Rassa mandal

Rassa mandal रस्सा मंडळ boys

29/05/2024

कोल्हापुरची खाद्यसंस्कृती
(३१)

रस्सा मंडळ आणि "खुळा" रस्सा

कोल्हापुरात आल्यानंतर खूप वेळा "रस्सा मंडळ" हा शब्द कानी पडायला लागला. शोध घेऊनही याची सुरुवात कशी आणि केव्हा झाली ते समजू शकलं नाही. पण आमच्या पिढीतल्या बहुतेकांनी विशेषतः पेठ भागात रहाणाऱ्या लोकांनी "रस्सा मंडळ" अनुभवलेलं असतंच.म्हणजे किमान चाळीस पन्नास वर्ष तरी ही प्रथा सुरू असली पाहिजे असा अंदाज करायला हरकत नाही. पण बारकावे काही समजलेच नव्हते.

"रस्सा मंडळ" म्हणजे समवयस्क मित्र मंडळींनी , गल्लीतल्या शेजाऱ्यांनी किंवा कॉलेजच्या सहाध्यायांनी , एकत्र काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी ( अगदी टॉप बॉसपासून शिपायापर्यंत ) एकत्र जमून शिजवलेलं / घरातून / खानावळीतून शिजवून आणलेलं जेवण निसर्गरम्य ठिकाणी एकत्र बसून निवांत हसत खेळत फस्त करण्याचं केलेलं नियोजन.
रस्सा मंडळ करायला निमित्त काय कुठलंही चालतं. म्हशीनं शर्यत जिंकली , म्हणून रस्सा मंडळ करायला लावणारी मित्रमंडळी आहेत भावा इथं.
कधी कुणाचा वाढदिवस असतो , कुणाला नोकरी लागलेली असते , कुणाचे दोनाचे चार हात झालेले असतात , कुणाच्या घरी "पाळणा" हललेला असतो. तर कुणाला प्रमोशन मिळालेलं असतं.त्यानिमित्त तुम्ही हॉटेलमध्ये जंगी पार्टी द्या, घरी शाकाहारी / मांसाहारी जेवणं घाला. हॉल घेऊन जेवणावळ करा, काहीही करा , "रस्सा मंडळ" झाल्याशिवाय "त्रस्त समंध" स्वरूप दोस्त शांत बसत नसतात.
रस्सा मंडळ करायला बरेच दिवस निमित्त मिळत नसलं , तरी "असं नाही तर तसं" कारण हुडकून काढलं जातंच. मग दिवस - जागा फिक्स करुन पैशाची , सामानाची- भांड्यांची जोडणी केली जाते. एखाद्याच्या आई / बायकू / वयनीच्या हातची चव "लैच भारी" म्हणून ख्यातनाम असली, तर त्याच्या गळ्यात सुक्कं किंवा रश्शाची - भाताची जबाबदारी टाकली जाते.चपाती- भाकरी ज्याची त्यानं घरातून आणायची असते. मला काही हे लिखाण जमण्यासारखं वाटत नव्हतं. म्हणून मग कारखान्यातल्या बाळू मुळीकला घेतलं बोलावून आणि त्याला बोलतं केलं. कारण तो पेठेतला रहिवासी आणि त्याची भाषाही एकदम भारी एकदम गावाकडची.( तो दर आठवड्याला गावाकडं जाऊन येतो म्हणूनही असेल.) आता तुम्हीच ऐका त्यानं केलेलं ‌वर्णन त्याच्याच शब्दात......

" अखेर रस्सा मंडळ करायचा एकांदा दिवस फिक्स होतो.कोण " बकरा " न्हाईच घावला , तर T. T. M. M. ( तुझं तू , माझं मी ) म्हणजे थोडक्यात (contribution ) पट्टी - वर्गणी काडत्यात. त्यातही आमच्यातलं येकांदं ब्येणं , भरल्याल्या तेवढ्याच एका मेंबराच्या पट्टीत बारकं पोरगं घिऊन येतंय संगट .जेवायला न्हाई म्हंतय व्हय कोण आपल्या कोल्हापूरात ?

