22/04/2022
*वृद्धावस्थेसाठी आयुर्वेद*
*समस्या वृद्धांच्या*
भाग-११
जगभर वृद्धांची संख्या मोठ्या प्रमाणांत वाढत आहे. ही संख्या देश,प्रदेश,तेथील वातावरण,आहार इ.नुसार वेगवेगळी आहे.
जगात २०००साली ६० वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीची संख्या ४० कोटी होती.ही संख्या २०२५ मध्ये १२०कोटी तर २०५० मध्ये २०० कोटी होईल असा अंदाज आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या जन्मकालीन अनुमानित आयुदर्शक सारणी नुसार -
२०१६ मध्ये ६० ते ६४ या वयातील लोकांच्या संख्येत ३.१ टक्के नी वाढ होईल,६५ ते ६९ मध्ये २.३ टक्के,७० ते ७४ मध्ये १.४ टक्के,७५ ते ७९ मध्ये ० .८ टक्के ८० वर्षापुढील वयात० .७ टक्के वाढ होईल. एकूण ६० वर्षापुढील लोकांमध्ये ही वाढ ८.३ टक्के होईल.
प्रत्यक्षात ही वाढ आता या पेक्षा अधिक झाली असेल.
भारतात वृद्ध नागरिकांची संख्या साधारणतः साडे अकरा कोटी च्या जवळपास आहे.यात वृद्ध महिलांची संख्या ५३ टक्क्यांपर्यंत तर वृद्ध पुरुषांची संख्या ४७ टक्के इतकी आहे.
वाढलेल्या आरोग्य सुविधा,वेगवेगळ्या आजारांना रोखण्यासाठी केलेली उपाय योजना, आरोग्याबाबत झालेली जनजागृती, विविध संसर्गजन्य आजारांवर मिळवलेले नियंत्रण,सुधारलेले राहणीमान, एकूणच मृत्यू संख्येत झालेली घट इ.कारणांनी वृद्धांची संख्या वाढली व वाढणार आहे.
जगभर सर्वत्र वृद्ध व्यक्तींच्या वाढत जाणाऱ्या संख्येमुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.त्यांचे परिस्थिती नुसार स्वरूप ही गंभीर होत चालले आहे.ही जागतिक समस्या बनत चालल्याने या समस्येवर जगभर मंथन सुरू आहे. लोकसंख्या कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या एक किंवा दोन या नाऱ्यामुळे वृद्धांची संख्या वाढून विविध समस्या समोर येत आहेत.
आपणाला आठवतच असेल की, काही वर्षांपूर्वी चीन देशाने एका पेक्षा अधिक मुलांना जन्म देण्यास बंदी घातली होती.
परिणामी पुढे काही वर्षांनी चीन मध्ये वृद्धांची संख्या जास्त व तरुणांची संख्या कमी झाली.या कारणाने चीन मध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या.थोडक्यात उत्पादन करणारे कमी झाले व अनुत्पादक जास्त झाले.परिणामी आता चीन ने हा निर्णय फिरवून एका पेक्षा अधिक मुले जन्मास घालण्यास परवानगी दिली आहे.
व त्यासाठी प्रोत्साहन ही देत आहे.
सामान्यतः वृद्ध व्यक्तीचे कुटुंबातील,समाजातील स्थान हे उत्पादकतेतील त्याच्या क्रियाशील सहभागावर व उपयोगीतेवर अवलंबून असते.
बहुतांशी वृद्ध व्यक्ती या शरीर व मना ने खचत असल्याने, त्या फारशा क्रियाशील नसल्याने नवनिर्मिती करण्यास असमर्थ असल्याने परिणामी कौटुंबिक ,
सामाजिक,आर्थिक, मानसिक इ.प्रकारच्या अनेक समस्या निर्माण होतात. या समस्या ही स्त्री- पुरुषा नुसार थोड्या वेगळ्या आहेत/असतात. कारण सामान्यतः स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक वर्षे जगतात. कोरोना काळात ही आपण पाहिले की,त्या काळात स्त्रियांपेक्षा पुरुषांचे अधिक बळी गेलेत.का?ते पुढे पाहू. तसेच या समस्या शहरी व ग्रामीण भागातील वृद्धांच्याही वेगवेगळ्या असतात. परिस्थिती नुसार समस्येत वाढ होते.
काही वर्षांपूर्वी "टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई" या संस्थेने पाहणी करून वृद्धांना भेडसावणाऱ्या साधारण समस्यांचा अहवाल सादर केला होता. समस्या पुढीलप्रमाणे--
१) आर्थिक समस्या --४०.८० टक्के.
२)मोकळा वेळ कसा घालवावा--२७.३५ टक्के.
३)कौटुंबिक व पुढचे आयुष्य कसे घालवावे?---१०.८८टक्के
४)आरोग्य व वैद्यकीय समस्या--१०.२९ टक्के.
५)एकटेपणा व अवलंबून राहण्याची समस्या--७.०६ टक्के.
६)राहायला जागा मिळवण्या ची समस्या--३.५२ टक्के.
आता या समस्या वाढल्या असून दिवसेंदिवस त्या वाढतच जाणार आहेत.
आत या समस्या दूर करण्यासाठी सरकार,अनेक सामाजिक संघटना आपआपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. परंतु या सर्व समस्या दूर करण्यासाठी कुटुंबा पासून सुरुवात होऊन त्याला अनेकांचा
(सरकार,सामाजिक संस्था इ.चा) हातभार लागणे आवश्यक आहे.
पुढील काही लेखांत विचार करू या समस्यांचा.
*डॉ. अंकुश जाधव*
लेखक, आयुष मंत्रालयाचे सेवानिवृत्त सहायक संचालक आहेत.
नवी मुंबई,इस्लामपूर (सांगली)