10/09/2025
निमित्त.. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन
आत्महत्या कलंक नव्हे आजार!!
डॉ. शैलजा पाटील (मानसतज्ञ)
कृष्णा विश्व विद्यापीठ, कराड.
आत्महत्येचे विचार डोक्यात घेऊन फिरणारी कित्येक माणसं आपल्याही आजूबाजूला असतात,अनेकदा माणसांच्या गराड्यात असूनही ती एकटी पडतात, त्यांच्या मनाला खूप वेदना देणारा आणि आतून कमजोर करणारा तो विचार त्यांचं जगणं अगदीच मुश्किल करून टाकतो, अशा माणसांमध्ये परकेपणाची भावना वाढत जाते या भावना आत्महत्येला कारणीभूत ठरत असतात, काही माणसं ही जन्मजातच अति संवेदनशील असतात त्यामुळे कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाताना त्यांच्या भावना तीव्र होतात.
आपल्या माघारी कोणाचे काही थांबत नाही. असलं लाचारीच जीनं जगण्यापेक्षा संपवून टाकावं एकदाचं असं म्हणून संसार सांभाळताना आपणही कधीतरी स्वतःवर वैतागत असतो. अनेक ठिकाणी झालेली घुसमट, गळचेपी यातून मार्ग निघत नाही, त्यावेळी आपणालाही वाटतं काय अर्थ आहे या जीवनाला, पण खरचं मरणं इतक सोप आहे..? क्षणभरापूर्वी आयुष्य संपवावं म्हणून सुरू झालेली आपल्या मनातील प्रश्नांची मालीका मात्र क्षणार्धात मूड बदलते आणि म्हणू लागते, जीवन गाणे गातची राहावे.....?
मी गेल्यावरच माझी कींमत कळेल असं म्हणून आयुष्य संपविण्याचा प्रत्येक व्यक्तीचा हेतू वेगवेगळा असतो, कधी कोणाला दाखवावी लागलेली भीती, कोणावरचा तरी राग, तर कधी कोणाचे लक्ष्य वेधण्यासाठी मदतीच्या आपेक्षेने फोडलेली आर्त किंकाळी! मूलत: माणसाला मरण्यापेक्षा जगण्याचीच हौस अधिक असते. अपयश, अवहेलना, दु:ख हे जर प्रमाणाबाहेर झाले तर माणसं आत्महत्तेकडे वळतात. आपल्याच माणसावरचा राग काही व्यक्ती स्वतःवरच काढतात. ताण-तणावामुळे व्यक्ती स्वतःकडेच ‘नकोसा मी’ म्हणून पहाते, स्वतःलाच दोष देवू लागते. काहीजण आपल्या न्युंगंडाचे खापर इतरांवर फोडण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी त्यांना मरनं किवा मारणं या दोनच गोष्टी कळतात. इतरांना मारणं झेपत नसेल तर त्यांना स्वतःला मारणं सोप वाटतं. नोकरीतले अडथळे, आर्थिक नुकसान, परीक्षेतील अपयश, कौटुंबिक वादविवाद, प्रेमभंग, जोडीदारचा मृत्यू, आजारपण, व्यसन, डिप्रेशन, स्वभाव अशी मृत्युसाठी अनेक कारणं समोर असली तरी यातील प्रत्येक व्यक्तिला खरचं मारायचचं असतं अस नाही. काही व्यक्ती आपल्या आयुष्याशी खेळत असतात. कोणालातरी धडा शिकवायचा किंवा भीती घालायची आहे या हेतूने केलेली आत्महत्या ही आयुष्याचा जुगारच आहे.
आपल्या सभोवताली वेगवेगळी आजारपण घेवून अनेक माणंसं आपणाला भेटतात, तशी स्वतःला संपवू पाहणारी,स्वतःचं आयुष्य स्वतःच संपवणारीही माणंसं असतातच, पण अशा व्यक्तींना ओळखायच कसं हा प्रश्न असतो.अर्थात आत्महत्या ही एका क्षणात होतं असली तरी आत्महतेच्या निर्णयाची प्रक्रिया खूप काळ मनात सुरु असते,आत्महतेचं मळभ घेऊन सर्वत्र फिरणाऱ्या यां व्यक्तीच्या मनात काहीतरी आत्मसंघर्ष सुरू असतो,आपल्या मनातील ही खदखद कोणीतरी जाणून घ्यावी,आपलं कोणीतरी एकावं यां भावनेननं आत्महत्येचा प्रवास सुरू असणारी व्यक्ती आपलं मन मोकळं करण्यासाठी धडपडत असते, पण ज्यांच्या आधाराची खरी गरज असते अशा त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीच त्याच्या आत्तापर्यंतच्या वागण्यामुळे त्यानां दुरावलेल्या असतात. अनेकदा आपण यां व्यक्तीच्या हितापोटी दिलेले सल्लेही त्यांना बोचत असतात,त्यांना पुन्हा पुन्हा एकटेपणाकडे ढकलत असतात, अरे एखाद्या गोष्टीचे काय टेंशन घेतोस? वेड्यासारखं काय करतोस, तू काय म्हातारा झालास का, झटकून टाक मरगळ आणि लाग जोमानं कामाला, आणि हे असं पोरीसारखं रडत काय बसतोस असे आपणही अनेकदा आपल्याकडे मन मोकळे करणाऱ्या माणसांना फुकटचे सल्ले देतो, आपल्या अशा बोलण्यानं अशा व्यक्तींची तगमग कमी होण्याऐवजी ती अधिकच वाढत जाते, आपण कुचकामी आहोत, हा अगदीच किरकोळ प्रॉब्लेम आहे, मीच टेंशन घेतलयं म्हणजे मीच नालायक आहे. असे विचार त्याच्या मनात पक्के होत जातात.खरं तर चांगलं ऐकता येण ही एक मोठी कला आहे. दु:ख हलक करणाऱ्या माणसाचं साहनुभूतीपूर्वक सहनशीलतेन ऐकून घेण, तो सांगत असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणं, आधार देणं, त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी गॉसिपिंग न करता पुढाकार घेणं हाही एखाद्या व्यक्तीला आत्महत्येपासून दूर जाण्याच्या उपायचाच एक भाग आहे.
