
20/04/2024
Crop Disease Management : रोगग्रस्त शेतात मायकोरायझा बुरशीचा वापर वाढवेल उत्पादन
Mycorrhiza Fungi : मायकोरायझल बुरशींचा योग्य प्रमाणात वापर केल्यास कोणतीही अतिरिक्त खते किंवा कीडनाशकांचा वापर न करता पिकाची उत्पादकता टिकवून ठेवणे शक्य असल्याचे संशोधनात दिसून आले आहे.
Mycorrhiza Fungi
Mycorrhiza FungiAgrowon
सतीश कुलकर्णी
Uses of Mycorrhiza Fungi : पिकांमध्ये रोगकारक सूक्ष्मजीवांच्या प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादन कमी होते. हे टाळण्यासाठी मायकोरायझल बुरशींचा योग्य प्रमाणात वापर केल्यास कोणतीही अतिरिक्त खते किंवा कीडनाशकांचा वापर न करता पिकाची उत्पादकता टिकवून ठेवणे शक्य असल्याचे संशोधनात दिसून आले आहे.
झुरिच आणि बासेल, अॅग्रोस्कोप आणि रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑरगॅनिक अॅग्रीकल्चर (FiBL) या संस्थांच्या संशोधकांनी एकत्रित केलेल्या प्रयोगामध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.
सध्या कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर केला जात आहे. त्याने सुरुवातीच्या काही दशकांमध्ये उत्पादनामध्ये चांगली वाढ मिळाली असली, तरी पर्यावरणातील त्याचे धोके आता लक्षात येऊ लागले आहे.
विशेषतः रासायनिक कीडनाशकांच्या वापरामुळे उपयुक्त सूक्ष्मजीव आणि कीटकांच्या जैवविविधतेमध्ये घट होत आहे. रासायनिक घटकांचे पर्यावरणामध्ये प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे कृषी रसायनांचा वापर न करता पर्यावरणपूरक आणि शाश्वत मार्ग शोधण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.
पर्यायी जीवशास्त्राचे एक उदाहरण म्हणजे मायकोरायझल बुरशी. ही बुरशी वनस्पतींना पोषक तत्त्वे मिळवून देण्यामध्ये मदत करत असल्याने अनेक अर्थाने फायदेशीर ठरते. या बुरशी वनस्पतीच्या मुळांपाशी नैसर्गिकरीत्या तयार होऊन काम करतात. मात्र त्यांच्या निर्मिती आणि वापरासंदर्भात फारसे काम झालेले नाही.
Mycorrhiza Fungi
Indian Agriculture : शेती करायची कशी?
उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत सुधारणा :
झुरिच आणि बासेल, अॅग्रोस्कोप आणि रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑरगॅनिक अॅग्रिकल्चर (FiBL) या संस्थांच्या संशोधक गटाने प्रथमच मायकोरायझल बुरशींचा शेतामध्ये मोठ्या प्रमाणात वापर करून काही प्रयोग केले. या प्रयोगामध्ये टीमने आता पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर मायकोरायझल बुरशीचा वापर शेतात काम करत असल्याचे दाखवले आहे.
उत्तर आणि पूर्व स्वित्झर्लंडमधील मक्याच्या ५४ शेतांतील ८०० चाचणी प्रक्षेत्रामध्ये पीक पेरणीपूर्वी मायकोरायझल बुरशी जमिनीत मिसळली गेली. त्यातील एक चतुर्थांश प्रक्षेत्रामध्ये मायकोरायझल बुरशीमुळे उत्पादनामध्ये ४० टक्क्यांपर्यंत वाढ मिळाली असल्याचे संशोधक मार्सेल व्हॅन डेर हेजडेन यांनी सांगितले. मात्र प्रक्षेत्राच्या एक तृतीयांश क्षेत्रामध्ये उत्पादन वाढले नाही, तर काही प्रकरणांमध्ये उत्पादन उलट कमी झाले.
हे असे होण्यामागील कारणांची मीमांसा संशोधन पथकाला सुरुवातीला करता आली नाही. मात्र त्याबद्दल अधिक अभ्यास करून कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी संशोधकांनी मातीतील सूक्ष्मजंतूंच्या जैवविविधतेसह विविध प्रकारच्या रासायनिक, भौतिक आणि जैविक गुणधर्मांचे विश्लेषण केले.
त्या बाबत माहिती देताना अॅग्रोस्कोपच्या स्टेफनी लुट्झ म्हणाल्या, की जमिनीमध्ये मुळात रोगकारक बुरशीची अधिक जैवविविधता असल्यास मायकोरायझल बुरशींचा वापर केल्यास ती अधिक उत्तम प्रकारे कार्य करते. मायकोरायझल बुरशी जमिनीतील रोगकारक घटकांच्या विरुद्ध वनस्पतींसाठी संरक्षणात्मक कवच म्हणून काम करते. परिणामी, त्या झाडांचे उत्पादन सामान्य राखले जाण्यास मदत होते.
याउलट, जिथे रोगकारक घटकांचे प्रमाण मुलतः कमी होते, अशा ठिकाणी मायकोरायझल बुरशीचा फारसा परिणाम दिसला नाही. कारण अशा ठिकाणी झाडे निरोगी असल्याने मुळातच चांगली वाढतात. अशा परिस्थितीत मायकोरायझल बुरशीचा वापर केल्यास कोणतेही अतिरिक्त फायदे मिळत नसल्याचे सेंद्रिय शेती संशोधन संस्थेतील नताचा बोडेनहॉसेन यांनी सांगितले.
Mycorrhiza Fungi
Chana Pest Crop Damage : घाटेअळीला कंटाळून हरभरापिकावर फिरवला रोटर
तज्ज्ञांचे मत...
या अभ्यासाचे उद्दिष्ट मायकोरायझल इनोक्यूलेशन कोणत्या परिस्थितीत काम करते, याचा अंदाज लावण्याचे होते. त्यासाठी गेबर्ट रफ फाउंडेशनने निधी पुरवला होता. बासेल विद्यापीठातील शास्त्रज्ञ क्लाऊस श्लाप्पी यांनी सांगितले, की मातीच्या फक्त काही निर्देशकांसह, त्यातही मुख्यतः मातीतील बुरशींच्या जैवविविधतेवरून आम्ही १० पैकी नऊ शेतात मायकोरायझल बुरशींचा वापर यशस्वी होईल की नाही, याचा अंदाज लावण्यात यशस्वी ठरलो. परिणामी, हंगाम संपण्यापूर्वीच शेतातून नेमके किती उत्पादन मिळेल, याचा अंदाजही लावणे शक्य होते.
त्याच प्रमाणे कोणत्या शेतामध्ये उपयुक्त बुरशींचा वापर करायचा, याचाही अंदाज आपल्याला मिळू शकतो. या चाचणीचे परिणाम अधिक शाश्वत शेतीच्या दिशेने पडलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. हे तंत्रज्ञान विश्वसनीय कृषी पद्धतीमध्ये अवलंब करण्यायोग्य ठरू शकते. मात्र मोठ्या क्षेत्रावर बुरशी पसरवण्यासाठी चांगले तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता मार्सेल व्हॅन डेर हेजडेन यांनी व्यक्त केली.
संपर्क:९११२८७२५८८