21/09/2021
परतीचा प्रवास
मित्रांनो नमस्कार,
गेले अनेक दिवस कोरोना या महामारीमुळे संपूर्ण जगाला ग्रासले आहे, त्रासलेले आहे. कोरोना हा साधा सर्दी, पडसे, ताप यासारखा साधा सरळ दिसणारा आजार जरी असला तरी तो तितका साधा सरळ निश्चितच नाही. तो चकवा देणारा, फुफ्फुसातील रक्तवाहिन्या चोकअप करणारा थोडा भयंकरच आजार आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन सोडून देण्याइतपत तर नक्कीच नाही. गेल्या दोन वर्षात मी स्वतः मेडिकलच्या माध्यमातून समाजात वावरताना बरीच काळजी घेतली आणि जरूर तितकी काळजी घेतच जगत होतो, पण प्रथम साधा ताप आला असे समजून प्राथमिक उपचार पद्धतीने औषध पाणी सुरू केले. यामध्ये बऱ्याच लोकांनी टेस्ट करण्याचा सल्ला दिला, पण दुर्लक्ष करून पुढे जाण्याची मानवी प्रवृत्ती आमच्या शरीराला चिकटलेली होती. मला काय होतंय? मला कुठे काय झालेय? अशा अविर्भावात होतो, पण शेवटी ताप कमी येईना म्हणून टेस्ट केली आणि व्हायचे तेच झाले. माझ्या तोंडाची चव गेलीली, कोणताही वास येत नव्हता. अशा वेळी माझ्या पत्नीने मला धीर दिला आणि पहिल्यांदा कोरोना टेस्ट करून घेण्यास भाग पाडले. स्वतः माझी पत्नी न भिता माझ्या मागे ठामपणे उभी राहिली. माझे मित्र डॉक्टर कळंबेकर यांनीही मला अतिशय निर्धास्तपणे साथ दिली, सोबत माझ्या मेडिकलचा स्टाफ अगदी सैनिकांसारखा प्रत्येक ठिकाणी हजर होता.
विशेषतः बऱ्यापैकी वेगवेगळी ठिकाणे सुचवली जात होतीत, ती कुठे कोरोना केअर सेंटर तर कुठे अमुक एक डॉक्टर तीन दिवसात तुम्हाला बरे करून देतील वगैरे वगैरे... पण मित्रांनो अशावेळी गडबडून न जाता चांगल्या एमडी डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा, जेणेकरून आपणांस बीपी, डायबिटीस किंवा अन्य कोणत्याही आजाराने तुम्ही त्रस्त असाल तर ते अत्यंत महत्त्वाचे असते. बाब थोडी खर्चिक असते याबद्दल दुमत नाही पण आयुष्य महत्त्वाचे आहे पैसा नाही हे इथे प्रथम लक्षात ठेवायचे. "सिर सलामत तो पगडी पचास" ऑक्सिजन, वेंटिलेटर या सोई उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे आणि अशावेळी आवश्यक अशा या दोन गोष्टी आहेत. काहीजणांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत नाही पण बहुतांश वेळा पेशंटला किमानपक्षी ऑक्सिजन आवश्यकच राहतो. व्हेंटिलेटर हा नंतरचा भाग आहे पण अतिशय महत्त्वाचा घटक आहे.
आमचे ठरले शेवटी डॉ. संदीप श्रावस्ती यांच्याकडे ॲडमिशन करायचे संपूर्ण सोयीसुविधा उपलब्ध असल्याची खात्री करून घेतली आणि ऍडमिट झालो. आत मध्ये पाऊल ठेवताच समोर पेशंटच्या अवस्था बघून मनात धस्स झाले, काळ प्रत्येक बेडच्या कडेला घोंगावत होता. कोण व्हेंटिलेटरवर तर कोणी ऑक्सिजनच्या कांड्या नाकात घालून अत्यवस्थ अवस्थेत डॉक्टर नावाच्या पांडुरंगाकडे आपले अस्तित्व गहाण ठेवून अक्षरशः लीन झाला होता.