प्रत्यक्ष रस्सा मंडळाचा दिवस उजाडला की , कामावरनं कायबाय कारणं देऊन लवकर घर गाठायचं. आपल्या गळ्यात एखादं घोंगडं अडकवल्यालं आसंल, तर ती वस्तू , नाहीतर शिजवलेला पदार्थ घेऊन निगायचं. आता आतांदी लै खानावळवाले / घरगुती जेवण बनवणाऱ्या ताई - माई देतात तुम्ही नेऊन दिल्यालं मटन बनवून डबं भरुन गरमागरम. संध्याकाळी सगळे जमून ठरलेल्या जाग्याला जायाचं. एकेका गाडीवर तिघांची सर्कस . येखांद्या लिंबू टिंबूला कांदा- टमाटू- लिंबू- कोथमिर असला सटरफटर बाज्यार करायला पाठवायचं.त्यातल्या त्यात जाणकार आसंल, अशांनी डब्बा घेऊन जायाचं , मटनमार्केट मधल्या खाटकाकडनं मटण आणायला.चांगलं मांद्याचं बगून मटन आणायचं.वर थोडी च्यरबीबी टाकाय लावायची त्येला. तर्री येती मग भारी रश्श्यावर. एकदम सोनार - बोटी (बारीक तुकडं ) कराय देयाची न्हाई. मग खातांना मजा न्हाई येत. मोटं मोटं खडं राखाय पायजेत. घरातनं करुन घेयाचं आसंल‌, तर वैनीकडं मालमसाला नेऊन द्यायचा. आपणच शिजवणार आसू , तर वळकीतल्या एकांद्या डंगावरनं ओला मसाला तयारच घेयाचा. बसायला , जाळ करायला फुडारीची रद्दी , रद्दीत गुंडाळलेल्या घरातल्या चपात्या - भाकरी, एखादी भरल्याली घागर , भांडं उचलाय फडकी , सतरंज्या, पत्रावळी न्हैतर आपापली ताट‌वाटी असं समदं आठवून आठवून घ्यायाचं.
या एवढ्या जणात एखादा तरी भारी ज्येवण शिजिवणारा असतोच. त्याला लै भाव चडतो बघा त्या दिवशी.एकदम कॉलर ताठ करून ऑर्डरी सोडतोय.
नदीवर - घाटावर - मैदानावर - गावाभायेरली येकांदी मोक्याची जागा शोधून , जरा फांद्या - पाल्याचा साळुता बनवून , जिमिन झटाकल्यावाणी करायची.इथली धूळ तिकडं आणि तिथली धूळ इथं व्हती. बाकी काय‌ न्हाय. सप्पय जागंला तिन दगडांची चुल मांडायची. गेल्या साली रम्या विटा घिऊन आल्ता बरोबर. आणल्याली घागर पाणी पियाला ठेऊन , नदीच्या पाण्यात सम्दा सैपाक करायचा.सरपणासाठी काट्या कुटक्याचा, वाळल्या सरपणाचा शोध घेयाचा.थोडी रद्दी घालायची चूल ढणाढणा पेटाय पायजेल‌ तर.
कवा येकदा चुलीवर गाडगं / पात्यालं चडतंय , असं झाल्यालं असतं. पण तो एक दिवसाचा आच्यारी की "शेफ" म्हणतेला टाईमपास करत बसतोय. वयनींनी सांगितलंय, " भावजी ,भांडी जाळून आणशीला. मला घासाया तापद्रा करचिला " असं म्हणून पातेल्याला बुड घेतो. ( " बुड " म्हंजी भांड्याच्या भाईरच्या बाजूला माती वल्ली करुन सारवल्यावाणी करायचं, म्हंजी जळत करपत न्हाई त्ये पात्यालं.) त्ये भांडं येकदा चुलीवर चडलं, की आमचा जीवसुदा "भांड्यात" पडतो.

