
14/02/2025
राजीव गांधी आरोग्यदायी योजनेंतर्गत पंचकर्म चिकित्सा समाविष्ट करण्यासाठी 'मर्म' शिष्टमंडळाची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी*
कोल्हापूर १४ फेब्रुवारी – महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना पंचकर्म उपचार सहज व सुलभ उपलब्ध करून देण्यासाठी, पंचकर्म चिकित्सा राजीव गांधी आरोग्यदायी योजनेच्या कक्षेत समाविष्ट करावी, अशी मागणी 'मर्म' शिष्टमंडळाने राज्याचे आरोग्यमंत्री मा. ना. श्री. प्रकाशराव आबिटकर यांच्याकडे केली.
या शिष्टमंडळात डॉ. अजित राजिगरे (अध्यक्ष, मर्म), डॉ. प्रसाद सणगर, डॉ. सचिन गणेशवाडी, डॉ. प्रशांत चौगुले आणि डॉ. पराग कुलकर्णी आदी आयुर्वेदिक डॉक्टरांचा समावेश होता.
शिष्टमंडळाने मंत्र्यांसमोर पंचकर्म उपचाराचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, संथिवात, मधुमेह, हृदयविकार, श्वसनविकार, यकृत व मूत्रपिंडाचे आजार, त्वचारोग तसेच कर्करोग यांसारख्या गंभीर व्याधींमध्ये पंचकर्म उपचार अत्यंत प्रभावी ठरत आहे. मात्र, या उपचारांचा खर्च सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा नसल्याने गरजू रुग्णांना त्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे ही चिकित्सा शासनाच्या योजनेंतर्गत आणून मोफत किंवा सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावी, अशी शिफारस करण्यात आली.
शिष्टमंडळाच्या मते, मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मा. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापसिंह जाधव, मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धोरणानुसार आयुर्वेद व निसर्गोपचाराला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात आहे. अशा परिस्थितीत, राज्य शासनाने हा निर्णय घेतल्यास हजारो रुग्णांना प्रत्यक्ष लाभ मिळू शकतो.
आरोग्यमंत्र्यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत, पंचकर्म उपचार समाविष्ट करण्यासंदर्भात तज्ञ समितीकडून अहवाल मागवला जाईल आणि योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.