22/09/2025
आज (आश्विन शु. १ – २२ सप्टेंबर) घटस्थापना – शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ..
आपल्या हिंदू संस्कृतीत आश्विन शुक्ल प्रतिपदे दिवशी सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवास प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. नऊ रात्री आणि दहा दिवस या कालावधीत आदिशक्तीची उपासना केली जाते. शरद ऋतूच्या सुरुवातीच्या काळात हे नवरात्र येत असल्याने याला ‘शारदीय नवरात्र’ असे म्हटले जाते. हा दैवी स्त्रीत्वाच्या सन्मानार्थ साजरा होणारा उत्सव आहे. आज घटस्थापना... नवरात्रोत्सवास आजपासून प्रारंभ होत आहे.
आजच्या दिवशी घटामध्ये देवीची स्थापना करून, अखंड नंदादीप प्रज्वलित केला जातो. या उत्सवात देवीच्या शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्रि, महागौरी आणि सिद्धिदात्री अशा नऊ रूपांची पूजाअर्चा व व्रत-उपवास करून आराधना केली जाते. आदिशक्तीच्या उपासनेमुळे सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते आणि सुख-समृद्धी लाभते, अशी श्रद्धा आहे. आपल्या महाराष्ट्रात कोल्हापूर (श्री अंबाबाई), तुळजापूर (श्री तुळजाभवानी), माहूरगड (श्री रेणुकामाता) आणि वणी, नाशिक (श्री सप्तशृंगी) ही देवीमातेची साडेतीन शक्तिपीठे आहेत.
नवरात्रोत्सवाच्या काळात या ठिकाणी जाऊन देवीचे दर्शन घेणे पवित्र मानले जाते.
या उत्सवानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...
सर्वांवर देविमातेची कृपा राहो...
#नवरात्रोत्सव #घटस्थापना #आराधना #वंदन #शुभेच्छा