एकीकडं त्यो "गावरान" रन्जीत ब्रार की संजीव कपूर आमाला शानपट्टी शिकविण्याचा ट्राय मारत बसतो. "ये रम्या , पाणी आण" , "ये चंद्या चुलीला
फुक्कर घाल". ये इक्या , कांदं‌ काप. दुसरीकडं
मग गप्पा- गाणी- नकला यांना जोर चढतो. शाळंतल्या बाई - मास्तरांच्या आठवणी निघतात. कुनी कशी "टंगी" लावल्याली मास्तरास्नी , त्याच्या बढाया मारायला चांगला चान्स घावतो बघा. येकांदी पोरगी आवडायची तिचं लग्न ठरल्यावर कुणाचा कसा "देवदास" झाला होता त्याची रडकुंडीला येऊस्तवर
टर उडवायची. एकेक गंमतच.

अशा वेळी मुख्य खानसाम्याची मर्जी सांभाळताना लै सर्कस कराय लागते राव‌. ही मोठी कसरतच असते.काय करणार ? नाविलाज असतो. "पुरणपोळ्या करणारीचा शेंबुडबी पुसाय लागतो राव येकेकदा " म्हण्त्यात‌ ना ? मागची खुन्नस लक्षात ठेवून तो एकेकाला कामाला लावत ऑर्डरी सोडतो.ओला मसाला येतानाच कुणाच्या तरी घरातलं मिक्सरवर वाटून किंवा डंगावर मिळतो, तो तयार विकत आणलेला असतो. कोणतरी अशिश्टंट आच्यारी हातोप्याला डोळं पुसत डोळं पुसत कसंबसं कांदा कापतो. फोडणीला पडल्याल्या मटणाचा आल्या-लसणीचा वास सुटला, की शिजंपातुर जीव निस्ता"कालवाया" लागतो. दुसरीकडं भाताची डेचकी चढते.वेळ असला तर यकांदा मसाला भात बनिवतो. मटण कमी पडाय नगं , म्हणून महाराणा प्रताप चौकातनं उकडलेली अंडी दोन चार डझन आणून ठेवल्याली असत्यातच आठवणीनं यकांद्यानं.

अंड्यावरनं आठिवलं, आमचं "रस्सा मंडळ "तसं अंड्यापासूनच सुरू झाल्यालं बघा. लहान असताना मटनाचं रस्सामंडळ करायला कोन देतंय वो आमाला पोराटकी समजून ? असंच हातपाय आपटत , जिमिनीवर लोळण घेऊन , आईकडून रुपयाभर काढून, त्यातनं अंडी- हिरवा मसाला असं सांगतील तसं आणून द्यायचं नेऊन रव्याच्या आईकडं. ती काकी त्येवडी नरम बिचारी आमच्या समद्याच्या आयांमदी.( आमची आये म्हंजी डिट्टो दादा कोंडकेंची "आये" वो. उठता बसता मुडद्याशिवाय भाषा न्हाई बघा.) ती रव्याची आई गरीब गाय, द्यायची बिच्चारी बनवून अंड्याचा झनझनीत रस्सा. मग ज्येनं त्येनं आपापल्या घरात्नं आपली आपली ताटवाटी - भाकरी- चपाती- भात घेऊन जमायचं एकांद्याच्या घरात . त्ये घर तरी कसं पायज्येल ? तर ज्याचा बा रातपाळीला कुटंतरी म्हंजे शाहू मिलमंदी न्हैतर एस्टीत तरी रातीचा कामाला जात आसंल ,घरात एकांदं खोकलणारं म्हातारं कोतारं नसंल ( म्हंजी "लवकर झोपायला जावा की रं आता बाळांनो" , असली किटकिट नगं पाच पाच मिंटाला.) अशा घरात बसून गप्पा गोष्टी , टिंगल टवाळी करत निवांत शिस्तीत जेवायचं , हसायचं खिदळायचं. रोजचंच जेवण, पन दोस्तांसोबत खातांना रोजच्या पक्षी झकास लागायचं बगा. "येक नंबर."
आता वय वाडलं, पन डांबरटपना काय जाईना बगा आमच्या कुणाच्याच अंगातला. मिसरुड फुटलं , कमवाय लागलो , रस्सा मंडळातली अंडी जाऊन मटण आलं.
आता सगळं कमावतं झालं , कोन डॉक्टर झालं, कोन इंजिनीयर , कुणाचा कारखाना , कुणाचं शोरूम , कोण बोटीवक्ष यक्ष कोण दुबईत.पर हितं येताना आपल्या डिग्रीचा, धंद्याचा , पैशाचा दुकानाचा , फॉरिनचा रुबाब आन् माज घरातच उतरवून यायचं , ही एकच अट. हितं एकच डिग्री चालती , ती म्हंजी तुमची दोस्ती. बास्स! आणखी कायबी नगं.