आत्महत्या करणं हे भ्याडपणाचं, कुमकवत मनाच लक्षण मानलं जातं, घरी कोणी आत्महत्या केली तर हे अखंड घर लाजिरवाने जीवन जगते, म्हणूनच आत्महत्याच विचार करणं ही एक मानसिक अस्वस्थ्याची अवस्था आहे,भारतात NCRB (National Crime Records Bureau) ने २०२२ पर्यंत प्रकाशित केलेल्या आकडेवारी नुसार 1,70,924 इतक्या आत्महत्यांच्या झाल्याची नोंद केली आहे, २०२१ च्या तुलनेत आज सुमारे ४.२ टक्क्यानी वाढ झाली आहे, एकूण घटनामध्ये महाराष्ट्रात २०२२ मध्ये एकूण २२,७४६ आत्महत्यांच्या घटना नोंदवल्या गेल्या ही गंभीर बाब आहे, त्यातही शैक्षणिक स्पर्धा, पालकांच्या अपेक्षा, संवास्कांचा प्रभाव, प्रेम,आकर्षण,आर्थिक, कौटुंबिक प्रश्न अशा अनेक गोष्टीच्या निमित्तानं १८ ते ३० या वयोगटातील तरुणांच्या आत्महत्त्येचे प्रमाण सर्वाधिक आहे, यातच आता सर्वत्र शालेय विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची भर पडते आहे,आत्महत्येचे विचार आपल्या मनात घोळत राहणारा माणूस ओळखता यायला हवा. जसं आपलं शरीर आजारी असतं तसं तसं मनही आजारी असू शकतं म्हणून आजच्या धावपळीच्या जीवनात आपणही सावध व्हायला हवं,आज त्यांच्या डोक्यात गोंधळ घालणारे आत्महत्येचे लाजिरवाणे विचार कधीतरी आपल्याही डोक्यात पिंगा घालू शकतात, म्हणूनचं आपल्या सभोवतालच्या अशा आत्महत्या प्रवण व्यक्तींचा शोध घेऊ यां,त्यांच्या आणि आपल्याही मनात साठलेला चुकीच्या विचारांचा कचरा काढून टाकू या,आपल्या आत्महत्या करावीशी वाटण्याची कारणं शोधू यां, स्वतःला नकारात्मक विचारापासून दूर ठेवू यां, आपण स्वतः भावनिक साक्षर होऊ यां आणि आपल्या कुटुंबाला भावनिक साक्षर करू यां,आपल्या मनातील न्यूनगंड, इतरांबद्दलचा राग, द्वेष, तिरस्कार जाणीवपूर्वक कमी करू यां, अनेक कारनांनी तयार होणारा अपराधीभाव काढून टाकू यां, सारं संपलं आहे असं म्हणताना आपल्या मदतीला नक्कीच कोणीतरी धावून येऊ शकतं असा विश्वास ठेवू यां, मला कोणाचा आधार वाटतो, मला चांगलं कोण समजून घेतं हे ओळखून अशा व्यक्तींच्या संपर्कात रहा, नेहमीच नकारात्मक घंटा वाजवीत राहण्यापेक्षा आपल्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टींची, वर्तनाची नोंद आपणच ठेवा, आपल्या भावनांना नाकारू नका, स्वतःला जसं आहोत तसं स्वीकारा, आपल्या सभोवताली रोज घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्यायला शिका,निरोगी, निरहेतूक जीवनशैली अंगीकार करूया, सकस आरोग्यदायी आहार, प्राणायाम, झोप यासोबतच स्वतः स्वतःची मैत्री करूया आणि जीवनाचे नवे गीत गाऊ या.
Send a message to learn more