11/04/2024
आज (११ एप्रिल) रमजान ईद...
रमजान ईद हा मुस्लीम धर्मींयांचा सर्वांत मोठा सण... या दिवसाला 'ईद-उल-फित्र' असेही म्हणतात. फित्र म्हणजे दान करणे. म्हणूनच रमजान ईदच्या दिवशी अन्नाच्या रुपात दान केले जाते. इस्लामिक कॅलेंडरमध्ये 12 महिने आहेत. ते लुनार कॅलेंडरप्रमाणे चालतं. त्यामध्ये रमजान हा नववा महिना आहे. हजरत मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे संस्थापक होते. ह्याच महिन्यात त्यांना त्यांच्या अखंड साधनेचे, खडतर तपश्चर्येंचे फळ म्हणून ‘अल्लाह’चे दर्शन झाले.
रमजान म्हणजे 'बरकती' आणि ईद म्हणजे 'आनंद'. मनामनातील दरी कमी करुन परस्परांमध्ये स्नेहभाव वाढविणारा हा महिना आहे. भूतकाळातील तक्रारी आणि पापे विसरून नवीन सुरुवात करण्याचा हा दिवस असतो. मुस्लिमांची मुख्य पाच कर्तव्ये आहेत. त्यापैकी एक म्हणजे रमजान महिन्यात दररोज उपवास करणे. या महिन्यात मुस्लीम बांधव सूर्यास्तानंतर काहीही खात किंवा पीत नाहीत. तंबाखू किंवा अल्कोहोलचे सेवन वर्ज्य आणि पाप मानले जाते. आजारी, प्रवासी, गर्भवती स्त्रिया, छोट्या मुला-मुलींना उपवासापासून सूट आहे. रमजान ईद शव्वाल महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते. या वेळी मिठाई आणि शीरखुर्मा आवर्जून दिला जातो.
एकमेकांतील बंधुतेची भावना दृढ करण्याचा, माणुसकी जपण्याचा संदेश देणाऱ्या ‘रमजान ईद’निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...