आता माजंच बगा ना. शिक्षणात मूळचंच डोस्कं न्हाई. घरातबी अभ्यास करायचा असतो, ह्ये कुनी शिकिवलंच न्हाई. जेमतेम एसेस्सी झालो. आय टी आय केलं.
रिझल्टच्या पैले वडील जाऊन बसलं वर , आरामात रंभा मेनकंचा शो बघायला. चिकटलो आपण हितच , याच आपल्या कारखान्यात. असली आपली स्टोरी. पन रस्सामंडळ असलं, की लै भाव असतोय बगा आपल्याला. राजेश खन्नाचं ऍक्टिग लै भारी करतो ना आपण ? सम्दं‌ "बाळ्या बाळ्या" करत्यात दोस्त लोक आपल्याला.

चुलीवरलं मटन शिजलंय की न्हाई , त्ये येकांदा बगतुय चार चार येळा , च्यामारी पावशेर त्यातच गट्टम् . शिजल्यावर या मटनाच्या फोडी भाईर यकांद्या परातीत काडायच्या. अंगासरशी वला मसाला च्यटणीची फोडणी घालून सारखं करायचं. खरी गंमत त्या रश्श्यातच वो ! च्यटनी घातलेल्या मसाल्यात रस्सा वतून खळा खळा उकळाय लागला , की आसला वास सुटतुया राव , काय कालवाकालव व्हती काळजात तवा , त्ये सांगता न्हाई यायचं तुमाला. मग समद्यानी गोल बसायचं. मधी रस्सा - भाताची पात्याली.जवळ आपापल्या चपात्या - भाकरी. ज्येला चपात्या आणाय जमलं नसंल, त्येला बी आपल्यतनं‌अर्धी येक ध्यायाची. आपापली ताट वाटी आणली आसंल ( न्याईतर गुरव गल्लीच्या कोपऱ्यावरुन आणल्याल्या इस्ताऱ्या - पत्रावळी , हल्ली कागदाच्या पत्रावळी पण मिळत्यात त्या.)
पण त्यात जेवाय मजा न्हाई येत राव.) ती फुड्यात घिऊन वाडायची वाट बघायची. मंडळात जे कारभारी असत्याल, त्ये वाडाय घेत्यात. परत्येकाच्या ताटात बचकभर मटणाचं खडं वाडत्यात. कोण यायचं राहिलं आसंल , त्याच्या वाट्याचं सुक्कं बाजूला ठेवून देत्याती.न्हाईतर ठणाणा आयबा काढत्याल येकेकाचं * * चं ! मग नाकातोंडातनं पाणी व्हाय लागस्तवर‌ झणझणीत झटका असल्याला " खुळा रस्सा" वाटीभर वाटी ढोसायचा.

ज्येला खरी "ढोसायची " तल्लप" , त्यांनी आपला कार्यक्रम आधीच बाजूला आडुश्याला झाडीत जाऊन उरकून घ्यावा. समद्यात बसून न्हाई चालत आमच्या रस्सामंडळात. काय * * पियाचं ना तुमाला, त्ये तुमचं तुमी पिवा जावा तिकडं. हितं आणि त्यो तमाशा नगं. फुकाट समद्यांची बदनामी ! उगंच "ना खाया, ना पिया , गिल्लास फोड्या , बारा आना " त्यातली गत.

