15/06/2025
मागच्याच आठवड्यातील गोष्ट. मला माझ्या पेशंट मेधा चा फोन आला. "मॅडम, काही दिवसांपासून पचन बिघडले आहे. पोट गच्च वाटते आहे आणि गॅसही खूप होतोय." मी तिला दुसर्या दिवशी तपासण्यासाठी हॉस्पिटल मध्ये बोलावले. "मॅडम असे कसे झाले? मागच्या महिन्यात जेव्हा अपचनाचा त्रास झाला होता, तेव्हा मी औषधे घेतली होती व बरे वाटले होते. तुम्ही सांगितलेले पथ्य मी नीट पाळते आहे. अचानक पुन्हा त्रास कसा चालू झाला?" नेमकी अशीच तक्रार घेऊन इतरही पेशन्ट opd मध्ये आले होते. "मेधा, 2 आठवडे झाले, भरपूर पाऊस पडत आहे. या वातावरणात होणार्या बदलांचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. पावसाळ्यात शरीरात वातदोष वाढतो. पचनशक्ती मंदावते. म्हणूनच अशा पावसाळी हवेत भूक कमी होणे, पोटात गॅस पकडणे, पोटदुखी, पोट साफ न होणे किंवा पोट बिघडणे असे विविध त्रास होतात. सांधेदुखी, कंबरदुखी, अस्थमा, सर्दी, खोकला, माइग्रेन हे त्रासही वाढताना दिसतात."
"मग असे त्रास होऊ नयेत यासाठी आपण काय करू शकतो?"मेधाने विचारले. मीही ठरवले, हिच्या सर्व शंकांचे नीट समाधान केले पाहिजे. "सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला आहार पचायला हलका व गरम असावा. पोटाला तडस लागेपर्यंत न खाता भुकेपेक्षा चार घास कमी खावे. पाणी गरम प्यावे. तसेच पावसाळ्यात शरीरात वाढलेल्या वात दोषासाठी 'बस्ती' हा पंचकर्म उपचार खूप फायदेशीर ठरतो. बस्ती म्हणजे औषधी तेल, तूप, काढे, दूध याचा गुदमार्गाद्वारे एनिमा दिला जातो. याने शरीरात साचलेले टाकाऊ घटक म्हणजेच toxins शरीराबाहेर काढून टाकले जातात व शरीर स्वच्छ होते. त्यामुळे पचन सुधारते. शरीरांतर्गत कोरडेपणा कमी होतो. त्वचा सुंदर होते. कंबर व सांधे यांची ताकद वाढते. हॉर्मोन चे संतुलन होते व मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात. या सर्वांचा परिणाम म्हणजे आपण पाच वर्षांनी तरुण होतो! पचनविकार, मासिक पाळीच्या तक्रारी, स्री व पुरुष वंध्यत्व, सांधेदुखी, साइटिका, varicose vens, डिप्रेशन, किडनी स्टोन, केस गळती अशा विविध आजारांवर बस्तीने उत्तम फायदा होतो."
"पण माझ्यासारख्या नाजूक प्रकृतीच्या व्यक्तींना हे झेपेल का मॅडम?" मेधाची शंका योग्यच होती. "अग मेधा, आयुर्वेदामध्ये शरीराची स्वच्छता करण्यासाठी 3 प्रकार सांगितले आहेत. पहिले म्हणजे वमन. म्हणजेच उलटीवाटे शरीराची शुद्धी. जुलाबाचे औषध देऊन केली जाणारी शरीरशुद्धी म्हणजे विरेचन. या दोन्ही प्रकारात शरीराला थोडा त्रास होतो. पथ्यही काटेकोर पाळायला लागते. मात्र बस्ती मध्ये शरीराला काहीही त्रास न होता अगदी सहज शरीर स्वच्छ होते. पथ्यही अगदी सोपे आणि सहज जमते. तसेच वर सांगितल्याप्रमाणे फायदेही मिळतात. नाजूक व्यक्ती वृद्ध माणसे लहान मुले इतकेच काय तर गरोदर स्त्रियांमध्ये ही बस्ती देता येतात." हे ऐकून मेधा खूपच खुश झाली. "मग हे बस्ती मीही करून घेऊ का? त्याचा फायदा किती दिवस टिकतो?" "हो नक्की! बस्ती केले असता औषधांची संख्याही कमी होते. व्यायाम, आहार, दिनचर्या असे नीट पथ्य पाळले तर औषधांची गरजही पडत नाही. यावर्षी जर तू बस्ती करून घेतलेस तर पुढील पावसाळ्यापर्यंत बघावे लागणार नाही. दरवर्षी पावसाळ्यात बस्ती घ्यावे असा सल्ला मी माझ्या पेशंट्सना देते." अशी अनेक पेशंटची उदाहरणे आहेत जे दरवर्षी एकदा पंचकर्माद्वारे शरीराचे सर्विसिंग करून घेतात व वर्षभर उत्तम आरोग्य उत्साह याचा आनंद घेतात.
