20/01/2022
“डाॅक्टर, मी दिवसभर अंग मोडेपरंत काम करतो. मी शेतकरी आहे. तरी मला झोप कशी येत नाही?”
हा प्रश्नच खरं तर चक्रावून टाकणारा आहे. एक समज असा आहे, की खूप कष्ट केले, मन स्वच्छ असेल, प्रामाणिक प्रयत्न असतील, तर अगदी फूटपाथवर देखील झोप येते. भुकेला कोंडा निजेला धोंडा या म्हणी किंवा इंग्लिश मध्ये “How will you sleep tonight after what you have done today?” असे वाक्यप्रयोग अशांनी एक मतप्रवाह असा निर्माण झाला आहे की काही ठराविक गोष्टी केल्या की झोप ही आलीच!
या सगळ्यामुळे ज्यांना निद्रानाश झालेला असतो त्यांची फारच पंचाईत होते. सर्वात आधी तर “अशी कशी झोप येत नाही तुला?” या प्रश्नाला उत्तर द्यावं लागतं. आता हा प्रश्नच मुळात उत्तर मिळवण्यासाठी नसून “टुकटुक” करणासाठी असतो. त्यातून एखाद्याने याकडे दुर्लक्ष केलंच, तर “झोपच येत नाहीये ना, अमुक अमुक बघ, फक्त ४ तास झोपतात” हा बाऊन्सर येतो. याशिवाय “दिवसभर काम करतोस ना?” किंवा “कामावर झोपत असशील” असे wrong ones पडतंच असतात. एवढं सगळं झाल्यावर सुद्धा झोप ही तशी आराम, निवांतपणा, चैन याच्याशी जोडलेली गोष्ट, त्यामुळे आजारी माणसाला जी सहानुभूती एरवी मिळते तिचाही इथे मागमूस नसतो.
याचं उत्तर असं, की झोप हे तुमच्या शरीराचं एक काम आहे. Nothing more, nothing less. झोप तुमच्यासाठी बनवलेली नाही. तुम्हाला निवांतपणा मिळणे हे झोपेचं byproduct आहे, बोनस म्हणा फारतर. घरात जसं मुलांना बाहेर पिटाळल्यावर दिवाळीचा फराळ बनवतात, तसंच माणसाची मेंदूच्या महत्वाच्या कामात लुडबूड नको म्हणून त्याला झोप येते. तुम्ही झोपत नाही, तुम्हाला झोप येते.
तुम्हाला हवी असो अथवा नसो, झोपेच्या वेळेस झोप येतेच. अगदी तुम्ही ठरवून रात्र जागवलीत, तरी दुसर्या दिवशी व रात्री तुम्ही हे ठरवूनही करू शकणार नाही. झोपू न देणे हे टाॅर्चर करण्याचं एक तंत्र आहे, ते यामुळेच.
हे सांगितल्यावर बहुतेक जण उडतात. झोप माझ्यासाठी नाही? काही तरी काय, कसं शक्य आहे, ही प्रतिक्रिया देतात. पण त्यात त्यांची चूक नाही. मी जेवतो, मी पाणी पितो याप्रमाणेच आपण मी झोपतो असं म्हणत असतो. प्रत्यक्षात आपल्याला झोप आलेली असते, आपण आणलेली नसते. भूक लागली तरी अन्नाशिवाय माणूस राहू शकतो, पण आलेली झोप परतवणे हे अशक्यप्राय काम आहे हे त्यामुळेच.
यावर मी असं सांगतो, की हे झोपेचा असा No Nonsense attitude असल्याने, तुम्ही कोण, काय काम करता, किती चांगले वागता, याने झोपेला काहीही फरक पडत नाही. झोप ही तुमचं आरोग्य, मानसिक स्थिती, शरीरचक्र व जीवनशैली या चारच गोष्टींवर अवलंबून असते.
मग प्रश्न येतो, “पण डाॅक्टर, आमचं इतकं काम असतं, मग तर व्यायाम होतो, तरी झोप का येत नाही?” तर होतं असं, की लोक exercise व exertion मध्ये गल्लत करतात. व्यायाम व कष्ट यात एकच मोठा फरक आहे, तो म्हणजे व्यायाम करतानाची मानसिक अवस्था उत्साहाची, उर्जेची व आपल्या टार्गेटच्या दिशेने होणार्या प्रयत्नांची असते. व्यायाम तुम्ही तुमच्या इच्छेने, तुमच्या वेळात व तुमच्या अटींवर करत असता. व्यायामाची जागा, वातावरण व उपकरणं आरामदायक असतात, या गोष्टी कष्ट व परिश्रमाच्या बाबतीत लागू पडत नाहीत! या सर्व गोष्टीमुळे अनेकदा शरीर व मनाला पुरेशी विश्रांती मिळत नाही, किंवा इतर मानसिक समस्या यांमुळे झोपेच्या समस्या किचकट होत जातात.
झोप ही एक देणगी आहे. आपल्याला झोपेतच काहीही न करता शरीराचे अनेक भाग आयते सर्विसिंग करून मिळतात ही तिची खासियत आहे. झोप ही पूर्ण पूर्वग्रहमुक्त आहे. माणसासारखी ती जजमेंटल नाही. मात्र झोप हा जन्मसिद्ध अधिकार नाही. तिची काळजी घ्यावी लागते. तिला गृहीत धरणे शब्दशः झोप उडवणारे ठरू शकते.