तसं आता समदीकडं रस्सा मंडळ म्हंजी ह्यो एक कार्यक्रमच होऊन बसलाय. ३१ डिसेंबर आणि गटारी आमुश्येला , कोजागरी पुनवंला रातच्याला रस्सामंडळं झाली , की पंचगंगेच्या घाटावर , समद्या मैदानांवर , बागांमंदी रिकाम्या बाटल्यांचा निस्ता खच पडल्याला आस्तो. आमचं मंडळ जातंय‌ ना सकाळी साफसफाई करायला. तुमच्या पायी समद्या कोल्हापुरात बेवडं भरल्यात असं वाटायचं , की रं भाईरल्या लोकास्नी. यांच्या पायात त्या आमुशेला "गटारी" नाव पडलं याची जराबी शरम न्हाई वाटतं यांस्नी.

तर काय सांगत व्हतो , जेवून सम्दं आवरुन ,मग भांडी कुंडी पिशवी पोत्यात भरून घरला परत. झालं सपलं रस्सा मंडळ.
जेवण काय वो , प्रत्येकजण जेवतुयाच की रोज आपापल्या घरात सांज सकाळ. पण यार दोस्तांबरुबर दोन घास खाऊन, मन असलं भरतंय ना , काय सांगू तुम्हाला वैनीसाहेब ? ह्ये तर काईच न्हाई. मोठ्या मोठ्या हापिसातलं‌ साहेब लोकबी रस्सा मंडळ आसंल , तवा कापडाची इस्त्री इसरुन शिपायांच्या मांडीला मांडी लावून जिमिनीवर बसतात आणि "खुळा रस्सा" ढोसत्यात.काई बी म्हणा , पंचगंगेच्या पाण्याची चव , का त्या हवेचा परिणाम ? घरचा रस्सा असा कवाच लागत न्हाई. बघा , तुम्ही ट्राय करून येक डाव. मग घरला जातांना पुढचा नंबर कुणाचा ? कुणाचा पुढचा "बकरा" करावा ? याचा ईचार करतच घर गाठायचं आणि खालीवर पांघरुण घालून गप मुडद्यागत गुरफटून पडायचं."

खुळा रस्सा या पदार्थाची एखादी बांधीवशी पाककृती मला अजूनही सापडलेली नाही.कुणी सांगतं , खुळ्या रस्सा म्हणजे सगळं ( म्हाईला किंवा पावणेर - ईर्जिकला करतात तसं) सरसकट अवयवांसह / सगळे पार्टस् घेऊन शिजवलेलं पातळसर मटन.कुणी म्हणतं , जेवणावळीला माणसं वाढतील, तसं पाणी वाढवत केलेलं ढमकाढवळ मटन.कुणी म्हणतात , जेवणारं पावणं वाढतील तसं पाणी वाढवत जायचं आणि ( मनात) म्हणायचं" प्या हवा तेवढा रस्सा खुळ्यागत."
कुणी सांगतं , मटन नेहमीसारखं आपण घेतो तसंच घ्यायचं , पण भरमसाट मसाले वगैरे वापरायचे नाहीत.हाताशी असेल ते मोजकं उपलब्ध साहित्य वापरुन केलेला, सुक्कं रस्सा निरनिराळा न बनवता केलेला पातळसर पिण्याजोगा पदार्थ म्हणजे खुळा रस्सा.मला तरी वाटतं , कमीत कमी सामुग्री वापरून तयार होणारा आणि लुफ्त घेणाऱ्याला
" खुळं " करुन सोडणारा एक मांसाहारी पदार्थ म्हणजे खुळा रस्सा.पटतंय ना ?

आपल्या कोल्हापूरात रस्सा मंडळ , सौरभ जाधव यांचं " घाटी रस्सामंडळ", शिवाजी पेठेतील उदय सावंत यांचं " रस्सा मंडळ", देवकर पाणंदीत आणखी एक रस्सा मंडळ अशी ,तर पुण्यात आणि नवी मुंबईतील खारघर इथं "खुळा रस्सा" नावाचं हॉटेल निघालंय म्हणे, म्हणजे बघा.