मला माझी पेशंट साक्षीचे उदाहरण सांगावेसे वाटते. साक्षी लग्न करून सासरी आली. पीसीओडी व अनियमित मासिक पाळी साठी आयुर्वेदिक औषधे आपल्या हॉस्पिटलमध्ये चालू केली. वर्षभर औषधे अगदी नियमित घेतली. मासिक पाळी छान नियमित झाली, बाकीचेही त्रास भरपूर कमी झाले. "आता चान्स घ्यायला हवा" म्हणून ओव्ह्यूलेशन स्टडी नावाची सोनोग्राफी केली. त्यात असे लक्षात आले की स्त्रीबीज नीट तयार होत नाही. मग साक्षीचे बस्ती करून घेण्याचा आम्ही निर्णय घेतला. बस्ती मध्ये स्त्रीबीज गर्भाशयाचे अस्तर व हार्मोन्स चांगले व्हावेत या दृष्टीने तेल तूप व काढे वापरले. बस्ती पूर्ण झाले. त्यानंतरची साक्षीची पाळी मात्र चुकली! म्हणून आम्ही प्रेग्नेंसी टेस्ट केली. त्यात समजले साक्षी चक्क गरोदर आहे! बस्ती मुळे स्त्री बीजाची निर्मिती चांगली झाली व साक्षी लगेचच गरोदर राहिली. असा अनुभव वंध्यत्वाची ट्रीटमेंट घेणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत अनेकदा येतो.
जसा अनुभव वंध्यत्व उपचारांचा तसाच संधिवाताच्या उपचारांचा सुद्धा आहे! संधिवाताच्या विविध प्रकारच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या अनेक रुग्णांना या बस्ती उपचारांचा चांगला फायदा झाल्याचे रोजच्या प्रॅक्टिस मध्ये पाहायला मिळते. शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकणे, सांध्यांची झीज भरून काढणे, स्नायूंची ताकद वाढवणे, कमरेची ताकद वाढवणे, रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारणे, शरीरातील वातदोष कमी करणे, शरीराला पोषण देणे ही सर्व कामे बस्तीद्वारे होतात. म्हणूनच सांधेदुखी, मणक्याचे आजार, सायटिका, आमवात, गाऊट, चिकनगुनिया अथवा अन्य व्हायरल आजारांनंतर उद्भवणारी सांधेदुखी इत्यादि वाताच्या विविध आजारांमध्ये बस्तीचा खूप छान फायदा होतो.
एकूणच शरीरात उद्भवणारे विविध प्रकारचे आजार असो अथवा निरोगी लोकांचे आरोग्य रक्षण.... पंचकर्म मधील बस्ती हा उपचार या सर्वांनाच अतिशय लाभदायक आहे आणि ह्याचा अनुभव माझ्या रोजच्या प्रॅक्टिस मध्ये मी कायम घेत असते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्याच्या या काळामध्ये वर्षभर आपलं आरोग्य चांगलं राहावं अशी इच्छा असलेल्या प्रत्येकाने आपल्या जवळच्या आयुर्वेद तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बस्ती उपचारांचा लाभ जरूर घ्यावा ही सर्वांना विनंती!
डॉ. वरदा मिहीर वाचासुंदर
एम डी आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ
पंचवेद आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल