्हणून सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या मनमेंदू संवर्धनासाठी "मेधावि"असे एकूण आठ स्वमदत गट मनोविकारतज्ज्ञ डाॅ. अद्वैत पाध्ये आणि सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १७ वर्षात सक्रिय झाले. हे सर्व गट पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. शुभार्थी तरूण, ज्येष्ठांमधील कौशल्ये, क्षमता विकसित करण्यावर स्वमदत गटातून सर्वाधिक प्रयत्न केला जातो. नृत्योपचार, विविध प्रकारच्या भाषा त्यांना शिकवल्या जातात. संगणकीय तंत्रे वा डिजिटल तंत्र याची ओळख करून दिली जाते. मनोरंजनात्मक खेळांची माहिती दिली जाते. त्याचबरोबर कुमारवयीन मुलांच्या बुध्दिमत्तेचे पैलू विकसित करणे, ताणतणाव चिंता निवारण,पालकत्व, रागनियंत्रण, लग्न समुपदेशन, विवेकनिष्ठ उपचार पध्दतीसाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा आयोजित केल्या जातात. फिनिक्स सेंटरला,शुभार्थीसाठी ग्रंथालय आहे. त्यांच्या आवडीची, मनाला उभारी देणारी पुस्तके या ग्रंथालयात आहेत.त्यांना विविध विषय देऊन लेख लिहायला सांगितले जाते व त्याचे इ मासिक तयार केले जाते!
याचबरोबर मनआरोग्याबद्दल जनजागृती करण्यासाठी संबंधित चित्रपट, लघुपट शुभार्थी, त्यांच्या पालकांना दाखविले जातात. मनोविकारावर प्रबोधनात्मक दृश्यध्वनी चित्रफिती तयार करून, नाटिकांच्या माध्यमांतून शुभार्थींना दाखवून सकारात्मक विचार देण्याचा प्रयत्न केला जातो. समाजापासून दूर असलेला शुभार्थी आपल्या क्षमतेने आपली कौशल्ये स्वसामर्थ्याने विकसित करून पुन्हा समाजाचा एक जबाबदार घटक बनावा, असे काम स्वमदत गटाच्या माध्यमातून मनोदय ट्रस्टकडून सरू आहे.
करोना महासाथीच्या काळात सर्व व्यवहार ठप्प झाले होते. शुभार्थी, शुभंकर यांच्यामध्ये अस्वस्थतेचे वातावरण या कालावधीत होते. पण, या दोन्ही गटातील स्वमदत गटांना ऑनलाईन माध्यमातून संघटित ठेवण्याचे, त्यांना तंत्रस्नेही तंत्रज्ञानातून एकत्र आणण्याचे काम करोना महासाथ काळातही सुरू ठेवण्यात आले होते. या कालावधीत ऑनलाईन माध्यमातूनही शुभार्थी, शुभंकर यांचे उपक्रम आपण घेऊ शकतो. आणि हे दोन्ही गट आनंदाने या तंत्रस्नेही उपक्रमात सहभागी होतात हे निदर्शनास आले. त्यामुळे हे स्वमदत गट चालविताना आता बदलत्या काळाप्रमाणे तंत्रज्ञानाचीही जोड घेण्यात येत आहे.
शाळांमधे कुमारवयीन मुलांसाठी लैंगिकता समुपदेशन, व्यसनांविरोधात(मोबाईलचे पण) जागृती,तणाव नियोजन यावर "जाणीव"कार्यशाळा घेण्यात येते!!
मनोदय ट्रस्ट स्थापना:
प्रारंभी शुभार्थी, शुभंकरांची गरज म्हणून स्वमदत गट स्थापन करण्यात आले. त्यांची कामे, उपक्रम जोमाने सुरू आहेत. आता शुभार्थी, शुभंकरांची संख्या वाढत आहे. स्वमदत गटांचा आकार वाढत आहे. या सर्व स्वमदत गटांना सुरचित नियोजनाने एक छताखाली आणावे आणि स्वमदत गटांच्या विस्ताराला गती द्यावी, मानसिक समस्यांविषयी जनजागृतीचे उपक्रम राबविणे, शुभार्थींच्या मनोविकासाचा विचार करून भावनिक, लैंगिक, व्यसन, चिंता, तणाव, राग नियंत्रण, शुभार्थींचे पुनर्वसन, शुभंकरांना आधार देणे, क्षमता प्राप्त शुभार्थींनी नोकरी, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, या विचारातून डाॅ. अद्वैत पाध्ये यांच्या अध्यक्षतेखाली मनोदय ट्रस्टची २००८ मध्ये स्थापन करण्यात आली. या ट्रस्टच्या माध्यमातून आठ स्वमदत गटांचे उपक्रम शुभंंकर, शुभार्थींच्या नातेवाईकांना कोणतेही शुल्क न आकारता सन २००८ पासून आजतागायत मोफत सुरू आहेत. या स्वमदत गटात इतर तज्ज्ञांकडे उपचार घेणारे शुभार्थी पण फक्त गटापुरते येऊ शकतात व उपचार आपापल्या तज्ज्ञांकडे घेऊ शकतात!
स्वमदत गटाच्या माध्यमातून कौशल्य विकसित झालेले, क्षमता प्राप्त शुभार्थी स्थानिक आस्थापना, दुकाने, रुग्णालय, सामाजिक संस्था याठिकाणी नोकरी करत आहेत. काहींनी आपले घरगुती पध्दतीने, गाळे घेऊन व्यवसाय सुरू केले आहेत. याच मार्गिकेतून इतरही शुभार्थी आपली वाटचाल करतील यासाठी मनोदय ट्रस्टचा प्रयत्न आहे.
भविष्यातील प्रकल्प :
स्वमदत गटाच्या माध्यमातून शुभार्थी आपली वाटचाल करत आहेत, पण सर्व शुभंकरांना मनात एक प्रश्न काही वर्षापासून सतावत होता, 'आपल्यानंतर यांचे काय,कसे होणार?'गटातील एका शुभंकराचे निधन झाल्यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आला! त्यामुळे अशा शुभार्थींसाठी कायमस्वरूपी पुनर्वसन/ निवारा केंद्र/ असिस्टेड लिविंग उभारण्याचा विचार पुढे आला आहे.
स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णांच्या घरात नोकरदार वर्ग असेल तर त्यांना नियमित सुट्टया घेऊन घरातील रूग्णाचा दिवसभर सुट्टी टाकून सांभाळ करणे अशक्य असते. अशा या रुग्णांच्या नातेवाईकांचा विचार करून स्मृतिभ्रंश रुग्णांसाठी दिवसभराचे काळजी वाहक केंद्र सुरू करण्याचा विचार मनोदय ट्रस्टकडून सुरू आहे. जमीन, वास्तू आणि आर्थिक लोकसहभागाचा आर्थिक हातभार लागला तर मनोदय ट्रस्टचा मनआरोग्याचा हा आधारवड अधिक विस्तारण्यास ट्रस्टला बळ मिळणार आहे.
Account name Manodaya Trust
Account number 075100109294
IFSC code COSB0000075
MICR 400164020
देणगीदाराने आपले पुर्ण नाव, पत्ता, पॅन आणि ईमेल manodayatrust@gmail.com किंवा 9869712652 ह्यावर पाठवावो 80जी रिसीट साठी