08/01/2025
*दूध भाग-१*
*दूध.....*
जन्मल्यानंतरचं पहिलं अमृत जे पाजण्यासाठी आई व पिण्यासाठी बाळ आसुसलेले असते... दोघांमध्येही उत्कटता.... प्रचंड ओढ... अत्युच्च प्रेम....व ते प्रेम आजन्म टिकते....
*"दूध दूध दूध दूध दूध है वंडरफुल…।*
*पी सकते हैं रोज ग्लास फुल॥* असे एक दुग्धप्रशंसापर गाणे आपल्याला लगेच आठवते.
*शुध्द (फक्त)दूधाचे गुण*-हे गोड, स्निग्ध ,ओज वाढवणारे,शरीरातील धातुंची(रस, रक्त ,मांस,मेद,अस्थि, मज्जा, शुक्र) वाढवणारे, वातदोष पित्त दोष वाढला असल्यास कमी करणारे पचायला जड व थंड असते,पोट साफ करणारे, सद्य शुक्र कर (लगेच शुक्र धातु निर्माण करणारे), आयुष्यस्थापक,आयुष्यसंधानकर, निरोगी आयुष्य देणारे आहे.
हे बालक, वृध्द,जखमी,भुकेलेले,क्षीण(कमी ताकद झालेले),अति मैथुनाने थकलेले यांना हितकर असते.
दूध हे पुष्टी करणारे,बृंहण करणारे(वजन वाढवणारे),वृष्य(पौरूषत्व) वाढवणारे,मेद्य(बुध्दीवर्धक),बल्य,मनाला प्रसन्नता देणारे,जीवनीय,श्रमहर, श्वास,कास नाशक,रक्त पित्ताचे आजार नाहीसे करणारे,अस्थिसंधानकर,जखमा भरणारे, सर्व प्रकुपित दोषांचे शमन करणारे,भुक वाढवणारे, पचनशक्ती वाढवणारे,अशक्त व्यक्तीत ताकद देणारे, क्षत(हानी) दुर करणारे असल्याने असे नैसर्गिक उत्कृष्ट गुण केवळ दूध घेतले तर मिळतात.
*दूध हे जीवनीय म्हणून श्रेष्ठ आहे.सकाळी उपाशीपोटी दूध व तुप एकत्र घेणे श्रेष्ठ रसायन (रोगप्रतिकारक शक्ती व वर्ण,ताकद, पुष्टी,आयुष्य वाढवणारे) आहे.*
दुधाला पूर्ण अन्न असे म्हटले जाते म्हणजेच दूध हे एकटेच घेतले तरी शरीराचे पूर्ण पोषण करू शकते त्यामुळे ते कशा सोबतही घेतले नाही तरी चालू शकते दुसऱ्या कोणत्याही पदार्थासोबत दूध घेतल्यास दूध त्या पदार्थातील खारट आंबट तिखट अशा चवीमुळे खराब होऊ शकते म्हणजेच नासू शकते व नसलेले पदार्थ आपण खाल्ले तर आपले शरीर घटक देखील त्याच पद्धतीने तयार होतील म्हणून दूध हे फक्त दुधच घ्यावे.
*वयाच्या अवस्था व दुध*
बाळाची पहिल्या 6 महिने ही क्षीराद अवस्था असते....व पुढचे 6 महिने क्षीरान्नाद अवस्था असते व १ वर्षांनंतर अन्नाद अवस्था असते.
*क्षीराद अवस्था-* या अवस्थेत फक्त दुध हेच अन्न म्हणून त्या बाळाला द्यावे असे आयुर्वेदात सांगितले आहे.
*क्षीरान्नाद अवस्था-* या अवस्थेत दुध व अन्न (पातळ,मऊ अन्न) हे बाळाला द्यावे
*अन्नाद अवस्था-* या अवस्थेत आयुष्यभर फक्त अन्न खाल्ले दुध नाही घेतले तरी चालेल अशी ही अवस्था असते.
मनुष्यालाच नाहीतर सर्व प्राण्यांना दुध हे आजन्म सात्म्य असते... त्यामुळे आयुष्य भर दुध पिले तरी चालते....पण इतर प्राणी लहान असतानाच फक्त दुध पितात नंतर फक्त अन्नच खातात.... आपल्या माहितीतले गाईचं वासरू,म्हशीचं रेडकू,कुत्र्याचं पिल्लू थोडेच दिवस पिते...व मनुष्य बुध्दीमान प्राणी असल्याने तो युक्तिपूर्वक आयुष्यभर दुध पितो किंवा दुधाचे पदार्थ खातो...
पण ते दुध *कोणत्या आजारात /कधी कोणत्या प्राण्याचे दुध पिले पाहिजे?*
*नेहमी प्यायचे झाल्यास कोणते दुध प्यावे?*
*कोणत्या आजारात फक्त दुधावरंच ( दुध सोडून इतर कोणताही आहार न घेता) रहायला हवे?*
*दुधाचे शरीराला काय फायदे होतात?*
*दुध शरीरावर कसे परिणाम करते*
या सर्व गोष्टी आपण पुढील लेखात पाहणार आहोत....
*वैद्य गजेंद्र पवार,*
*आयुर्मंत्र आयुर्वेद व पंचकर्म हॉस्पिटल,*
*कॉटेज हॉस्पिटल समोर,*
*मोरया सोनोग्राफी सेंटर शेजारी,*
*स्टेशन रोड,*
*कऱ्हाड.*
*मो.नं.-9822129052*