
27/02/2024
*आज (२७ फेब्रुवारी) मराठी भाषा गौरव दिन...*
आज मराठी भाषा गौरव दिन साजरा होत आहे. ‘ज्ञानपीठ’पुरस्कारप्राप्त साहित्यकार, नाटककार, कवी विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांनी मराठीत जागतिक दर्जाचे लेखन केलं. मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या अलौकिक कार्याला अभिवादन करण्याच्या हेतूने कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून २०१३ पासून साजरा केला जातो.
मराठी भाषा ही प्राचीन आणि समृद्ध वारसा लाभलेली भाषा आहे. मराठी भाषेतील साहित्य परंपरा देखील तेवढीच प्रगल्भ आहे. मराठी भाषेने राज्यातच नव्हे तर जगात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. देशात मराठी लोकसंख्या ही तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर जगात मराठी भाषा ही दहाव्या क्रमांकावर येते. मराठी भाषेचा भारतातील २२ अधिकृत भाषांमध्ये समावेश आहे.
राज्य सरकार आणि सामाजिक संघटनांकडून मराठी भाषा जतन आणि संवर्धनाचे कार्य केलं जात आहे. शिक्षण मातृभाषेतून देणे योग्य हे अनेक शिक्षणतज्ज्ञांनी वारंवार सांगितले आहे. त्यानुसार राज्यातील शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करण्यात आला आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन या क्षेत्रातील उच्च शिक्षण इंग्रजीऐवजी मराठीतून देण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे, ही स्वागतार्ह बाब आहे.
मराठी भाषेचा जतन, सन्मान करू या... तिचा लौकिक जगभरात वाढवू या...
थोर साहित्यिक कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...
Conservation_of_Marathi_Language #मराठी #मराठी_भाषा_गौरव_दिन #कुसुमाग्रज #जयंती #अभिवादन