हल्ली पंजाबी प्रभावामुळे ज्यात त्यात टॉमेटो/ टॉमॅटो प्युरी वापरली जाते.पूर्वी आमच्याकडे मटनात टॉमॅटो वापरत नसत.आलं- लसुण - हळद - मीठ - तिखट - मोजका गरम मसाला- जमलं तर तिळ खोबऱ्याचं खसखशीत वाटण ( ते सुद्धा गंधगोळीसारखं न वाटता पाट्यावर जरा जाडसर वाटलेलं) लावायचं.फोडणीत कांदाही प्रमाणात . हवा तर चुलीच्या मुरमुरात ( चुलीखालच्या धगीत) भाजलेला कांदा वाटणात घ्यायचा.नाहीतर मटन गोडूस होतं.
कधी महाबळेश्वरला थोरल्या व्याह्यांकडं गेले, की माझ्या या पेटंट रेसिपीची फर्माईश ठरलेली.दातखिळ बसवणाऱ्या डिसेंबरच्या ( त्यातून ते महाबळेश्वर !) थंडीत मी पेटवलेली चुलच माझ्यापुरतं शेकोटीची काम करते. सतत मोठ्या महागड्या रेस्टॉरंटमधलं किंवा घरात परप्रांतीय कुकनं‌ बनवलेलं तेच ते फ्रोझन‌ मटन / चिकन/ पनीर / भाज्या तेच ते‌ धणे- जिरे- गरम मसाला- कांदा टोमॅटो पेस्ट मधलं खाऊन कंटाळलेल्या मुंबईकरांना ही अस्सल कोल्हापुरी चव जणू नवचैतन्य देते.( च्यटनी मात्र मी आपली इथूनच घेऊन जाते.) पाचगणीच्या बाजारातून निवडून पारखून स्वतः आणलेलं ताजं ताजं पालव्याचं लुसलुशीत मटन. कांदा टोमॅटो मसाल्यांचा भडीमार अजिबात नाही.मुख्य म्हणजे हुडहुडी भरवणारी कडाक्याची थंडी आणि पोटात गेलेलं ऍपिटायझर यामुळे डाएट कॉन्शस पाहुणेसुध्दा बॅड कोलेस्टेरॉल, रेड मीट , गाऊट बिऊट हे सगळं विसरून मटणाची हंडी हां हां म्हणता रिकामी करतात.हा सगळा , मला वाटतं वातावरणाचा परिणाम असतो.आल्हादक हवामान , प्रियजनांच्या सहवासात रंगलेल्या गप्पा आणि आठवणी , अस्सल पदार्थांची जपलेली चव, "रसमयी" साथ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चुलीपाशी रांधणारी माझ्यासारखी सु * * *!
( आत्मस्तुतीचा दोष नको रे बाप्पा.) मग चार घास आणि चार घोट चढच जाणारच ना माणसाला ? रश्श्याचे हो !

मी स्वतः आजवर रस्सा मंडळाचा अनुभव घेतलेला नाही. पण अलिकडं महिला मंडळं - बचत गट - अपार्टमेंट - पेठा इथंल्या महिला सुध्दा कोजागिरी पौर्णिमा , ३१ डिसेंबरची पर्वणी साधून "रस्सा मंडळ" आयोजित
करायला लागलीत म्हणे.एखाद्या कल्पक आंत्रप्रिनरनं निसर्गरम्य ठिकाणी खुल्या आभाळाखाली

ही "Live रस्सा मंडळ"

संकल्पना राबवली तर पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळू शकतो. अशी जाहिरात करायची बघा - " जागा- चुल - सरपण - गवऱ्या- भांडी- आणि "चवदार " ( महाडच्या तळ्याचं नाही हो , आपल्या पंचगंगेचंच.) पाणी आमचं. मटन तेवढं तुम्ही घेऊन या , हवा तो मसाला, हवा तेवढा घालून बनवा , हवा तसा "खुळा रस्सा" आणि लुटा मजा खास "कोल्हापुरी रस्सा मंडळाची !"

मग मंडळी , कशी आहे ही आयडियाची कल्पना ? उद्घाटनाला बोलवायला विसरू नका म्हणजे झालं.

Crab party  खेकडा पार्टी
09/08/2023

Crab party खेकडा पार्टी

10/05/2023

Morning View from Rangana Fort

Address

Kolhapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rassa mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Rassa mandal:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram