24/01/2020
Millennial
A person reaching young adulthood in the early 21st century.
मिलेनिअल्सनी १९९० ते आजपर्यंत बरेच होताना पहिले आणि अनुभवले . हे बदल विविध पातळ्यांवर झाले सामाजिक ,आर्थिक आणि सांस्कृतिक सुद्धा ! ह्याच काळात उच्च मध्यमवर्गाने हळूहळू अमेरिकन संस्कृती आणि राहणी आत्मसात केली. आपलं कॉर्पोरेट जगही पूर्णपणे अमेरिकन धर्तीचं कसं झालं ,आपली ऑफिसेसही कशी त्यांच्यासारखीच झाली, इतकंच नव्हे तर आपलं खाणंपिणं ,वागणं , बोलणं आणि उच्चार हेही कसे बदलत गेले आणि आपण अमेरिकन कसे होत गेलो हे मिलेनिअल्सनी जवळून अनुभवलं .
पण या सगळ्या बदलांची किंमतही मिलेनिअल्स मोजत आहेत. जागतिकीकरणाचे वारे त्याच्याबरोबर नैराश्य आणि चिंताग्रस्तता यासारखे आजार सुद्धा घेऊन आले . मिलेनिअल्सचा कल IT क्षेत्राकडे जास्त आहे. IT मध्ये नैराश्य आणि चिंताग्रस्तता असणारे किती मिलेनिअल्स असतील ह्याचा विचार करणे गरजेचं आहे. एकीकडे जिम संस्कृती वाढतेय तर दुसरीकडे तरुणांमध्ये स्थूलता आणि लठ्ठपणा वाढत चालला आहे. पण सतत पिझ्झा ,बर्गर ,फास्ट फूड खाणं एवढंच लठ्ठपणाचं कारण नव्हतं , तर त्यामागे नैराश्यही दडलं आहे . आजकाल तरुणांमध्ये रक्तदाब ,मधुमेह , हृदयविकार यांचंही प्रमाण वाढलं आहे जे पूर्वी ५०-६० वयोगटात होत असत . हे फक्त कामाच्या विचित्र वेळेमुळेच नाही तर त्यामागे चिंता ,ताण ह्या गोष्टीपण कारणीभूत आहेत.चिंता आणि नैराश्य सोडून घटस्फोट , गृहकलह , आत्महत्या , लैंगिक प्रश्न यांचं प्रमाण वाढलं आहे.
अभ्यास आणि स्पर्धा ह्यांच्या ओझ्याखाली लाखो विद्यार्थी कोलमडताना दिसतात , कित्येक विध्यार्थी निराश आणि चिंताग्रस्त होत आहेत. कित्येक विद्यार्थी आत्महत्याही लागलेत .आणि एवढं करून जरी शिक्षण पूर्ण झालं,तरी सगळ्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. एकीकडे काही वर्गातील लोकांची सुबत्ता वाढत चालली असताना बहुतांश लोकांची त्यात प्रगतीच होत नाहीये . बेकारी आणि विषमता वाढत चालली आहे. कामाचे तास वाढले ,कामात तोचतोचपणा वाढला आणि नोकरीतील अस्थिरतापण वाढली . काँट्रॅक्टवर असणारे कर्मचारी वाढत आहेत. भारतात असुरक्षित आणि असंघटित कमर्चाऱ्यांचे प्रमाण ९०% आहे.
ह्या सगळ्याचा नैराश्य ,चिंता ,आत्महत्या ,शारीरिक विकार अशा अनेकांशी संबंध नक्कीच आहे. पण मनोविकारांच्या कोणत्याच चर्चेत या सगळ्या सामाजिक ,आर्थिक बाबींवर चर्चा होताना दिसत नाही. मनोरुग्णांच्या मनोविकारासाठी ते स्वतः किंवा फार तर त्यांचं कुटुंब ह्यांना जबाबदार धरलं जात . हे समाजातल्या वाढत्या व्यक्तिवादाचं टोकच आहे. डॉक्टर्स , थेरपिस्ट हे फक्त वैयक्तिक औषध आणि थेरपी देतात . चित्र फारसं बदललेलं नाहीये. मानसोपचारतज्ञ एकटे हि सामाजिक परिस्थिती बदलू शकत नाहीत. विचारवंतांनी आणि सामाजिक लोकांनी या मनोविकारांच्या मागची सामाजिक - आर्थिक कारणे शोधून हि परिस्थिती बदलण्यावर चर्चा करायला हवी, पण तसे होताना काही दिसत नाही.