मला खूपच भीती वाटत होती त्यातही एखाद्याला खोकल्याची उबळ आली आणि कुठल्या नरकात येऊन पोहोचलो आहे असे वाटायला लागले. मनात भीतीचे काहूर माजले होते, त्यातच एक पंचविशीतील कंपाउंडर आला आणि त्याने हे तुमची बेड आहे इथे झोपा म्हणून सांगितले. अंगात ताप होताच, घशाला भितीने आणखीन कोरड पडलेली आणि कंपाऊंडरच्या हातातील औषधांची बॅग बघून, आता आपण जगून परत जाऊ अशी तीळमात्र शक्यता नव्हती. पाठीमागे वळून बघुया म्हटलं तरी सोबत आलेले सर्व जण बाहेर होते. येताना मुलांनाही भेटता आलेले नव्हते, वृद्ध आई वडिलांना सांगून त्यांना काळजीत टाकायला नको म्हणून त्यांना भेटलो ही नव्हतो. भरोसा मात्र पत्नीवर, आता तीच काय ती शेवटची आशा होती. ना कुठल्या जवळच्या या नातलगांना याची कल्पना होती आणि असलीच तरी या आजाराबाबत नात्यांची एक एक जागतिक ओळख सर्वांना माहीत होती, म्हणून डॉक्टर श्रावस्ती सरांच्या वर विश्वास ठेवून एकदा त्या बेडच्या स्वाधीन झालोच. डॉक्टरांनी दिलेली सर्वच ट्रीटमेंट त्यांचे असिस्टंट डॉक्टर्स, कंपाउंडर अतिशय योग्य पद्धतीने हाताळत होते. शेवटी या रोगावर खबरदारी म्हणून ज्या इंजेक्शनचे नाव लोकांच्या मनावर अधिराज्य करत होते, ते इंजेक्शन एकदा आय व्ही मधून 200 मिली दिलेच... त्याचे नाव "रेमडिसिव्हर". कितीतरी शंका होत्या या इंजेक्शन बद्दल पण पंधराव्या मिनिटाला मला फरक पडायला सुरुवात झाली आणि मग कुठे जीवात जीव आला. या इंजेक्शनच्या सोबत लागणारी पोटात द्यावी लागणारी औषधे, काही स्टेरॉइड औषधे गरजेनुसार दिली गेली आणि मग माझा, कोरोनाचा परतीचा प्रवास सुरू झाला. आता मला अजिबात काळजी वाटत नव्हती ना भीती वाटत होती.
यापुढील वाटचाल ही संपूर्णपणे डॉक्टरांच्या कष्टाचा, ज्ञानाचा आणि त्यांच्या गुडवीलचा भाग असतो. त्यामध्ये आपणास जरी त्याबद्दल माहिती असेल तरीही ते लिहिणे योग्य ठरणार नाही कारण औषधे, डॉक्टर आणि शास्त्र या तज्ञांनी आपले काम एकमेकांच्या विचाराने करावे. पेशंटला समोर ठेवून यावर उपाय आणि अपाय यावर सुद्धा बोलणे उचित ठरणार नाही. माझा फक्त सांगण्याचा मतितार्थ असा होता की, एकदा का तुम्ही डॉक्टरांच्या स्वाधीन झाला तर मग मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवूनच प्रवास करावा लागतो. काही बारीकसारीक गोष्टीवरून आपले खटके उडू शकतात पण संयमाने असे प्रश्न सुटतात आणि कोणतेही मुख्य डॉक्टर आपल्या पेशंटला त्रास होईल असे वागत नाहीत. नर्सिंग स्टाफ आणि इतरांच्या बाबत आपण थोडीफार तक्रार करत असतोच, मानवी स्वभावाप्रमाणे.
असो, अशा सात ते आठ दिवसात श्रावस्ती सरांच्या टीमने माझ्यावर केलेल्या उपचाराने मी अगदी ठणठणीत झालो आहे. सरांचा बिनधास्त स्वभाव मनाला उभारी देण्यासाठी पुरेसा आहे. पैशाची कटकट कधीच पाठीमागे लागू दिली नाही. एकदाच ऍडव्हान्स भरून घेतला होता आणि आपल्या ठरलेल्या व्यवहारा प्रमाणे (सरकारी नियमानुसार) आपण ही ते व्यवहार सांभाळत पुढे गेले पाहिजे असे मला वाटते. सर्वांचे मनापासून आभार ज्यांनी ज्यांनी फोनवरून, प्रत्यक्ष भेटून माझ्या आजारपणातून सावरण्यासाठी शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिले त्या सर्वच ठिकाणी कर माझे जुळती !!!
श्री. महादेव चौगले
प्रमोद आयुर्वेदिक एजेंसी
४४१/२ डी, पडळकर मार्केट समोर,
गंगावेश रंकाळा स्टँड रोड, कोल्हापूर.
मो. नं - ९७६३३०१२१६
दिनांक : ३०/०८/२०२१