20/10/2023
3 वर्ष 10 महिने वयाचा मुलाला त्याचे पालक क्लिनिक मध्ये घेऊन आले होते. त्याच्या दोन दाढींना सूज आली होती आणि चेहरा सुजला होता.
एक्स-रे केला असता दाताची कीड ही नसापर्यंत गेल्याचे आढळून आले. त्यामुळे दातांचे रूट कॅनल करण्यात आले.
**लहान मुलांच्या दुधाच्या दाताचे रूट कॅनाल ट्रिटमेंट**
सुहास्यवदन म्हणजे सर्वोत्तम शारीरिक, मानसिक आरोग्याचे लक्षण आहे. दुधाचे दात पडणारच, म्हणून ट्रीटमेंटची गरज नाही, हा गैरसमज आहे. दुधाचे समोरचे दात सहाव्या वर्षापासून पडायला सुरूवात होते. पण दुधाचे दाढा पडणे, पक्के दाढ येणे ही प्रक्रिया 12-13 वर्षापर्यंत सुरू असते. तोपर्यंत दुधाच्या दातांचे आरोग्य राखले गेले पाहिजे. मानसिक, शारीरिक सर्वांगीण व्यक्तीमत्व विकासासाठी पोषक अशी प्रकृती ठेवणे अत्यावश्यक आहे. यासाठीच दुधाच्या दातांची काळजी, उपचार केल्यास भविष्यातील त्रास वाचतो.
1. औषधे घेवून किंवा दातांवर औषध लावून दातांची ट्रीटमेंट होते की नाही?
उत्तर : नाही. दातांची कीड (caries, decay) हा जीवाणूंमुळे होणारा आजार आहे. दातांच्या 2 थरांमध्ये रक्त प्रवाह नसल्याने औषधे जीवाणूंचा प्रतिकार करण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे लहान मुलांच्या दातांच्या डॉक्टरांकडून दात मशिनने स्वच्छ करुन सिमेंट फिलींग करणे हाच पर्याय असतो. ट्रीटमेंट न केल्यास दातांमध्ये खड्डे (Cavities) होवून जेवण अडकते, तोंडाचा वास येतो. कीड दातांच्या नसेपर्यंत पोहचते, दुखते, इन्फेक्शन हाडापर्यंत, हिरडीपर्यंत पोहोचून पू, सूज, ताप येतो. औषधे घेवून हिरड्यांची सूज तात्पुरती उतरते. परंतू दातातील इन्फेक्शन तसेच राहते, मुलाला वारंवार खातापिताना दुखते, अशाही परिस्थितीत दुर्लक्ष केले तर कीड पक्क्या दातांवर पसरते. शेवटची अवस्था म्हणजे कीड लागल्यामुळे दात तुटणे/काढून टाकावा लागणे, त्यामुळे दात वेडेवाकडे येतात. पुढचे दात वेळेआधी पडल्यास, उच्चारात दोष निर्माण होतो. थोडक्यात मुलांच्या दातांकडे दुर्लक्ष केले तर गंभीर परिणाम होवू शकतात. लहान मुलांच्या दातांना कीड लागू नये म्हणून फ्लोराईड, सिलंट ट्रीटमेंट, दातांची सफाई डॉक्टरांकडून करवून घेवू शकता. फिलींग, रुट कॅनाल ट्रीटमेंट, कॅपसुध्दा लहान मुलांच्या दातात कराव्या लागतात. जर दात काढावे लागले असतील तर पक्के दात वेडेवाकडे येवू नयेत म्हणून स्पेस मेंटेनर बसविता येतात.
2. दुधाच्या दाताची रुट कॅनाल ट्रिटमेंट/काढणे यापैकी काय सुरक्षित?
नैसर्गिक वाढीच्या क्रमाअगोदर दुधाचे दात काढण्याचे दुष्परिणाम असतात. दुधाचे दात काढणे/रुट कॅनाल करणे, दोन्ही ट्रिटमेंटसाठी दाताना भूल देणे आवश्यक असते. दात काढण्यास रुट कॅनालपेक्षा जास्त भूलीची आवश्यकता असते. त्याचबरोबर दात काढण्यापेक्षा रुट कॅनाल ट्रिटमेंटची उपचारपध्दती हळूवार असते. रुट कॅनाल करताना आधुनिक तंत्रज्ञान, संसाधने वापरल्याने रुट कॅनाल सुरक्षितपणे, वेदनारहित होतात. विशिष्ट जेल, स्प्रे वापरुन सुई टोचण्याआधी हिरड्या बधिर करतात, त्यामुळे सुई टोचल्याची संवेदना जाणवत नाही. मुलांच्या मनात भीती असते, बौध्दिक वाढही पूर्ण नसते. तसेच, डॉक्टर इंजेक्शन देणार, दात काढणार अशी समजूत असते. याचा विचार करता मुलांची भिती दूर करणे, खेळीमेळीचे मित्रत्वाचे वातावरण तयार करणे, ट्रीटमेंटसाठी मुलांची मानसिक तयारी करणे यातच लहान मुलांच्या दातांच्या डॉक्टरचे कौशल्य असते. काही मुले ट्रीटमेंट करण्यासाठी आवश्यक सहकार्य देवू शकत नाहीत, अशावेळी उत्तम प्रतीची ट्रीटमेंट करण्यासाठी पूर्ण भूल (General Anaesthesia) देवून ट्रीटमेंट करण्याची गरज असते